महाशिवरात्रीला करण्यात येणारी ‘यामपूजा’ (रात्रीच्या ४ प्रहरी करण्यात येणार्‍या ४ पूजा) या संदर्भातील संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘महाशिवरात्रीला रात्रीच्या ४ प्रहरी ४ पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ म्हणतात. महाशिवरात्रीला यामपूजा करतांना पहिल्या प्रहरात ‘श्रीशिवाय नमः’ असा नामोच्चार करावा. दुसर्‍या प्रहरात ‘श्रीशंकराय नमः’ असे म्हणावे. निशीथकाळी (टीप) ‘श्रीसांबसदाशिवाय नमः’ असे जपावे. तिसर्‍या प्रहरात ‘श्रीमहेश्वराय नमः’ आणि चौथ्या प्रहरात ‘श्रीरुद्राय नमः’ असा नामोच्चार करून समर्पण करावे. वर्ष २०२२ मधील महाशिवरात्रीला यामपूजेच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक संशोधनात्मक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

टीप – निशीथ : ‘रात्रीच्या एकंदर वेळाचे समान १५ भाग केले, म्हणजे त्या प्रत्येक भागाला ‘मुहूर्त’ असे म्हणतात. त्यांतील ८ व्या मुहूर्ताला ‘निशीथ’ असे म्हणतात. महाशिवरात्रीला निशीथकाळी शिवपूजेचे विशेष महत्त्व असते.’ (संदर्भ : ‘सुलभ ज्योतिष शास्त्र’ ग्रंथ) (वर्ष २०२२ मधील महाशिवरात्रीला ८ वा मुहूर्त मध्यरात्री १२.०६ ते १२.५४ वाजता होता.)

सौ. मधुरा कर्वे

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत महाशिवरात्रीला पूजकाने शिवपिंडीची यामपूजा केली. त्याने यामपूजा करण्यापूर्वी अन् यामपूजा केल्यानंतर त्याच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. तसेच यामपूजा आरंभ होण्यापूर्वी आणि त्यानंतर प्रत्येक प्रहरातील पूजन झाल्यावर शिवपिंडीच्याही चाचण्या करण्यात आल्या.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१ अ. महाशिवरात्रीला पूजकाने यामपूजा केल्यावर त्याच्या स्वतःवर आणि शिवपिंडीवर झालेले सकारात्मक परिणाम : आरंभी (यामपूजेपूर्वी) शिवपिंडीत नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा होत्या. पूजकाने १ ल्या अन् २ र्‍या प्रहरात केलेल्या पूजेनंतर शिवपिंडीतील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. निशीथकाळातील पूजा झाल्यावर शिवपिंडीतील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक झाली. पूजकाने ३ र्‍या प्रहरात केलेल्या पूजेनंतर शिवपिंडीत अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली आणि ४ थ्या प्रहरातील पूजेनंतर ती नाहीशी झाली. १ ल्या ते ४ थ्या प्रहरात केलेल्या प्रत्येक पूजेनंतर शिवपिंडीतील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर अधिक होती.

महाशिवरात्रीला शिवपिंडीची केलेली यामपूजा

यामपूजेपूर्वी पूजकामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक आणि अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. यामपूजा झाल्यावर पूजकातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. पूजकाने यामपूजेतील प्रत्येक प्रहरात केलेल्या भावपूर्ण पूजनामुळे शिवाचे त्या त्या रूपातील तत्त्व (चैतन्य) शिवपिंडीत आकृष्ट होऊन वातावरणात प्रक्षेपित होणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्रित असते’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. त्यामुळे देवतेचे नाव आले की, तिची शक्ती (चैतन्य) तेथे असतेच. पूजकाने प्रत्येक प्रहरात शिवाच्या त्या त्या नावांचा जप करत शिवपिंडीचे भावपूर्ण पूजन केले. त्यामुळे शिवाचे त्या त्या रूपातील चैतन्य शिवपिंडीत आकृष्ट होऊन ते वातावरणात प्रक्षेपित झाले. शिवपिंडीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यानुसार शिवपिंडीतील सकारात्मक ऊर्जा त्या त्या प्रमाणात वाढल्याचे चाचणीतून दिसून आले. विशेष म्हणजे निशीथकाळातील पूजनानंतर शिवपिंडीतील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक झाली. यातून ‘महािशवरात्रीला निशीथकाळी शिवपूजेचे विशेष महत्त्व असते’, असे का सांगितले आहे ? याचे महत्त्व लक्षात येते. पूजकाने त्याच्या भावानुसार यामपूजेतील चैतन्य ग्रहण केल्याने त्याच्यावरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ न्यून होऊन त्याची सात्त्विकता वाढली. यातून देवतेचे पूजन भावपूर्ण करण्याचे महत्त्वही लक्षात येते.

२ आ. शिवपिंडीमध्ये काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळून येण्याचे कारण : शिवपिंडीमध्ये आरंभी नकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात आढळून आली. १ ल्या अन् २ र्‍या प्रहरानंतर शिवपिंडीतील नकारात्मक ऊर्जा न्यून होत गेली आणि निशीथकाळी ती नाहीशी झाली. तिसर्‍या प्रहराच्या पूजेनंतर शिवपिंडीत पुन्हा अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली आणि चौथ्या प्रहराच्या पूजेनंतर ती नाहीशी झाली. याचे कारण हे की, शिवपिंडीमध्ये शिवाच्या त्या त्या रूपाचे चैतन्य आकृष्ट होऊन तिच्यातून ते वातावरणात प्रक्षेपित होऊ लागले. सूर्यास्तानंतरचा काळ वाईट शक्तींना पूरक होत जातो. त्यामुळे त्यांचा वातावरणातील संचार वाढतो. प्रत्येक प्रहरात केलेल्या पूजनामुळे शिवाचे त्या त्या रूपातील चैतन्य प्रक्षेपित होऊ लागल्याने वातावरणात विद्यमान वाईट शक्तींशी एक प्रकारे सूक्ष्मातील युद्ध आरंभ झाले. या सूक्ष्मातील युद्धाचा तात्कालिक परिणाम म्हणून शिवपिंडीभोवती काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळून आली. शिवपिंडीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे वातावरणातील त्रासदायक स्पंदने अल्प किंवा नाहीशी होऊन वातावरण चैतन्यमय बनले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.१.२०२३)

ई-मेल : [email protected]