गंगेचे पाणी नव्हे अमृत !

गंगा ही सश्रद्ध भारतियांसाठी केवळ एक नदी नाही. ती जीवनदायिनी आणि मोक्षप्रदायिनी आहे. जे धर्म अवलंबतात, त्यात दैवी आणि मानवी मूल्ये यांना महत्त्व देतात, तसेच श्रद्धा अन् श्राद्ध ही दोन्ही मौलिक परिमाणे जीवन ज्ञापनासाठी आवश्यक मानतात, त्या लोकांसाठी गंगा ही सर्वार्थाने ‘माता’ आहे. अखिल भारत खंडात सर्व नद्या या गंगा स्वरूप आहेत ते याचमुळे. ज्यांना पाणी आणि जल यांतील भेद कळतो, त्यांच्यासाठी गंगा ही साक्षात् देवता आहे. ते तिला मैयास्वरूप (मातेस्वरूप) देवता मानतात आणि म्हणतात; कारण सतत विस्तारणारे असे जे अस्तित्व आहे, ज्याला ‘ब्रह्म’ म्हटले जाते, त्या अस्तित्वाची जीवंत आणि दृश्य अशी देवता म्हणजे गंगा होय ! म्हणून गंगा ही जशी नद्यांशी संबंधित आहे, तशीच ती ‘अमृत वर्षावाशी’ आणि आकाशगंगेशीसुद्धा थेट संबंधित आहे.

१९ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गंगेच्या जलात इतर नद्यांच्या तुलनेत प्राणवायूची पातळी २५ पट अधिक आढळणे आणि प्रसिद्ध ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग यांनी गंगेचे पाणी सूक्ष्मजंतूंना नष्ट करत असल्याविषयी केलेले संशोधन’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा-  https://sanatanprabhat.org/marathi/893953.html

३. अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग यांनी मांडलेले महत्त्वपूर्ण निष्कर्ष

अ. जंतुनाशक क्षमता : हॅकिंग यांनी कॉलराच्या जंतूंना गंगाजलात मिसळले आणि अवघ्या ३ घंट्यांत हे जंतू पूर्णपणे नष्ट झाल्याचे आढळले. याउलट सामान्य पाण्यात हे जंतू बराच काळ जिवंत रहात होते. यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, गंगाजलात काही नैसर्गिक शक्ती आहे, जी हानिकारक सूक्ष्मजंतूंना नष्ट करते.

श्री. अमोल पाध्ये

आ. ‘एक्स फॅक्टर’चा उल्लेख : हॅकिंग यांनी त्यांच्या अहवालात गंगाजलातील या जंतुनाशक गुणधर्माला ‘एक्स फॅक्टर’ असे संबोधले. त्या वेळी बॅक्टेरियोफेजेस, म्हणजे जंतूंना नष्ट करणार्‍या विषाणूंचा शोध लागला नव्हता; परंतु नंतरच्या संशोधनातून हे स्पष्ट झाले की, हॅकिंग यांनी ज्याला ‘एक्स फॅक्टर’ म्हटले, ते खरे तर बॅक्टेरियोफेजेस होते. (‘बॅक्टेरियोफेजेस’ हे असे विषाणू असतात, जे बॅक्टेरियांवर आक्रमण करतात आणि त्यांचा नाश करतात. ‘बॅक्टेरियो’ म्हणजे बॅक्टेरिया आणि ‘फेज’ म्हणजे खाणे. त्यामुळे त्यांना ‘बॅक्टेरिया खाणारे’ असेही म्हटले जाते. हे सूक्ष्मजीव स्वतःहून स्वतःची प्रतिकृती बनवू शकत नाहीत; त्यासाठी त्यांना बॅक्टेरियांच्या पेशींची आवश्यकता असते. बॅक्टेरियोफेजेस हे पृथ्वीवरील सर्वाधिक संख्येने आढळणारे जीव मानले जातात आणि ते निसर्गात सर्वत्र, विशेषतः पाणी, माती अन् प्राणी यांच्या शरिरात आढळतात. बॅक्टेरियोफेजेसची रचना साधारणतः एका डोक्यासारख्या भागात (ज्यामध्ये त्यांचा ‘डी.एन्.ए.’ किंवा ‘आर्.एन्.ए.’ असतो) आणि शेपटीसारख्या भागात विभागलेली असते. ते बॅक्टेरियाच्या पेशीवर आक्रमण करतात, त्यात त्यांचा जनुकीय पदार्थ इंजेक्शन दिल्याप्रमाणे सोडतात आणि बॅक्टेरियाच्या यंत्रणेचा वापर करून स्वतःच्या अनेक प्रती सिद्ध करतात. शेवटी बॅक्टेरिया फुटून नष्ट होतो आणि नवीन फेजेस बाहेर पडतात.)

४. अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग यांच्या संशोधनामुळे गंगा नदीचे वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित होणे

अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग यांच्या संशोधनाचे महत्त्व असे की, तेच संशोधन ‘बॅक्टेरियोफेजेस’च्या शोधाचा पाया ठरले. हॅकिंग यांचे संशोधन हे ‘बॅक्टेरियोफेजेस’च्या शोधाचा प्रारंभिक टप्पा आजही मानले जाते. १९१० च्या दशकात फ्रेंच-कॅनेडियन संशोधक फेलिक्स डी’हेरेल यांनी ‘बॅक्टेरियोफेजेस’चा औपचारिक शोध लावला; परंतु हॅकिंग यांचे कार्य त्यासाठी प्रेरणादायी ठरले, हे निश्चितपणे म्हणता येईल. त्यांच्या संशोधनामुळे गंगाजलाचा वापर कॉलरासारख्या रोगांविरुद्ध प्रभावी ठरू शकतो, हे समजले. यामुळे भारतातील जलशुद्धीकरणाच्या पद्धतींवरही प्रकाश पडला.

अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग

हॅकिंग यांच्या संशोधनाने गंगाजलाच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी पुढील पिढीच्या संशोधकांना प्रेरणा दिली. आजही ‘नीरी’ आणि ‘आय.सी.एम्.आर्.’ (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद) यांसारख्या संस्था त्यांच्या कार्याचा आधार घेऊन गंगेच्या जलाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग यांचे गंगेच्या जलावरील संशोधन हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून गंगेच्या पवित्रतेची पुष्टी करणारे ठरले. त्यांनी गंगेची जंतुनाशक क्षमता आणि शुद्धता टिकवण्याची शक्ती यांवर प्रकाश टाकला, ज्यामुळे गंगा नदीचे वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित झाले.

५. गंगेच्या जंतुनाशक गुणधर्मातील सक्रीय घटकांचा औषधांच्या निर्मितीत वापर करण्याविषयी डॉ. एम्.सी. मिश्रा यांचे संशोधन

याच क्षेत्रात ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)’चे माजी संचालक डॉ. एम्.सी. मिश्रा यांनी गंगेच्या जंतुनाशक गुणधर्मांविषयी सांगितले की, हे गुणधर्म भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीकारी ठरू शकतात. गंगेत आढळणारे ‘बॅक्टेरियोफेजेस’ (जंतूंना नष्ट करणारे विषाणू) हे त्याच्या जंतुनाशक क्षमतेचे प्रमुख कारण आहेत. हे ‘बॅक्टेरियोफेजेस’ हानिकारक बॅक्टेरियांचा नाश करतात, ज्यामुळे पाणी स्वच्छ रहाते. डॉ. मिश्रा यांनी या गुणधर्माला वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी ठरवले; कारण ‘बॅक्टेरियोफेज थेरपी’ हा आधुनिक औषधशास्त्रात उदयोन्मुख पर्याय आहे. आजच्या काळात प्रतिजैविकांना प्रतिरोधक बनणार्‍या बॅक्टेरियांचा प्रश्न गंभीर झाला आहे. गंगाजलातील बॅक्टेरियोफेजेस या समस्येवर नैसर्गिक उपाय ठरू शकतात. उदाहरणार्थ बॅक्टेरियोफेजेसचा वापर करून विशिष्ट बॅक्टेरियांचा नाश करणारी औषधे सिद्ध केली जाऊ शकतात, ज्याचा लाभ जखमेच्या उपचारात किंवा संसर्गजन्य रोगांवर होऊ शकतो. डॉ. मिश्रा यांच्या मते गंगेच्या जंतुनाशक गुणधर्मांचा अभ्यास करून त्यातील सक्रीय घटक वेगळे करता येतील. हे घटक औषधांच्या निर्मितीत वापरले जाऊ शकतात, विशेषतः जंतुसंसर्गजन्य रोगांविरुद्ध. उदाहरणार्थ जंतुनाशक मलमे, द्रावण किंवा इंजेक्शन्स सिद्ध करण्यात याचा उपयोग होऊ शकतो. गंगेच्या विशिष्ट गुणधर्मांचा वापर करून रासायनिक जंतुनाशकांऐवजी नैसर्गिक पर्याय विकसित करता येतील. हे पर्यावरणपूरक आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असतील.

गंगास्नानविषयीचे एक प्रातिनिधिक छायाचित्र

६. गंगेविषयी संस्कृतमध्ये असलेले विविध श्लोक

जे आधुनिक काळात वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झाले आहे, तेच आपल्या विविध संस्कृत श्लोकांमध्ये आधीच वेगवेगळ्या पद्धतीने मांडले गेले आहे, तेही आपण अभ्यासले पाहिजे!

अ. गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।।

अर्थ : हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी नामक नद्यांनो, या स्नानासाठीच्या जलात तुम्ही यावे.

