‘आंतरराष्‍ट्रीय हॉलोकॉस्‍ट स्‍मृतीदिना’निमित्त मंत्रालयात ज्‍यूंच्‍या नरसंहाराचे छायाचित्र प्रदर्शन !

मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) – ‘आंतरराष्‍ट्रीय हॉलोकॉस्‍ट (नरसंहार) स्‍मृतीदिना’निमित्त इस्रायलचा वाणिज्‍य दूतावास आणि महाराष्‍ट्राचा पर्यटन विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने नाझी जर्मनीकडून ज्‍यूंच्‍या झालेल्‍या नरसंहाराचे २७ जानेवारी या दिवशी मंत्रालयात छायाचित्र प्रदर्शन लावण्‍यात आले होते. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासाठी पुढाकार घेतला.

हिटलरच्‍या राजवटीत जर्मन आणि त्‍यांचे सहयोगी यांनी ज्‍यूंचा नायनाट करण्‍याच्‍या उद्देशाने केलेला पद्धतशीर नरसंहार ‘आंतरराष्‍ट्रीय हॉलोकॉस्‍ट’ या नावाने ओळखला जातो. वर्ष १९३८ ते वर्ष १९४५ या कालावधीत जवळपास ६० लाख ज्‍यूंची हत्‍या करण्‍यात आली होती. संपूर्ण जर्मनीमध्‍ये ज्‍यूंची सहस्रावधी उपासनास्‍थळे, घरे आणि व्‍यावसायिक साहित्‍य जाळण्‍यात आले, भूईसपाट करण्‍यात आले. सहस्रो ज्‍यूंना अटक करून त्‍यांची छळछावण्‍यांमध्‍ये निर्वासित म्‍हणून रवानगी करण्‍यात आली. असंख्‍य ज्‍यूंना ‘गॅस चेंबर’मध्‍ये (बंद खोलीत विषारी वायू सोडून मारणे) आणि सहस्रो ज्‍यूंना गोळ्‍या घालून ठार मारण्‍यात आले. ज्‍यूंचा इतिहास पहाता जवळजवळ २ सहस्र वर्षे विविध देशांमध्‍ये ज्‍यू ‘अल्‍पसंख्‍यांक’ म्‍हणून जीवन जगले. त्‍यानंतर ज्‍यूंनी एकत्रित येऊन ‘इस्‍त्रायल’ हे राष्‍ट्र निर्माण केले.

प्रदर्शनात लावण्‍यात आलेली छायाचित्रे

लक्षवेधी

जर्मनीतील ज्‍यूंच्‍या नरसंहारातून वाचलेल्‍यांपैकी इटलीमधील एक ज्‍यू वंशाचे लेखक प्रिमो लेव्‍ही यांचे प्रदर्शनस्‍थळी देण्‍यात आलेले पुढील वाक्‍य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ‘ते घडले, त्‍यामुळे ते पुन्‍हा घडू शकते. आम्‍हाला जे म्‍हणायचे आहे याचा हा गाभा आहे.’