पालेभाज्या : समज-अपसमज !

‘आपल्याला पालेभाज्या मुद्दाम आणि भरपूर किंवा प्रतिदिन खायची आवश्यकता नसते. ‘जेव्हा खायच्या, तेव्हाही आधी वाफवून, पिळून आणि तेल किंवा तूप यांची फोडणी देऊनच खाव्यात’, असे शास्त्रात सांगितले आहे. तसेही पालेभाज्यांचे आयुष्य किती अल्प असते ? त्या शरिरात जाऊन त्यांच्यासारखेच अल्पजीवी घटक सिद्ध करतात. त्यामुळे भाज्यांचे अती प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी अयोग्य आहे.

पालकाची भाजी

१. पालेभाज्या सेवन केल्याने जीवनसत्त्व मिळते, ही अंधश्रद्धा !

गोडसेकाकू आणि त्यांची लेक एकदा भाजीबाजारात मला भेटल्या. आठवा मास पूर्ण होऊन नववा चालू झाल्याने लेकीची चाल मंदावली होती. मूळच्या गोर्‍या वर्णावर चांगला तजेला आला होता. मुद्रा चांगली, प्रसन्न आणि हसरी दिसत होती. गोडसेकाकूंनी मला अभिमानाने सांगितले. ‘‘प्रतिदिन संध्याकाळी बाहेर पडायचे आणि एक फेरी मारून यायचीच’, असे मी तिला सांगूनच ठेवले आहे. येतांना ती बाजारात येते आणि तिला आवडणारी एक पालेभाजी घेते. संध्याकाळच्या जेवणात मस्तपैकी पालेभाजी आणि कोशिंबीर देते तिला. ‘व्हिटामिन्स’ (जीवनसत्त्व)आणि ‘आयर्न’ (लोह) यांची कसलीच आवश्यकता नाही. आधुनिक वैद्यही (डॉक्टर) म्हणाले, ‘एकदम छान ठेवले आहे, तुम्ही लेकीला !’’

तात्पर्य : गर्भिणीला प्रतिदिन पालेभाजी खायला घालून गोडसेकाकू खूश होत्या.

दुसरा एक प्रातिनिधिक प्रसंग ! पराग आणि प्रणिता हे त्यांच्या ५ वर्षांच्या परीला घेऊन आले. आजाराची चर्चा झाली. त्यानंतर मी पथ्य सांगायला आरंभ केला. मध्येच प्रणिता म्हणाली, ‘‘ही पालेभाज्या अजिबात खात नाही, तुम्हीच सांगा जरा, म्हणजे ऐकेल. पालेभाज्यांमध्ये शक्ती असते कि नाही ?’’ ‘तू कधीपासून पालेभाज्या खायला लागली ? अजून तरी आवडीने खातेस का ?’, असे तिला विचारायची मला तीव्र इच्छा झाली; पण तो विचार बाजूला सारून पालेभाज्यांविषयी आयुर्वेदात जे काही सांगितले आहे, ते मी तिला ऐकवले. त्यावर तिला काय बोलावे, हेच सुचेना !

वैद्या सुचित्रा कुलकर्णी

२. पचायला जड, रुक्ष आणि मलावष्ठंभ करणार्‍या सर्व भाज्यांमुळे शरिरात वात अन् मल यांची निर्मिती !

रोहन गायकवाड, त्याचे वडील आणि त्याचे आजोबा असे तिघे जण रोहनची प्रकृती दाखवायला माझ्याकडे पुष्कळ दूरवरून आले. इतक्या लांबच्या रुग्णांना मी सामान्यतः त्यांच्या जवळचा वैद्य शोधण्याचा सल्ला भ्रमणभाषवरच देते; कारण कधी त्यांना कंटाळा येतो, कधी थोडे बरे वाटायला लागले की, ते मनानेच औषध बंद करतात. मग आजार पुन्हा डोके वर काढतो. सांगतांना मात्र हे रुग्ण सांगतात, ‘‘आम्ही आयुर्वेदाचे औषध घेऊन बघितले; पण गुण आला नाही.’’

शास्त्राची ही अकारण होणारी मानहानी टाळण्यासाठी मी रुग्णांना दूरवरून बोलवण्याचे टाळते; पण गायकवाड माझ्याकडे येण्याचा हट्ट धरून बसले आणि सांगितल्याप्रमाणे आलेही. ‘‘हा आमचा नातू रोहन ८ वीत आहे आणि त्याची तब्येत अजिबात सुधारत नाही अन् त्याला पोटाचाही त्रास आहे’’, असे त्यांनी सांगितले. ‘‘काय त्रास होतो पोटाचा ?’’, असे मी रोहनला विचारले.

‘‘मध्येच पोट सतत भरल्यासारखे वाटते. दिवसातून ४-५ वेळा शौचास होते. जुलाब नाही होत; पण शौचाला होते आणि भूकही लागत नाही’’, रोहनने चुणचुणीतपणे उत्तर दिले. ‘‘जळजळ, मळमळ आणि उलटी असे इतर काही होते का त्याच्या जोडीला ?’’ मी विचारल्यावर तो ‘नाही’ म्हणाला. ‘‘प्रकृती सुधारत नाही म्हणजे काय ? वजन किंवा जाडी वाढत नाही का ?’’ ‘‘तसे नाही हो ‘मॅडम’ ! आमच्या घरात सगळ्यांचीच प्रकृती बारीक आहे; पण हा पुष्कळ बारीक आणि अशक्तही आहे. सतत आजारी पडतो आणि त्याची शक्तीही अल्प पडते. आमच्या गावाकडे याच्या वयाची मुले किती कामे करतात, ओझी उचलतात ! याला ते जमत नाही. बरं, अभ्यासात म्हणावे, तर याला परीक्षेत काही आठवतच नाही. याचे केसही पांढरे व्हायला लागले आहेत. अहो, याला साधे वेगाने पळता येत नाही. वर्षभरापूर्वीपर्यंत बरा होता. वर्ष झाले, याची नवनवीन गार्‍हाणी चालूच असतात.’’

आजोबांनी इतकी विविध प्रकारची लक्षणे संगितली की, त्यांचा काही मेळच बसेना, कशाचाच कशाशी संबंध नाही. सगळी ‘व्हेग’ (अनिश्चित) लक्षणे ! कुठल्याही एकाच आजारात न दिसणारी. ‘आता याची कारणे शोधायला हवीत’, असा विचार माझ्या मनात चालू असतांनाच रोहनचे बाबा म्हणाले, ‘‘तरी आम्ही याची किती काळजी घेतो ! लहानपणापासून त्याला बदाम देतो, घरच्या भारतीय गायीचे तूप देतो. याच्या आईने आहारशास्त्राचा एक अभ्यासक्रमच केला आहे. ती याला ६ वर्षांचा असल्यापासून प्रतिदिन पालेभाजीचे सूप किंवा पालेभाजी देते.’’

‘‘काय ? प्रतिदिन पालेभाजीचे सूप ? तेही इतकी वर्षे ?’’ मला रोहनची दया आली. ‘‘हो, म्हणजे हा कटकट करतो; पण याची आई बळजोरीने देते. तुम्हीच समजावून सांगा याला’’, गायकवाड म्हणाले.

माझ्या डोळ्यांसमोर मात्र तातडीने ‘भावप्रकाश’ या आमच्या ग्रंथातील भाज्यांविषयीचे श्लोक अगदी मूर्तीमंत उभे राहिले. त्यात स्पष्ट म्हटले आहे की, सगळ्या भाज्या पचायला जड, रुक्ष आणि मलावष्ठंभ करणार्‍या असतात. त्या पोटात वात आणि मल यांची पुष्कळ निर्मिती करतात. हाडे, रक्त, शुक्र (प्रजनन करणारा शरीर धातू), वर्ण, दृष्टी, हुशारी आणि स्मरणशक्ती या शरीरभावांचा त्या नाश करतात. अतीप्रमाणात भाज्या खाल्ल्याने केस पांढरे होतात. शरिराची गती अल्प होते. भाज्यांमध्ये सगळे रोग निवास करतात. भाज्या शरिराचे भेदन (शरीरधातूंच्या वाढीत अडथळा आणतात.) करतात. त्यामुळे बुद्धीमान माणसाने भाज्या अतीप्रमाणात खाऊ नयेत.

