श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भावसोहळ्यात उलगडलेली त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये !

सप्तर्षींनी ज्यांना ‘श्री महालक्ष्मीचा अवतार’ म्हणून गौरवले आहे, अशा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! त्यांच्या आगमनानेच आश्रमात उत्सवाचे वातावरण निर्माण होते ! साधकांच्या मुखावर आनंद दिसतो आणि त्यांचा थोडा तरी सहवास लाभावा, यासाठी प्रत्येक साधक धडपड करतो ! देवता, सप्तर्षी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा संपादन करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस हा एक आध्यात्मिक उत्सवच झाला ! ७.१२.२०२२ या दत्तजयंतीच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त भावसोहळा झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे कुटुंबीय आणि काही साधक यांच्या उपस्थितीत हा भावसोहळा पार पडला.

या शुभप्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना भेटवस्तू दिली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले, तसेच सप्तर्षींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी काढलेल्या गौरवोद्गारांविषयी उपस्थितांना अवगत केले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी या वेळी ‘जय शारदे वागीश्वरी’ हे गीत गाऊन श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्वाची आराधना केली !

 सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनचे संत आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे माता-पिता पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि पू. सदाशिव परांजपे यांनी सनातनचे ३ गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वेदमंत्रोच्चारांसहित आरती केली. या वेळी सनातनच्या पुरोहितांनी वेदमंत्रोच्चारण केले. सप्तर्षींच्या आज्ञेने सामवेदाचे गायनही करण्यात आले. 

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची कुटुंबियांनी कथन केलेली गुणवैशिष्ट्ये

१. आपलेपणाने बोलून सर्वांशी जवळीक साधण्याची कला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली यांना लहानपणापासूनच अवगत ! – पू. सदाशिव परांजपे (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वडील)

भक्तासमोर श्री महालक्ष्मीदेवी प्रकट झाली, तर ‘त्याची कशी स्थिती होईल ?’, तशी माझी स्थिती झाली आहे; परंतु आपल्या मुलीचे कौतुक केले पाहिजे, या भावनेने मी ४ शब्द सांगत आहे.

वर्ष २०२१ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली हिच्या समवेत आम्ही काही तीर्थक्षेत्री गेलो होतो. त्या वेळी लक्षात आले की, तेथील अनेकांशी तिची ओळख आहे. मंदिरांमध्ये गेल्यावर अनेक जण स्वतःहूनच तिच्याशी बोलायला आले. आम्ही ज्या ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य केले, त्या सर्व हॉटेलमध्ये ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आल्या आहेत’, हे कळल्यानंतर हॉटेलचे मालक तिला भेटायला खोलीत आले. ‘माताजी’, असे संबोधून ते अत्यंत आदराने तिची विचारपूस करत होते. तिला काय हवे-नको, ते स्वतःहून देत होते. अशा प्रकारे सर्वांशी आपलेपणाने बोलून त्यांच्याशी जवळीक साधण्याची कला तिला लहानपणापासूनच अवगत आहे.

२. ‘श्री गुरूंनी शिष्याचा जन्मोत्सव साजरा करणे’, हे न भूतो न भविष्यति ! – पू. (सौ.) शैलजा परांजपे (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आई)

अनेक ठिकाणी शिष्य गुरूंचा जन्मोत्सव साजरा करतात; परंतु साक्षात् श्री गुरूंनी, परात्पर गुरु डॉक्टरांनी शिष्याचा जन्मोत्सव साजरा करणे, हे ‘न भूतो न भविष्यति ।’ आहे ! प्रत्यक्ष परमात्मा भक्ताचा वाढदिवस साजरा करतो आणि आशीर्वाद देतो, हे मी कलियुगात प्रथमच अनुभवत आहे. ‘ज्याप्रमाणे आपण दत्तजयंती, श्रीकृष्णजयंती साजरी करतो, त्याचप्रमाणे यापुढे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सनातनच्या तिन्ही गुरूंची जयंती साजरी करायला हवी’, असे मला वाटते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे कार्य वेगळे असले, तरी कार्यकारणभाव एकच आहे.

अंजली, यशोदेवर असलेल्या योगमायेच्या आवरणामुळे तिला ‘कान्हा कोण आहे’, हे कळतच नव्हते. त्याप्रमाणे माझ्यावर असलेल्या मायेच्या आवरणामुळे ‘तू कोण आहेस’, हे माझ्या लक्षातच येत नाही. माझ्या दृष्टीने तू अजून लहानच आहेस. आम्हाला प्रवासातील अनुभव आणि अनुभूती सांगतेस, तेव्हा प्रवासात तुला होत असलेल्या कष्टांविषयी जराही कळू देत नाहीस. ते मात्र तूच सहन करतेस. तुला पुढील कार्यासाठी आशीर्वाद ! मागील सर्व युगांत असुरांचा नाश करण्याचे कार्य शक्तीनेच केले आहे. त्याचप्रमाणे कलियुगातील रज-तमाचे निर्मूलन करण्याचे कार्य तुझ्याकडून घडू दे.

