मधुमेह आणि पथ्ये !

संग्रहित चित्र

‘‘चोरून खातात हो हे सारखे, किती लक्ष ठेवायचे ? आता लहान का आहेत ?’’ देशपांडेआजी कुरकुरत होत्या. ‘‘ही म्हणजे हिटलर आहे. थोडे खाल्ल्याने काय फरक पडतो ? मी माझा इन्सुलिनचा डोस बरोबर ॲडजस्ट करतो ना ?’’, या आजोबांच्या बोलण्यावर मी तरी काय बोलणार ? म्हणून गप्प बसले. त्यांचा रक्तदाब मोजतांना जरा इकडच्या-तिकडच्या गप्पा चालू केल्या. आजोबांना त्या गप्पा आवडतात. त्यानंतर आमच्यात पुढील संवाद झाला.

आजोबा : परवा आपल्या सैनिकांनी कमाल केली ना ? आपला संपूर्ण देशच असा पिंजून काढला पाहिजे.

मी : देशांतर्गत अशा कारवाया करणे कसे शक्य आहे ? आणि कशाला करायच्या ? त्यापेक्षा सैनिक करतील सीमेवर काय करायचे ते.

आजोबा (तावातावाने) : असे कसे म्हणता तुम्ही ? हे नतद्रष्ट लोक आत राहून वाट लावतात. देश पोखरला जातो ना !

मी : हो. खरे आहे. मधुमेहाचेही असेच आहे.

आजोबा : म्हणजे ? (‘गाडी पुन्हा त्यांच्या साखरेवर घसरेल’, अशी कल्पना नसल्याने आजोबा थोडे गोंधळले.)

मी : म्हणजे प्रत्येक वेळी इन्सुलिनवर अवलंबून कसे चालेल ना ? शरिरात जर साखर वाढलेली रहात असेल, तर ती शरिराला पोखरते. कुठे तरी नको ते व्याप करून ठेवते. मग ते निस्तरणे अवघड जात नाही का ? या वयात असे व्याप सोसायची शरिराची क्षमता तरी असते का ?

आजोबा : नको ते उपद्व्याप म्हणजे ? (आजोबांचा सावध प्रश्न !)

मी : म्हणजे शास्त्रीय भाषेत आम्ही त्यांना उपद्रव म्हणतो. शरिरात साखर वाढलेली राहिली की, ती विविध अवयवांना हळूहळू इजा करत रहाते. कालांतराने त्या अवयवासंबंधी छोट्या छोट्या तक्रारी उद्भवायला लागतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तर अर्थात्च त्या गंभीर रूप धारण करतात.

आजोबा : काय सांगता ? असे कुठले अवयव आहेत ? आणि काय परिणाम होतो त्यांच्यावर ?

आजोबांची अवस्था ‘अब आया उंट पहाड के नीचे’ अशी झाली. ‘आपण नियमितपणे औषधे घेतो, अधिक गोड खाल्ले, तरी अधिकचे इन्सुलिन घेऊन त्याचा लगेच बंदोबस्त करतो, म्हणजे सगळे काही आलबेल आहे’, या त्यांच्या समजुतीला तडा गेला असावा. त्यानंतर माझा अर्धा घंटा आजोबांचे अपसमज दूर करण्यात गेला.

देशपांडेआजोबा असे एकटेच आहेत, असे काही नाही. मधुमेह पीडित ६० ते ७० टक्के लोकांना मधुमेहाच्या गंभीर उपद्रवांची कल्पनाच नसते. त्यामुळे साखरेचे अहवाल आणि औषधे यांवर विसंबून वेगळी दक्षता घेतली जात नाही. किंबहुना काय दक्षता घ्यायची, तेच ठाऊक नसते. याची माहिती करून देण्यासाठी हा लेखप्रपंच !


वैद्या सुचित्रा कुलकर्णी

१. मधुमेहाच्या रुग्णांनी इजा (जखमा) होण्यापासून स्वत:ला जपणे आवश्यक !