रोहनची लक्षणे भाज्यांच्या दुष्परिणामांशी तंतोतंत जुळत होती. ६ वर्षे प्रतिदिन पालेभाजी खात असल्याचे कारण धडधडीतपणे समोर आले होते. ही पालेभाज्यांची देण होती ! म्हणजे रोहनच्या एकूण समस्यांचे मूळ सापडले होते; पण गायकवाड यांना ते समजावून सांगणे, हे कठीण काम होते. (अशी फारच कठीण कामे आमची वैद्य मंडळी त्यांच्या रुग्णालयात नेटाने करत असतात.) ज्याअर्थी इतकी वर्षे रोहनला सातत्याने पालेभाजी दिली जात होती, त्याअर्थी या लोकांची पालेभाजीवर नक्कीच ‘अंधश्रद्धा’ असणार, हे निश्चित ! त्यातून रुग्णाला बाहेर काढणे अवघडच; पण ते काम करायला तर हवे होते.

३. पालेभाज्यांच्या जोडीला कडधान्यांचे सेवन शरिराला मानवणारे असते ! 

मी हे सगळे समजावून सांगताच आजोबा कडाडले, ‘‘काहीतरी या तरुण पिढीची ‘फॅड’ बघा. अहो, असे पुस्तकात वाचून जेवतात होय कधी ? रागावू नका; पण तुम्हाला सांगतो, ‘मॅडम’ मी यांना किती वेळा सांगितले की, हे देऊ नका त्याला. अहो, आम्ही शेतकरी माणसे. आम्ही आयुष्यभर आमच्या शेतात जे पिकले, तेच जेवत आलो आहे. प्रतिदिनच्या जेवणात आम्ही डाळ-भात, आमटी-भाकरी, पिठलं-भाकरी, तिळाची, दाण्याची, लसणाची किंवा जवसाची चटणी, घरच्या गायीच्या दुधाचे दही, नाही तर ताक इतकेच पदार्थ घ्यायचो. भाज्या प्रत्येक दिवशी नसायच्याच. एक दिवसाआड असायच्या. डाळ किंवा कडधान्ये मात्र प्रतिदिन असायचे. पालेभाज्या कधीतरी १५ दिवसांतून एकदा. विशेषतः पावसाळ्यात असायच्या. अजून आम्ही चांगले ठणठणीत आहोत. अजूनही शेतात ८ घंटे काम करतो. माझे केस बघा अजून काळे आहेत. म्हणूनच हे लोक ऐकत नाहीत कि काय कुणास ठाऊक ? केस पांढरे झाले असते, तर उगीच नाही पांढरे झाले, असे तरी म्हणू शकलो असतो.’’ आजोबांनी शाब्दिक विनोदाचा आधार घेत त्याचे कुणी ऐकत नसल्याची खंत सौम्यपणे व्यक्त केली.

‘‘अहो, पण डॉक्टर सांगतात भरपूर पालेभाज्या खा आणि तुम्ही सांगता खाऊ नका. आम्ही सामान्य माणसाने कुणाचे ऐकायचे ?’’, रोहनच्या वडिलांनी प्रातिनिधिक प्रश्न विचारला. ‘‘कुणाचे म्हणजे ? हा काय प्रश्न झाला ? आपल्या गावात, आपल्या हवेत आपण काय खाल्लेले चांगले, हे काय आपल्याला ते पाश्चात्त्य लोक शिकवणार का ?’’ आजोबा त्यांच्या मतावर ठाम होते.  ‘‘अहो आजोबा, यांची चूक नाही हो. यांना शाळेत सगळी विदेशी शास्त्र शिकवली जातात, मग यांची विचार करण्याची पद्धतच पालटते ना ?’’, मी म्हटले. ‘‘आम्हाला पण शाळेत भरपूर पालेभाज्या खाव्यात’, असेच शिकवले आहे.’’ रोहनला चक्क अभ्यासातील गोष्ट आठवली.

४. विदेशातील लोक मांसाहार करत असल्याने त्यांना पालेभाज्या खाण्याचा सल्ला देण्यात येणे योग्य आहे.

