प्रवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठीची सदोष ऑनलाईन यंत्रणा राज्यशासन दुरुस्त करणार !

‘सनातन प्रभात’च्या बातमीचा परिणाम !

  • सदोष तक्रार निवारण प्रणाली आणि ‘मोबाईल ॲप’ यांच्या दुरुस्तीसाठी राज्यशासनाकडून निधीची घोषणा !

  • प्रणाली चालवण्यासाठी ‘महाआयटी’ची नियुक्ती !

मुंबई, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – परिवहन आयुक्त कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालये (प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये) येथील तक्रार निवारण प्रणाली अन् ‘मोबाईल ॲप’ यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्यशासनाने एका वर्षासाठी २२ लाख ७४ सहस्र ६५७ रुपये संमत केले आहेत, तसेच हे हाताळण्याचे दायित्व ‘महाआयटी’कडे देण्यात आले असून त्यासाठी वर्षाला १५ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १८ मे २०२२ च्या दिवशीच्या अंकामध्ये याविषयी प्रथम आवाज उठवण्यात आला होता, तसेच परिवहन विभागाच्या (आर्.टी.ओ.च्या) विविध प्रश्नांविषयी ऑक्टोबर २०२२ मध्ये वृत्तमालाच प्रसिद्ध करण्यात आली होती.

महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाकडून ८ फेब्रुवारी या दिवशी याविषयीचा शासन आदेश काढला आहे. या आदेशामध्ये परिवहन विभागाचे संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप यांच्या नियंत्रणाचे काम ‘महाआयटी’ या आस्थापनाकडे सोपवण्यात आल्याचे म्हटले आहे.

१. मोटार वाहन विभागाच्या (परिवहन विभागाच्या)  ‘https://transport.maharashtra.gov.in’ या संकेतस्थळावरील ‘नागरिक सेवा’ अंतर्गत तक्रारी करण्यासाठी ‘संकेतस्थळ’ आणि ‘अँड्रॉइड मोबाईल ॲप’ यांची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र तक्रारी करण्यासाठीच्या या दोन्ही व्यवस्था बंद असल्याचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मधूनच प्रथम प्रसिद्ध करण्यात आले होते.

२. खासगी ट्रॅव्हल्सकडून भरमसाठ तिकीटदर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट चालू असूनही परिवहन आयुक्तांनी यावर कारवाई करण्याविषयी प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांसाठी आदेश काढला.

३. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने साहाय्यक परिवहन आयुक्त अभय देशपांडे यांची भेट घेतली असता त्यांनी याविषयी लेखी तक्रार करण्याचे आवाहन केले होते; मात्र तक्रार करण्याच्या दृष्टीने प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.

४. परिवहन विभागाची कार्यालयेही जिल्हा पातळीवर असल्यामुळे लेखी तक्रार करण्यासाठी खेड्यापाड्यांतील, तसेच तालुकापातळीवरून तक्रारदार प्रवासी जिल्हास्तरावर कसे जाणार ? आदी प्रश्न दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उपस्थित करण्यात आले होते.

‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी ‘आर्.टी.ओ.’मधील तक्रार निवारण व्यवस्थेविषयी घेतला आढावा !

ऑक्टोबर २०२२ मध्ये ‘सनातन प्रभात’चे मुंबईतील प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांच्या पुढाकाराने कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी विविध जिल्ह्यांतील ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्यांतील आर्.टी.ओ. कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष संपर्क करून तक्रार निवारणासाठी असलेल्या संपर्क यंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये काही कार्यालयांतील दूरभाष बंद असणे, काही ठिकाणी दूरभाष उचलण्यासाठी कर्मचार्‍याची नियुक्ती नसणे, तर काही ठिकाणी तक्रारीसाठी व्यवस्थाच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या वृत्तामध्ये परिवहन विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका करून प्रवाशांना तक्रार नोंदवता येण्यासाठी सुविधा निर्माण करण्याविषयी आवाहन करण्यात आले होते.

‘मोबाईल ॲप’ आणि संकेतस्थळावरील यंत्रणा दोन्ही चालू होणार ! – विवेक भीमनवार, आयुक्त, परिवहन विभाग

विवेक भीमनवार

यापुढे तक्रारीसाठीचे ‘मोबाईल ॲप’ आणि ‘संकेतस्थळावरील यंत्रणा’ असे दोन्ही कार्यरत होणार आहे. त्यासाठी ‘महाआयटी’ या आस्थापनाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईन तक्रारी करता येतील.

सुराज्य अभियानाकडून नादुरुस्त यंत्रणेविषयी आयुक्तांकडे करण्यात आल्या तक्रारी !

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची होणारी लूटमार आणि परिवहन विभागाची तक्रार निवारणासाठीची सदोष यंत्रणा यांविषयी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाने २३ मे २०२२ या दिवशी तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, तसेच सध्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची १८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री यांच्यासह राज्यातील विविध १३ जिल्ह्यांतील परिवहन कार्यालयांमध्येही तक्रारी करण्यात आल्या होत्या.

‘ऑनलाईन’ तिकिटदर नियंत्रित करण्याविषयी ठोस भूमिका घ्यावी ! – अभिषेक मुरुकटे, सुराज्य अभियान, हिंदु जनजागृती समिती

श्री. अभिषेक मुरकटे

शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यासह ‘ऑनलाईन’ तिकीटदरात कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे प्रवाशांची उघडपणे लुटमार चालू आहे. सरकारने ही फसवणूक रोखण्यासाठीही सरकारने ठोस कारवाई करावी.

अवैध भाडेवाढ करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांसंदर्भातील अधिक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा