वडील माझे लैंगिक शोषण करायचे ! – स्वाती मालीवाल, अध्यक्षा, देहली महिला आयोग

स्वाती मालीवाल, अध्यक्षा, देहली महिला आयोग

नवी देहली – माझे वडील माझे लैंगिक शोषण करायचे, असा गंभीर आरोप देहलीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या वडिलांवर केला. येथे एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वडील रागाच्या भरात मला फार मारहाणही करत असत, असे त्यांनी सांगितले.

मालीवाल पुढे म्हणाल्या,

‘‘वडील घरी यायचे, तेव्हा मला फार भिती वाटायची. मी अनेक रात्री खाटेखाली लपून घालवल्या आहेत. मी घाबरून थरथर कापायचे. तेव्हा मी विचार करायचे की, मला असे काय करता येईल, ज्याने मुलींवर अत्याचार करणार्‍या अशा लोकांना धडा शिकवता येईल. बालवयात मनावर झालेल्या या आघातांनंतर त्यातून मी बरी होण्यासाठी मला नातेवाइकांनी फार साहाय्य केले. ते नसते, तर कदाचित मी त्या ताणातून बाहेर पडू शकले नसते. मी आज तुमच्यामध्ये उभी राहू शकले नसते. जेव्हा पुष्कळ अत्याचार होतात, तेव्हा मोठा पालट होतो. त्या अत्याचारांमुळे तुमच्या आत मोठी आग पेटते. या आगीला तुम्ही केवळ योग्य वाट करून दिली, तर तुम्ही आयुष्यात फार मोठमोठी कामे करू शकता.’’

संपादकीय भूमिका

यावरून समाजाची नीतीमत्ता किती रसातळाला गेली आहे, हेच स्पष्ट होते ! नीतीमान समाज घडवण्यासाठी प्रत्येकाला साधना शिकवणेच अनिवार्य आहे, हे सरकारने आता तरी लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करावी !