आ. गङ्गातोयं पिबन्नित्यं सर्वपापैः प्रमुच्यते ।
तस्याः स्पर्शनमात्रेण मुक्तिः स्याद् दुरितात् सदा ।।

अर्थ : नित्य गंगाजल प्राशन करणारा सर्व पापांपासून मुक्त होतो. तिच्या स्पर्शानेही नेहमी दुःखापासून मुक्ती मिळते.

इ. पावनं सर्वतीर्थानां गङ्गाजलमिति श्रुतम् ।
स्नानात् पानात् च सर्वं च पापं नश्यति तत्क्षणात् ।।

अर्थ : सर्व तीर्थांमध्ये गंगाजल पवित्र आहे, असे श्रुतींमध्ये सांगितले आहे. त्यात स्नान करण्याने आणि ते पाणी पिण्याने सर्व पापे क्षणात नष्ट होतात.

ई. आद्यशंकराचार्यांनी जे ‘गंगास्तोत्र’ लिहिले आहे, त्यात
देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे ।
शङ्करमौलिविहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले ।।
– गङ्गास्तोत्र, श्लोक १

अर्थ : हे देवी, देवांचीही देवी, भगवती गंगे, तू तीनही लोकांना तारणारी आणि तरल तरंगांनी युक्त आहेस. तू शंकराच्या मस्तकावर विहार करणारी आणि निर्मळ आहेस. माझे मन तुझ्या चरणकमली स्थिर राहो.

उ. पापं तापं व्याधिं च दहति गङ्गाजलकणः ।
सर्वं विश्वं पुनाति च तव दर्शनमात्रतः ।।

अर्थ : गंगेच्या पाण्याचा एक थेंब पाप, ताप (दुःख) आणि व्याधी यांचा नाश करतो. तुझ्या दर्शनानेच संपूर्ण विश्व पवित्र होते.

हा श्लोक गंगेच्या औषधी गुणधर्मांचा आणि शुद्धीकरणाच्या सामर्थ्याचा उल्लेख करतो. तिचे पाणी रोगनाशक मानले जाते, जे वैज्ञानिक संशोधनाशीही सुसंगत आहे.

ऊ. गङ्गा गङ्गेति यः स्मरेत् दशजन्मकृतं पापम् ।
तत्क्षणात् विलयं याति गङ्गायाः स्मरणं शुभम् ।।

अर्थ : जो ‘गंगा, गंगा’ असे स्मरण करतो, त्याच्या १० जन्मांचे पाप तत्क्षणी नष्ट होते. गंगेचे स्मरण शुभ आहे.

ए. नमामि गङ्गां शिरसा यया जलं विश्वस्य पापं हरति क्षणेन च ।
सर्वं च रोगं शमति स्वदर्शनात् तां देवनदीं प्रणतोऽस्मि नित्यम् ।।

अर्थ : मी गंगेला शिर नमवून नमस्कार करतो, जिच्या पाण्याने विश्वातील पाप क्षणात नाहीसे होते. तिच्या दर्शनाने सर्व रोग शांत होतात. मी त्या देवनदीला नित्य प्रणाम करतो.

ऐ. गङ्गा तव जलं शीतं सर्वदोषविवर्जितम् ।
पापतापहरं पुण्यं त्वत्स्पर्शात् सर्वं शुभम् ।।

अर्थ : गंगे, तुझे जल थंड, सर्व दोषांपासून मुक्त, पाप-ताप नष्ट करणारे आणि पुण्यकारक आहे. तुझ्या स्पर्शाने सर्व काही शुभ होते.

ओ. गङ्गा जलं महातीर्थं सर्वरोगविनाशनम् ।
तव दर्शनात् सर्वं च विश्वं पावति निर्मलम् ।।

अर्थ : गंगेचे जल हे महान तीर्थ असून सर्व रोगांचा नाश करते. तुझ्या दर्शनाने संपूर्ण विश्व निर्मळ (शुद्ध) होते.

७. गंगामातेचे ‘गंगापण’ अबाधित होते, आहे आणि राहील !

गंगा आणि तिचे करुणामय जल यांवर किती बोलावे अन् लिहावे, ते कमीच आहे. शुद्धता, रोगनाशक क्षमता, पापमुक्ती, सर्वव्यापी प्रभाव यांचे अन्योन्य प्रतीक, म्हणजे गंगाजल होय. उगाच तिला माता किंवा मैया म्हटले जात नाही. गंगेचे शरीर मलिन अवश्य झालेले असेल; पण ‘गंगापण’ अबाधित होते, आहे आणि राहील. तिच्या शुद्धीकरणाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत; म्हणून प्रयत्न थिटे होत नसतात. त्यात सुधारणा होत जातात. जसे त्यावर आपण बोलतो, तसेच आपण आपल्या ‘आत’मध्येही एकदा बघून घ्यावे. त्याहून गंगामाई अधिक शुद्धच आणि सिद्धच आहे, हे निःसंशय !

(समाप्त)

– अमोल पाध्ये, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य योग धाम, नाशिक.