मधुमेही रुग्णांनी सर्वाधिक इजा होण्यापासून जपले पाहिजे. विशेषतः पायाच्या इजा अधिक धोकादायक असतात; कारण तेथे रक्तपुरवठा सशक्त नसतो. त्यामुळे इजा लवकर भरून येत नाहीत. त्यांच्यातील क्लेद लवकर वाहून नेला जात नाही. मग घाव चिघळतात, प्रसंगी वाढत जातात, सडतात…काही वेळा बोटे किंवा पावलाचा काही भाग कापून काढावा लागतो. प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स)ही काम करत नाहीत. यासाठी मुळात आपल्याला इजा होणार नाही, याचीच काळजी घ्यावी.

अ. फिरायला किंवा ‘ट्रेकिंग’ला जातांना उत्तम बूट घालून जावेत.

आ. प्रतिदिन स्नानाच्या वेळी पाय काळजीपूर्वक निरखावेत. कुठेही जखम आढळल्यास हळद किंवा जात्यादी तेल लावून ती लवकरात लवकर बरी करून घ्यावी. जखमेतून स्राव येत असल्यास ती पंचवल्कल, त्रिफळा आणि दारूहळद यांच्या दाट काढ्याने धुवावी, सुकवावी आणि मग त्यावर जात्यादी तेल लावावे.

इ. जखमेत पू होऊ नये, यासाठी वैद्यांकडून औषधे घ्यावीत.

ई. आहारावर नियंत्रण ठेवून साखर नियंत्रित ठेवावी. (दही, नवीन धान्य, बेकरीचे पदार्थ, गोड पदार्थ, तसेच दिवसा झोप टाळावी.) त्यासाठी औषधांची किंवा इन्सुलिनची मात्रा वाढवावी लागू नये, याची काळजी घ्यावी.

उ. आयुर्वेदातील तुरट आणि कडू चवींची औषधे ही स्रावशोषण, घाव स्वच्छ ठेवणे, घाव भरून येणे या कामांमध्ये उत्तमरितीने साहाय्य करतात. वैद्यांच्या सल्ल्याने त्यांचा अवश्य लाभ घ्यावा.

२. मूत्रवहस्त्रातस विकृतीचा धोका टाळण्यासाठी वेगधारण टाळावे !

दुसरा मोठा धोका असतो, तो मूत्रवहस्त्रातस (वारंवार होणारा लघवीचा जंतूसंसर्ग किंवा कालांतराने होणारे रिनल फेल्युअर) विकृतीचा. यांपासून जपण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे वेगधारण टाळणे. लघवीला लागली की, हातात असेल ते काम बाजूला सारून प्रथम लघवी करावी. शक्यतो ‘स्वच्छ’ असणार्‍या स्वच्छतागृहाचा वापर करावा. ‘मूत्रवहन स्रोतांचे काम सुरळीत चालू रहाण्यासाठी भरपूर पाणी प्यावे’, ही निखळ अंधश्रद्धा आहे. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णाच्या शरिरात जल महाभूतांच्या पचनातच बिघाड झालेला असतो. त्यात अधिकच्या पाण्याची भर घालणे, म्हणजे आगीत तेल ओतणे ठरेल. ‘रिनल फेल्युअर’ होऊन रुग्ण डायलिसीसवर गेला की, हा साक्षात्कार होऊन काय उपयोग ?

मधुमेही रुग्णाने तहान लागेल, त्याप्रमाणेच पाणी प्यावे. तहानभुकेच्या संदर्भात आपले शरीर आपल्याला योग्य सूचना देत असल्याने त्या ऐकणे नेहमीच हितकर असते. लघवीचे प्रमाण, वेळा, रंग आणि उष्णता यांत कशातही पालट झाला, तर लगेच वैद्यांचा सल्ला घ्यावा.

३. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहार घेण्याविषयी काही महत्त्वाची सूत्रे !

अ. आहारात क्षार (पालेभाज्या आणि चायनीज पदार्थ) अल्प असावेत.

आ. शरिरात साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढलेले राहिले, तर त्यांचा डोळ्यांवर, विशेषतः रेटिनावर किंवा ‘ऑप्टिक नर्व’वर परिणाम होण्याचा संभव असतो. यात विशेषतः लहान वयात मोतीबिंदू होणे, दृष्टी क्षीण होणे, रेटिनाची झीज होणे यांची शक्यता असते. यासाठी डोळ्यांच्या कुठल्याच तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.

इ. डोळ्यांचे व्यायाम नियमित करावेत. त्यामुळे तेथील रक्तपुरवठा सुरळीत राहून आरोग्य राखण्यास साहाय्य होते.

