स्वातंत्र्यवीर सावरकर : अशिलासाठी (भारतमातेसाठी) जन्मठेप भोगणारा अधिवक्ता !

आज शनिवार, २५ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा (तिथीनुसार) ‘आत्मार्पणदिन’ (स्मृतीदिन) आहे. त्या निमित्ताने…

२८ मे १९४३ या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षपदाचे मानकरी होते तात्याराव केळकर ! स्वातंत्र्यविरांना त्यांच्या हिरक महोत्सवी (६० वर्षे पूर्ण) वाढदिवसानिमित्त १ लाख २२ सहस्र ९१२ रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. त्याच वेळी सावरकर यांच्या परिवारातील सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी सौ. माई सावरकर, सावरकर यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर, त्यांचे लहान भाऊ डॉ. नारायणराव सावरकर आणि त्यांच्या भगिनी माई काळे यांना महावस्त्र अन् चांदीची भांडी असा अहेर देण्यात आला. या समारंभाला अनुमाने ५० सहस्र नागरिक उपस्थित होते.

स्वातंत्र्यविरांचे सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आगमन होताच त्यांचा जयजयकार करण्यात आला. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे भव्य स्वागत केले. स्वातंत्र्यवीर व्यासपिठावरील त्यांच्या आसनावर विराजमान होताच त्यांनी रचलेले ध्वजगीत गाण्यात आले. धर्मवीर लक्ष्मण भोपटकर यांनी या मंगलप्रसंगी उत्सवमूर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर, नामदार श्रीनिवास शास्त्री, बॅरिस्टर राजा नारायण लाल, डॉ. वरदराज नायडू आणि अन्य मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी बार्शीचे वीरशैव मंडळ, मद्रासमधील हिंदू महासभा यांसारख्या अनेक संस्थांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दिलेले संदेश वाचून दाखवण्यात आले.

श्री. दुर्गेश परुळकर

१. सत्त्वधीरता आणि वीरवृत्ती यांचे फळ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना लाभलेले आयुष्य !

या अविस्मरणीय समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले तात्याराव केळकर भाषणात म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यविरांनी ब्रिस्टनच्या कारागृहातून आपल्या सोबत्यांना जो स्फूर्तीदायक संदेश पाठवला, त्यात ‘राम राम’ हा शेवटचा शब्द होता. त्यांच्या तेव्हाच्या अंदाजाप्रमाणे तो अखेरचा ‘राम राम’ होता. तथापि त्यांच्या सत्त्वधीरतेचे आणि वीरवृत्तीचे फळ म्हणून ईश्‍वराने त्यांना आजवर आयुष्य दिले. त्यामुळेच आजचा आनंदाचा दिवस आपल्या सर्वांना लाभला.’’

त्यानंतर तात्याराव केळकर यांनी भाषणात वर्ष १९२४ मध्ये स्वातंत्र्यविरांचा झालेल्या सत्कार समारंभाचा संदर्भ देतांना म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यविरांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर नाशिकमध्ये त्यांचा जो सत्कार समारंभ झाला, त्या वेळी त्यांना सुमारे १२ सहस्र रुपयांचा द्रव्य निधी अर्पण करण्यात आला. त्यानंतर आता १९ वर्षार्ंनंतर पुनश्‍च असा योग आला. नाशिकमधील त्यांच्या सत्कार समारंभात त्यांना जे मानपत्र देण्यात आले, ते मीच शब्दबद्ध केले होते आणि वाचले होते. आजच्या त्यांच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या या समारंभाच्या वेळी मी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहे. याचा मला आनंद आहे.’’

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅरिस्टर होण्यामागे सांगितलेले कारण

वर्ष १९२४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नाशिकला जो सत्कार करण्यात आला, त्याला उत्तर देतांना सावरकर यांनी जे भाषण केले त्यात त्यांनी दोन मुद्दे मांडले होते. सावरकर यांच्या भाषणातील दोन मुद्दे तात्याराव केळकर यांना समाधान देणारे नव्हते. सावरकर यांच्या त्या दोन मुद्यांवर संवाद साधण्याची तात्याराव केळकर यांची इच्छा होती. पुरेशी संधी न मिळाल्यामुळे त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर सत्काराला उत्तर देतांना वर्ष १९२४ मध्ये म्हणाले होते, ‘‘मला मुंबईच्या कारागृहात नेतांना बरोबरच्या युरोपियन पोलीस अधिकार्‍यांनी वाटेवरचे मुंबईच्या नामांकित श्रीमंत बॅरिस्टरांचे बंगले दाखवले. ‘मी बॅरिस्टरी करायची ती न करता भलत्या मार्गात शिरलो’, असे त्यांनी मला हिणवले. मग मी तात्काळ त्या युरोपियन पोलीस अधिकार्‍याला म्हणालो, ‘‘त्यांच्यापेक्षा मला मोठ्या मानाची आणि खुद्द माझ्या देशाची बॅरिस्टरी मी स्वीकारली, ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे.’’

