आज रंगपंचमी आहे. त्या निमित्ताने…
होळी हा तिमिर, अंधःकार यांना जाळून प्रकाशाची उधळण करून आनंदाची अनुभूती देणारा उत्सव आहे. त्यानंतर येणारा ‘रंगपंचमी’ हा उत्सव अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने आणि उत्साहाने साजरा करतात. या सणाचे वैशिष्ट्यच तसे आहे. ‘रंग’ म्हणजे आनंद ! आपल्या जीवनाला ‘रंगा’विना अर्थ नाही. प्रत्येक जण आपापल्या मित्र-मैत्रिणींसमवेत, घरच्यांसह हा उत्सव उत्साहात साजरा करतात. एका नृत्य कलाकारासाठी त्याची रंगपंचमी कशी असेल ? तो कशा प्रकारे ती साजरी करत असेल ?, याचे उत्तर त्या नर्तकाच्या मनातील भावविश्वात पाहिले, तर आपल्या नक्कीच सापडेल. नर्तक अथवा कोणताही कलाकार ‘रंग’ या तत्त्वापासून लांब राहू शकत नाही. मग तो नर्तनातील ‘आनंदरंग’ असेल, नृत्यसंरचना करतांना अनुभवलेला ‘भावरंग’ असेल, अभिनयातील ‘शृंगाररंग’ असेल अथवा नृत्य करतांना कृष्णभक्तीच्या रंगात विलीन झाल्यावर अनुभवलेला अंतरंगातील ‘आत्मरंग’ असेल ! प्रत्येक अंतर्मुख कलाकार या आत्मरंगाच्या शोधात असतो.

भगवान शिवासह ‘भगवान श्रीकृष्ण’ हीसुद्धा नृत्यकलेची आधिष्ठात्री देवता आहे. श्रीकृष्ण हा राधा आणि गोपिका यांच्यासह रंगपंचमी खेळायचा. त्यामागे एक आध्यात्मिक भावार्थ आहे. श्रीकृष्ण जेव्हा गोपिकांना रंग लावायचा, तेव्हा तो त्यांना त्यांच्या अंतरंगातील आनंद अनुभवायला द्यायचा. नर्तकासाठीही त्याच्या अंतरंगातील आध्यात्मिक स्तरावरील आनंद त्याला नृत्यामुळे अनुभवता येतो.
नृत्यशास्त्रातही ‘रंगांचे काय महत्त्व आहे ?’, ते आपल्याला पुढील उदाहरणांतून लक्षात येईल. भरतमुनींनी ‘नाट्यशास्त्रा’त उल्लेख केलेल्या अष्टरसांतील प्रत्येक रसाचा पुढील रंग सांगितला आहे.
यातून आपल्याला लक्षात येते की, रसांचे हे विशिष्ट रंग त्यांच्या तत्त्वानुसार अचूक आहेत. भरतमुनींच्या मते हे रंग व्यक्तीची प्रभावळही दर्शवतात. जसे रागीट व्यक्तीभोवती सूक्ष्मातून लाल प्रभावळ अथवा ध्यानधारणा करणार्या व्यक्तीभोवती पांढर्या रंगाची प्रभावळ सूक्ष्मातून असते. नाट्यशास्त्रातील नवरसांच्या या ९ रंगांना पुष्कळ महत्त्व आहे. अशा रंगांमुळे नर्तकही त्याच्या अंतर्मनात विविध भावरंग अनुभवतो; उदा. भरतनाट्यम्मधील ‘मार्गम्’ (भरतनाट्यम्धील नृत्य सादरीकरणाचा एक विशिष्ट क्रम) मध्ये सादर केले जाणारे ‘वर्णम्’ ! ‘वर्णम्’ हा भरतनाट्यम्मधील एक नृत्यप्रकार आहे. ‘वर्णम्’ याचाच अर्थ ‘रंग’ असा होतो. भरतनाट्यम्मधील हा एक अत्यंत कठीण; परंतु तितकाच भारदस्त आणि सुंदर असा नृत्यप्रकार आहे. यात एक देवता अथवा नायक यांविषयी विविध प्रसंग किंवा कथा सादर केल्या जातात. ज्याप्रमाणे ७ रंगांचे सुंदर इंद्रधनुष्य असते, त्याप्रमाणे वर्णम्मध्ये अभिनय, शुद्ध नृत्य, स्वर आणि जति (नृत्याचे बोल) या सर्वांतील सुंदर रंग एकत्रित आल्यावर वर्णम्चे सुंदर इंद्रधनुष्य सिद्ध होते.
नृत्यशास्त्रातील रंगांचे महत्त्व यातून आपल्या लक्षात येईल. केवळ नर्तकच नाही, तर आपण प्रत्येक जण त्याच्या अंतरातील रंग अनुभवू शकतो. आपण कोणत्याही क्षेत्रात असू तरी आपल्याला हे रंग अनुभवता येणार आहेत ! या रंगपंचमीला आपण सर्वांनी आध्यात्मिक रंग अनुभवूया… कृष्णभक्तीच्या रंगात रंगून जाण्याचा प्रयत्न करून ‘कृष्ण रंग’ अनुभवूया !
– कु. अपाला औंधकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१४.३.२०२५)