ई. आयुर्वेदात डोळ्यांना हितकर अशी पुष्कळ औषधे आहेत. वैद्यांच्या सल्ल्याने योग्य औषध घ्यावे.

उ. आवळ्याच्या ऋतूमध्ये प्रतिदिन एक आवळा खावा.

ऊ. जेवणात अधूनमधून मीठाऐवजी सैंधव वापरावे.

४. मधुमेहाच्या रुग्णांनी दैनंदिन जीवनात आरोग्याला हितकारक करावयाच्या कृती !

४ अ. तुपाचे सेवन करणे : सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आहारात देशी गायीच्या तुपाचा समावेश असावा. आजकाल असे तूप उपलब्ध होत आहे; पण ते महाग असल्याने लोक घेत नाहीत. तुपामुळे एकूणच स्वास्थ्याचे रक्षण होऊन पुढे होणारी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि आर्थिक हानी टळते. ‘त्या हानीचा हिशोब केला, तर तूप स्वस्त पडते’, असेच म्हणावे लागेल. आज त्याची ‘मागणी अल्प म्हणून उत्पादन अल्प ! त्यामुळे किंमत अधिक’, असे समीकरण झाले आहे. मागणी वाढली, तर उत्पादन वाढेल आणि तूपही स्वस्त दरात मिळू शकेल.

लहान वयात (चाळीशीत) मधुमेह समजला असेल, तर प्रारंभीपासूनच वैद्यांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. यात देशी गायीचे दूध आणि तूप हे श्रेष्ठ असते. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे, आठवड्यातून एकदा महागड्या हॉटेल्समध्ये जेवणे, उंची सिगारेट्स किंवा मद्य यांवर पैसे उधळणे, असा आत्मघातकी व्यय करतांना लोक विचार करत नाहीत; मात्र सर्वथैव उपकारक असे देशी गायीचे दूध आणि तूप त्यांना महाग वाटते, हे दुर्दैव आहे.

४ आ. अभ्यंगस्नान करणे : प्रतिदिन रात्री झोपतांना तळपायांना तेल किंवा तूप लावणे, आठवड्यातून एकदा आवळ्याच्या काढ्याने डोक्यावरून स्नान करणे, आठवड्यातून किमान २ दिवस अभ्यंग करणे या दैनंदिन जीवनातील लहान लहान गोष्टींचा दीर्घकाळ दृष्टी चांगली राखायला उपयोग होतो.

शरिरातील ‘नर्व्स’ (संदेशवाहक नाड्या) याही साखरेच्या आजाराच्या शिकार होऊ शकतात. त्याचा परिणाम म्हणून तळहात आणि तळपाय यांची आग होते, हाता-पायांना मुंग्या येतात, तळपायांची त्वचा बधीर होते. (त्या व्यक्तीला कुठलेच स्पर्श लवकर कळत नाहीत.) यातील बधीरता अधिक वाईट असते; कारण त्यातून घाव (जखमा) होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी सर्वांत उत्तम उपाय म्हणजे अभ्यंग करून, त्यानंतर उटणे लावून अंघोळ करणे. असे प्रतिदिन केले, तर उत्तमच आहे. नियमित व्यायाम आणि योगसाधना हीसुद्धा उपयुक्त ठरते. या उपायांनी त्वचेकडील रक्तपुरवठा पुरेसा राहून त्वचेचे आरोग्य राखायला साहाय्य होते.

४ इ. ध्यान आणि भक्तीसाधना : हृदय रोग हा मधुमेह्यांचा मोठाच शत्रू ! त्याविषयी सध्या अधिकच गवगवा झाला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या मनात त्याच्याविषयी पुष्कळ भीती बसली आहे. खरेतर हृदय रोगात ६० टक्के वेळा मृत्यू निश्चित असतो, तर मधुमेहाचे इतर उपद्रव मात्र रुग्णाला जिवंतपणी दीर्घकाळ यातना देतात. हृदय रोगापासून वाचायचे असेल, तर साखरेच्या नियंत्रणासमवेत नियमित व्यायाम, मिताहार आणि तणावविरहित आनंदी जीवनशैली हे उपाय महत्त्वाचे आहेत. यासाठीच मधुमेही रुग्णांनी ध्यान आणि योगनिद्रा यांचा अभ्यास करावा. एकाग्रतेसाठी आणि तणाव हलका करण्यासाठी भक्तीसाधना करावी. ती निश्चितच उपयुक्त ठरते.