वरील संदर्भ देत नाशिकमधील सभेत सावरकर पुढे म्हणाले, ‘‘आज मला १२ सहस्र रुपयांचे जे शुल्क (फी) एक दिवसात मिळाले, ते कुणा बॅरिस्टरला कधी मिळाले का ?’’

सावरकर यांच्या या भाषणाचा उल्लेख करून तात्याराव केळकर म्हणाले, ‘‘सावरकर यांनी त्या युरोपियन आक्षेपाला निरुत्तर केले, यात शंका नाही. त्यांनी देशसेवेत केलेल्या अंश मात्र वाग् (बोलण्याच्या) व्यवहाराला वकिली म्हणता येणार नाही. तसे म्हणणे योग्य नाही; कारण कोणताही अधिवक्ता आपल्या अशिलाशी तादाम्य पावून न्यायालयात त्याची बाजू मांडत नाही. चिरोल केसमध्ये जॉन सायमन यांनी लोकमान्य टिळक यांना तोंडावर सांगितले होते की, तो टिळक यांचा वकील आहे. या नात्यापुरताच या खटल्यात त्यांच्याशी संबंध आहे. राजकारणात टिळक टिळकांच्या जागी आहेत आणि तो वकील म्हणून त्याच्या जागी आहे. वकीलाचा आपल्या अशिलास दोष मुक्त करण्यामागे आपल्या वकिली चातुर्याची वाहवा व्हावी, हा हेतू असतो.’’

३. सावरकर यांनी ‘वकील फी’ म्हणून जन्मठेपेची शिक्षा भोगणे

तात्याराव केळकर यांनी हा दाखला दिला आणि ते पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यविरांचे देशाभिमानी अन् देशभक्तीपूर्ण वक्तृत्व म्हणजे वकिली नाही. वकिली म्हणजे वावदुकीची भाषा (वायफळ बडबड करणारे) पूर्वी कधी नव्हती आणि आजही नाही. तो अंतरंगाच्या जातीवंत जिव्हाळ्याचा उदगार असतो. नाशिकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अहेराच्या वेळी अर्पण केलेला द्रव्यनिधी हा देणार्‍यांनी वकील शुल्काच्या भावनेने दिलेला नव्हता. म्हणून सावरकर यांनी त्याला ‘वकील फी’ म्हटले, हे बरोबर नव्हते.

दुसरा भाग असा की, वर्षाचे १२ सहस्र आणि आजचे १ लाख रुपये अशी वकिली फी देऊ केली, तरी धंदेवाईक वकील जन्मठेपेची शिक्षा, अंदमानातील खडतर बंदीवास आणि जीवावरची संकटे सोसण्यास सिद्ध होईल का ? ते स्वातंत्र्यविरांनीच सांगावे !’’ त्यानंतर लगेच समोर बसलेल्या श्रोत्यांना तात्याराव केळकर यांनी विचारले, ‘‘श्रोत्यांमध्ये जर कुणी वकील बसले असतील, तर त्यांनीच माझ्या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे.’’

एवढे बोलून तात्याराव केळकर पुढे म्हणाले, ‘‘राम, लक्ष्मणाच्या इतका दीर्घकाळ वनवास आणि पांडवांपेक्षा अधिक अज्ञातवास स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सोसला. हिंदु तीर्थक्षेत्राच्या कार्यक्रमात अवश्य असे चार धाम मानतात. त्याहून अधिक धाम अंदमान, ब्रिस्टन, भायखळा, डोंगरी, ठाणे, येरवडा, रत्नागिरी इत्यादी ठिकाणच्या कारावासाच्या रूपाने सावरकर यांनी केले आहेत. त्यांच्या या सर्व तपश्‍चर्येचे फळ त्यांना प्रिय असणार्‍या उद्धारार्थ खर्ची पडावे, असे ईश्‍वरापाशी मागण्याचा हक्क त्यांना पोचतो. त्यांच्या या मागणीला आम्हा जनतेचा पाठिंबा आहे.’’

४. … तर मी पुन्हा सशस्त्र बंड पुकारीन ! – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे उद्गार

तात्याराव केळकर यांच्या भाषणानंतर सत्काराला उत्तर देतांना सावरकर म्हणाले, ‘‘जीवन जगण्यासाठीच आम्ही कारागृहात गेलो असतो, तर मरणावाचून गत्यंतर नव्हते. आम्ही अंदमानात थडग्यातील जीवन जगत होतो. त्या काळाच्या तडाख्यातून, मरणाच्या दाढेतून बाहेर आलो. मी सुटल्यावर व्यक्ती म्हणून उरलो नव्हतो, तर मी विपद्ग्रस्त हिंदुस्थानची एक किंकाळी म्हणून उरलो होतो. कारागृहातून सुटल्यावर मनाशी ठरवलेल्या धोरणाविषयी सुसंगत विचार करण्याचा निश्‍चय केला.