३. अनेक क्षेत्रांत परिपूर्णतेने कार्य करून श्रीगुरूंची कृपा संपादन करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे पती)

अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास ‘सर्वांचे आवडते व्यक्तीमत्त्व !’, असेच करावे लागेल. ‘सर्वांशी जवळीक करणे’, हा गुण त्यांच्यात उपजतच आहे. त्या गुणाचा त्यांनी साधनेसाठी लाभ करून घेतला. साधनेत आल्यानंतर प्रथम त्यांनी सर्व साधकांशी जवळीक केली. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलून सर्वांना आपलेसे केले. जेव्हा त्यांना मंदिरांना भेटी देऊन तेथील अमूल्य आध्यात्मिक ठेवा जतन करण्याची सेवा मिळाली, तेव्हा त्यांनी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी आणि तेथील स्थानिक साधक अशा सर्वांना आपल्या उपजत गुणांनी आपलेसे केले.

आ. सर्वांना मोकळेपणाने आणि सहजतेने ज्ञान दिले. ज्या ज्या मंदिरांचे आपण चित्रीकरण केले होते, त्यांना त्यांच्या मंदिराची माहिती असलेल्या ध्वनीचित्र-चकत्या दिल्या. या सगळ्याने भारावून जाऊन ते सर्व इतके चांगल्या प्रकारे जोडले गेले आहेत की, आता श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली तेथे जाणार; म्हणून केवळ भ्रमणभाषवर निरोप दिला, तरी ते आनंदाने तेथील सर्व व्यवस्था करून ठेवतात.

इ. संगीत, कला, स्थापत्य, वास्तूशास्त्र, विज्ञान आदी अनेक क्षेत्रांतील मान्यवरांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली यांनी श्री गुरूंच्या कार्याशी जोडले आहे.

ई. पूर्वी आश्रमांमध्ये विविध सोहळे होत असत. त्या सोहळ्यांमध्ये भावनिर्मितीसाठी त्या ज्या काव्यपंक्ती बनवत असत, त्या गुरुदेवांना पुष्कळच आवडत असत.

उ. अमूल्य आध्यात्मिक वस्तूंचे जतन करणे, ज्ञानप्राप्ती करणे, साधक, संत आणि मान्यवर यांच्या मुलाखती घेणे, अशा सर्वच क्षेत्रांत अत्यंत परिपूर्णतेने कार्य करून त्यांनी श्री गुरूंचे मन जिंकले आहे.

ऊ. आम्ही साधनेला आरंभ केला, तेव्हा गुरुदेव सर्वांच्या छायाचित्रांचे परीक्षण करत असत. तेव्हा साधकामध्ये सकारात्मक स्पंदने आहेत कि नकारात्मक हे ते अधिक (+) किंवा वजा (-) १ ते १० अंकांमध्ये सांगत असत. त्यामध्ये ‘+१’, असे असेल, तर ‘त्या साधकात सकारात्मक स्पंदने आहेत’ आणि ‘-१’ असे परीक्षण आले, तर ‘त्या साधकात नकारात्मक आणि त्रासदायक स्पंदने आहेत’, असे समजले जात असे. त्या वेळी गुरुदेवांनी माझे परीक्षण ‘+१’ असे करून सकारात्मक स्पंदने असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी त्यांनी माझ्या छायाचित्राचे परीक्षण करून ‘सकारात्मक एक’ असे केले होते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली यांचे त्या वेळचे परीक्षण ‘-५’ असे होते. यातून लक्षात येते, इतक्या त्रासांतून साधनेचा आरंभ करून आज त्या ‘श्रीचित्‌‌शक्ति’ या पदापर्यंत पोचल्या आहेत. त्यांनी हे साध्य करण्यासाठी किती साधना केली असेल, याची आपल्याला कल्पना येऊ शकते.

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मला साधनेचा जो प्रकाश दाखवतात, त्याच्या आधारे मी मार्गक्रमण करत आहे. मला कोणत्याही सेवेत काहीही शंका आली, तरी मी त्यांना विचारून घेतो. ‘यापुढेही त्यांचे मार्गदर्शन मिळत राहो’, अशी प्रार्थना करतो !

४. साक्षात् महालक्ष्मीच्या पोटी जन्म लाभणे, ही पूर्वपुण्याई ! – सौ. सायली सिद्धेश करंदीकर (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची कन्या)

मला साक्षात् श्री महालक्ष्मीच्या पोटी जन्म लाभला आहे. ‘ही माझी पूर्वपुण्याई आहे’, असे मला वाटते. पूर्वी मला वाटायचे, ‘आईने मला वेळ द्यायला हवा.’ आता वाटते, ‘ती जगन्माता आहे, तर मला कशी वेळ देऊ शकेल ?’ आईनेच मला साधनेच्या मार्गावर चालायला शिकवले आहे. ‘मलाही साधना वाढवून आईसारखे बनावे’, असे आता आतूनच वाटते.

५. ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ माझ्या गुरु आहेत’, असेच वाटते ! – श्री. सिद्धेश करंदीकर (श्रीचित्‌‌शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांचे जावई)

गेल्या ६ वर्षांत आम्हा दोघांमध्ये मला ‘जावई आणि सासू’ असे नाते कधीच जाणवले नाही. ‘त्या माझी माऊली आणि गुरु आहेत’, असेच मला नेहमी वाटते. ‘सर्व साधकांना आपली भक्ती करता येऊ दे’, अशी मी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी प्रार्थना करतो.

६. विविध प्रसंगी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताईतील देवीतत्त्वाची अनुभूती येते ! – सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची लहान बहीण, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताई यांनी त्यांचे पैंजण माझ्या हातात दिले. तेव्हा मला कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या चरणांचे दर्शन झाले. श्रीचित्‌‌शक्ति ताईतील देवीतत्त्वाची मला सातत्याने अनुभूती येते. ताईला मिठी मारली की, असे वाटते, ‘तिच्यातील देवीतत्त्व मी माझ्यात सामावून घेऊ शकत नाही, इतक्या प्रमाणात ते प्रक्षेपित होत आहे.’ ताई झोपते, तेव्हा तिचा एक पाय नेहमी पांघरूणाच्या बाहेर असतो. त्या वेळी ‘त्या पायाच्या माध्यमातून तिचे सूक्ष्मातील अनिष्ट  शक्तींशी युद्ध चालू आहे’, असे मला वाटते.

७. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताईमध्ये अनेक देवतांची तत्त्वे जाणवतात ! – सौ. शीतल अभय गोगटे (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सर्वांत लहान बहीण, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

श्रीचित्‌‌शक्ति ताईच्या शेजारी नुसते बसले, तरी मला तिच्याकडून चैतन्याचा स्रोत येतांना जाणवतो. तिच्या अवतीभवती शेषनागाचे अस्तित्व अखंड जाणवत असते. ‘श्री सरस्वती’, ‘श्री लक्ष्मी’ आदी अनेक देवतांची तत्त्वे ताईमध्ये जाणवतात.


दत्ततत्त्व आणि देवीतत्त्व यांचे आगमन झाल्यामुळे आश्रमात निर्माण झालेले दैवी वातावरण !

७.१२.२०२२ या दिवशी दत्तजयंती होती. यंदाच्या गुरुपौर्णिमेला सप्तर्षींनी साधकांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना श्री दत्तगुरूंच्या रूपात पहावे’, असे सांगितले होते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात कार्यरत झालेले दत्ततत्त्व आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यरत झालेले देवीतत्त्व यांमुळे आश्रमात दैवी वातावरण निर्माण झाले होते. एरव्ही आश्रमात आध्यात्मिक सोहळे असतांना वातावरण असे दैवी ऊर्जेने भारलेले असते.

साधकांनीही या औचित्याने विविध माध्यमांतून श्रीगुरूंची सेवा केली. स्वागतकक्ष, ध्यानमंदिर आणि संतकक्षांना लावलेले तोरण, प्रवेशद्वाराजवळ आणि श्रीचित्‌‌शक्ति यांच्या निवासकक्षाच्या समोर काढलेली रांगोळी, साधकांनी आवर्जून परिधान केलेले पारंपरिक पोशाख यांमुळे आश्रमात उत्सवाचे वातावरण जाणवत होते. सायंकाळी ध्यानमंदिर परिसर, श्रीचित्‌‌शक्ति यांच्या निवासकक्षाच्या बाहेर आणि स्वागतकक्षासमोर पणत्या लावून या देवतातत्त्वांची आराधना करण्यात आली.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची विशेष पुरवणी पाहून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची भावजागृती होणे !

साधकांनी ‘सनातन प्रभात’ची केलेली सजावट

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’ने ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी’ प्रकाशित केली होती. ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांनी ही पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना भावपूर्ण सजावट करून अर्पण केली. पुरवणी पाहून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा भाव जागृत झाला. ‘‘साधकांनी यासाठी पुष्कळ कष्ट घेतले होते. पुरवणी हातात घेतल्यावर शांतीची अनुभूती येत आहे. श्री दत्तगुरूंच्या समवेत आज माझीपण पालखीच निघाली आहे ! मी देवाची पुरवणीच झाले आहे’’, असे भावोद्गार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी या वेळी काढले.

विशेष म्हणजे  श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी दैनिक हातात घेताक्षणीच जवळच्या श्री दत्तमंदिरात ‘अधिक देखणें तरी निरंजन पाहणें । योगिराज विनविणें मना आलें वो माये ।।’ हे भक्तीगीत चालू झाले. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्मरणाने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे डोळे भरून आले !