५. लैंगिक समस्यांसाठी वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करणे महत्त्वाचे !

मधुमेही रुग्णांच्या मानसिक आणि वैवाहिक जीवनावर घाला घालणारा मधुमेहाचा मोठा उपद्रव म्हणजे अल्प होणारी कामेच्छा ! हे लक्षण स्त्री-पुरुष दोघांमध्येही आढळू शकते. त्यातून जोडीदार असमाधानी रहाणे, रुग्णाला नैराश्य येणे, नात्यात तणाव निर्माण होणे अशा समस्या उद्भवू शकतात. काही पुरुष रुग्णांमध्ये तर ‘इरेक्टाईल डिस्फंक्शन’ (नपुंसकता) निर्माण होऊ शकते. हे लक्षण उत्पन्न झाल्यावर वैद्यांकडून योग्य चिकित्सा करून घेणे आवश्यक असते. क्वचित् दोघांनाही समुपदेशनाचे साहाय्य होऊ शकते. प्रतिष्ठा आणि लाज यांना अवास्तव बळी पडून चोरट्या, पिवळ्या पाट्या असलेल्या भुरट्या-स्वयंघोषित आधुनिक वैद्यांच्या नादी लागून रुग्णांनी स्वतःची हानी करून घेऊ नये.

६. मधुमेहींनी मिष्ठान्न खाण्याचा मोह टाळणे आरोग्यासाठी हितकारक !

रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे, ही मधुमेही रुग्णांची प्राथमिक आवश्यकता आहे. त्यासाठी पथ्यपालन अतिशय आवश्यक आहे. आपले पूर्वज खात नव्हते, असे चॉकलेट्स, आईस्क्रीम, कॅनमधील फळांचे रस, मिल्क शेक, पेस्ट्री, फालुदा अशा कित्येक गोड पदार्थांचा मोह टाळणे अधिक हितकर आहे. मधुमेही व्यक्तींनी हा संयम ठेवावा. त्यांच्या आप्तस्वकियांनीही त्यांना अशा पदार्थांचा आग्रह न करणे, प्रसंगी मोह झाला, तर त्यापासून परावृत्त करणे, हे खर्‍या प्रेमाचे लक्षण आहे.

७. अनुवंशिक मधुमेह टाळण्यासाठी प्रतिवर्षी वैद्यांच्या सल्ल्याने शोधन करावे !

आपल्या देशात दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. कलियुगात खरेतर मनुष्याचे सरासरी आयुष्यमान १०० वर्षेही राहिलेले नाही; पण ७०-८० वर्षे आयुष्य जगतांना ४० व्या वर्षी मधुमेहाची औषधे चालू झाली, तरी पुढे ३०-४० वर्षे त्याची नकोशी सोबत अटळ होते. मधुमेह हा जसा जीवनशैलीचा आजार आहे, तसाच तो अनुवंशिकही आहे. त्यामुळे ज्यांच्या वंशात (आई आणि वडील दोघांच्याही कुलांचा विचार करावा.) तो आढळतो, त्यांनी तरुण वयात वैद्यांच्या सल्ल्याने प्रतिवर्षी शरिराचे आवश्यक शोधन करावे. पुढच्या पिढीचा विचार करता विवाहानंतर मूल जन्माला घालायचा निर्णय घेतला की, गर्भोत्पत्तीपूर्वी पती-पत्नी यांनी वैद्यांकडे जाऊन आवश्यक शोधन करून घ्यावे.

दिवसेनैव तत् कुर्याद् येन रात्रौ सुखं वसेत् ।
पूर्वे वयसि तत् कुर्याद् येन वृद्धः सुखं वसेत् ।।

अर्थ : दिवसा असे वागावे की, ज्याने रात्र सुखकर जाईल आणि तरुणपणी असे वागावे की, ज्याने वार्धक्य सुखी होईल, हे सुभाषित त्यासाठीच सांगितले आहे.

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी

(साभार : ‘विवेक विचार’ संकेतस्थळ, वर्ष २०१६)