पाश्चात्त्य देशांमध्ये लोक मुख्यतः मांसाहार करतात, म्हणजे १२ मास, तिन्ही त्रिकाळ मांसच खातात. त्यांच्या आहारात शाकाहारी पदार्थ नगण्य असतात. असतो तो पाव. मांसही ते नुसते वाफवून मीठ घालून खातात. चवीला ‘सॉसेस’ घेतात. जोडीला पाण्याऐवजी मद्य. हे सगळे पदार्थ कमालीचे रूक्ष असतात आणि त्यात तंतूमय पदार्थ अल्प पडतात. त्यामुळे ‘मलावष्टंभ’ ही त्यांची मुख्य समस्या असते. त्यासाठी त्यांना पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.

आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडचे मांसाहारी लोक प्रतिदिन मांसाहार करत नाहीत. आठवड्यातून २-३ दिवस करतात. त्यातही घरी जेवणार असतील, तर मांसाहार घेतात आणि त्याच्यासमवेत भाकरी, भात किंवा पोळी असे तंतूमय पदार्थ असतातच. मांस शिजवतांनाच त्यात कांदा, लसूण आणि कोथिंबीर असे शाकाहारी घटक घालतातच. आपण पाणीही पुरेसे पितो. त्यामुळे पालेभाज्या आपल्याला मुद्दाम आणि भरपूर किंवा प्रतिदिन खाण्याची आवश्यकता नसते. ‘जेव्हा खायच्या, तेव्हाही आधी वाफवून, पिळून, तेल किंवा तुपाची फोडणी देऊनच खाव्यात’, असे शास्त्रात सांगितले आहे. तसेही पालेभाज्यांचे आयुष्य किती अल्प असते ? त्या शरिरात जाऊन त्यांच्यासारखेच अल्पजीवी घटक सिद्ध करतात. आपल्याला तर शरीर दीर्घजीवी बनवायचे आहे. मग कसे चालेल ?’’

५. गायीचे दूध, दही, ताक, लोणी आणि तूप म्हणजे जीवनसत्त्वे अन् धातू यांचा मोठा खजिना !

‘‘पालेभाज्यांमध्ये असलेले तंतूमय पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्त्वे आपल्याला कशी मिळणार ?’’, रोहनच्या वडिलांनी शंका व्यक्त केली. ‘‘इतर शाकाहारी पदार्थांमधील आपल्या गायीचे दूध, दही, ताक, लोणी आणि तूप, म्हणजे जीवनसत्त्वे अन् धातू यांचा खजिना आहे. सगळी धान्ये कोंड्यासह आणि डाळी सालीसकट खाल्ल्या की, पाहिजे तेवढे तंतू पोटात जातात. या सगळ्या पदार्थांची पालेभाज्यांइतकी हानीही नसते.’’

‘‘असे असेल, तर आपल्याकडे कुणालाच ‘मलावष्टंभ’ व्हायला नको.’’ शिकलेल्या लोकांचा संशय एकमार्गी असतो. ‘‘आपल्या खाण्याच्या या पद्धतींमुळे आपल्याकडे त्या देशांच्या मानाने मलावष्टंभाची समस्या अल्प प्रमाणात आहे. किंबहुना होती, हे खरे आहे. तंतूमय पदार्थांची न्यूनता हे मलावष्टंभाचे एकमेव कारण नसते. व्यायाम आणि स्निग्ध पदार्थ यांचा अभाव, तसेच उपासमार अशी अन्य कितीतरी कारणे असतात. कारण न शोधता नुसताच पाला चरत राहिल्याने लाभ होईल कि हानी ? हे तुम्हीच सांगा.’’ माझ्या या प्रश्नावर रोहनचे बाबा विचारमग्न झाले.

‘‘हो, हीसुद्धा सूत्रे लक्षात घ्यायला हवीत. पटले, न पटलेच्या कुंपणावर असल्यासारखे ते बोलले. ‘‘मग पालेभाज्या खायच्याच नाहीत ?’’, आता हा टोकाचा प्रश्न ! ‘‘प्रतिदिन निश्चित नाही. प्रतिदिन खाल्ले, तरी चालतात, असे आहारीय पदार्थ मोजकेच आहेत. ज्या ऋतूत ज्या भाज्या पिकतात, त्या आवडीनुसार अवश्य खाव्यात. त्याही आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीने. शेवटी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. पटायला अवघड आहे; पण हिताचा विषय असल्याने मी तो मांडत रहाते.’’

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी, आहारतज्ञ

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, २१.८.२०१०)