आम्ही केवळ स्वातंत्र्याच्या उच्चारासाठी हाल सहन केले. आपण आज निर्भयपणे त्याचा उच्चार करू शकतो, हे पाहून धन्यता वाटते. आम्हाला सर्वांना ती घोषणा म्हणजे नवी गोष्ट वाटत होती. अशा महान बिकट परिस्थितीत सशस्त्र बंडाची उभारणी केली आणि ते करूनही दाखवले. त्याविषयी मला अजूनही पश्‍चात्ताप वाटत नाही. मी कसलेला वक्ता आहे. शब्दांची मला पूर्ण जाणीव आहे. परिणाम काहीही होणार असेल, तरी ते समजूनच मी सांगतो की, स्वातंत्र्यासाठी आवश्यक तर मी पुन्हा सशस्त्र बंड पुकारीन ! लंडनच्या न्यायालयात माझ्यावर एकापेक्षा एक वरचढ असे आरोप वाचून दाखवण्यात आले. तेथील वकिलांनी ‘हाय हाय’ असे उद्गार काढले; पण माझ्या मनाची शांती किंचित् सुद्धा ढळली नाही. एक स्वातंत्र्याचा शब्द उच्चारला, तर असे घोरपाप त्या काळी समजले जात होते.’’

५. आमचे राष्ट्रीयत्व हा आमचा बाणा ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

‘‘प्रथम हिंदूंचे स्वत्व राहील, तेच स्वराज्य होय’, हा आमचा बाणा आहे. म्हणून हिंदू महासभेने राजकारणाची सूत्रे आपल्या हातात घेतली. महाराष्ट्रात या कार्याला जोराची चालना मिळाली. देशाचे जे काही बरे वाईट झाले ते महाराष्ट्रातून आणि या पुण्यामधून झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांना दादोजी कोंडदेव यांनी स्वातंत्र्याचे पाठ पुण्यात दिले. श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे हे पुण्यात झाले. बाजीराव पेशवे पुण्यात झाले. सदाशिवभाऊ अफाट सेना घेऊन गेले ते पुण्यामधूनच ! हे जसे चांगले झाले तसे वाईटही पुण्यालाच झाले. पुण्यातच पेशवाई बुडाली. लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख आणि गोपाळ गणेश आगरकर ही मंडळी पुण्यातून बाहेर पडली. पुण्यानेच हुतात्मा चाफेकर दिले. लोकमान्यांच्या शिकवणुकीचा ठेवा मला महाराष्ट्रातच दिसला. याचे मला कौतुक आणि आनंद वाटला. जेव्हा जेव्हा म्हणून महाराष्ट्राच्या हाती राजकारणाची सूत्रे आली, तेव्हा तेव्हा राजकारण हिंदूंच्या अभ्युदयाचे झाले.

‘सावरकर यांनी मला दोन राष्ट्रांची शिकवण दिली’, असे जिना म्हणतात. जिनांना जर मला गुरु म्हणून मानायचे असेल, तर त्यांनी संपूर्ण मानावे. गुरु करायचा तो संपूर्ण करावा, अर्धवट गुरुत्व पत्करू नये. ‘मुसलमानांनी न्याय हक्क घेऊन रहावे’, ही माझी शिकवण ते का पाळत नाहीत ? यापुढे मुसलमानाने हिंदुस्थान हे एक राष्ट्र मानले, तरी त्यावर आम्ही आता विश्‍वास ठेवणार नाही. निदान यापुढे ५० वर्षे तरी मी त्यावर विश्‍वास ठेवणार नाही. लहानपणी श्रीदेवीच्या पुढे मी जी शपथ घेतली, ती आज ६१ व्या वर्षांपर्यंत पाळत आलो आहे. आजही आमची शपथ ठाम आहे.’’

६. जगावेगळा अधिवक्ता म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर !

यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सैनिकी शिक्षणावर जोर दिला. अद्ययावत साधनांचा पुरस्कार केला. ‘जागरूकतेने देशात वावरले पाहिजे, तरच देशाचे भले होईल. देशघातक विचारांना बळी पडू नका’, असा सल्ला देऊन सावरकर यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. त्या दिवशी पुणेकरांना भारतमातेचे वकीलपत्र घेतलेल्या आणि तिच्यासाठी जन्मठेपेची यातनामय शिक्षा भोगणार्‍या जगावेगळ्या अधिवक्त्याचा परिचय झाला.

वर्ष १९४३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुण्यात जो सत्कार करण्यात आला, त्याला उत्तर देतांना त्यांनी जे भाषण केले आणि त्यांनी जे विचार व्यक्त केले, ते विचार चिरकाल आपल्या सर्वांच्या स्मरणात राहो, ही त्यांच्या ‘आत्मार्पणदिना’च्या दिवशी कामना !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२०.२.२०२३)