‘आपले शालेय शिक्षण आणि आपले वाचन यांच्या आपल्यावरील प्रभावामुळे आहाराच्या संदर्भात आपल्याला ‘कॅलरीज् (उष्मांक)’, ‘प्रोटीन्स् (प्रथिने)’, ‘फॅट्स’ (चरबी), ‘व्हिटॅमिन्स (जीवनसत्त्व)’, ‘मिनरल्स् (खनिज पदार्थ)’, ‘अँटीऑक्सिडंट्स’, ‘कोलेस्टेरॉल’, ‘कार्बोहायड्रेट्स’ या संज्ञा ओळखीच्या वाटतात. वास्तविक हे शब्द कितीही अभ्यासले, तरी सामान्य मनुष्याला या भाषेतील नियम पाळून स्वतःचा आहार ठरवता येत नाही. ‘प्रतिदिन १ सहस्र २०० कॅलरीज म्हणजे किती आहार घ्यायचा ? आपल्याकडे खाण्याच्या पदार्थांमध्ये भरपूर वैविध्य आहे. मग सणावाराला वेगळे पदार्थ असतील, तर त्यांचे प्रमाण कसे ठरवायचे ?’, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी त्यातील तज्ञ व्यक्तीला विचारण्याविना पर्याय नाही. हे म्हणजे प्राणी आणि पक्षी यांच्याइतकीही अक्कल अन् स्वातंत्र्य नसल्यासारखे आहे.
याउलट अग्नी, अग्निमांद्य, षड्रस आहार, कुक्षी, धातूवर्धक आहार, वृष्य पदार्थ, रसायन पदार्थ, दोषप्रकोपक, विषमाशन, अध्यशन, विरुद्धाशन या संज्ञा सर्वथा अपरिचित असतात. खरेतर या एकदा समजावून घेतल्या, तर अगदी अशिक्षित मनुष्यालाही त्यावर आधारित नियम हे व्यवहारात आणणे शक्य आहे. किंबहुना आपल्याकडे खेड्यातील माणूस आजही ते नियम समजून उमजून आणि सहजपणे पाळतांना दिसतो, (उदा. ‘भुकेपेक्षा दोन घास अल्प घ्या’, हा नियम कुणालाही पाळायला जमेल. त्यासाठी कुणा वैद्याकडून घासाचा आकार, भुकेची व्याख्या ठरवण्याची आवश्यकता लागत नाही. असे अनेक सहज सोपे शास्त्रीय नियम लेखात पुढे येतीलच !)
ही प्रस्तावना यासाठी की, आयुर्वेदाचे आहारविषयक नियम जाणून घेतांना त्याला पाश्चात्त्य नियमांचे मापदंड लावण्याचा मोह वाचकांना आवरता येत नाही. ‘दुधाने कफ वाढेल. त्यामुळे सर्दी आहे तोपर्यंत दूध पिऊ नका’, असे सांगितले की, लगेच ‘मग कॅल्शियम पोटात कसे जाणार ?’, हा रुग्णांचा ठरलेला प्रश्न असतो. आहारशास्त्राचे हे ‘कॉकटेल’ (वेगवेगळ्या पदार्थांचे एकत्रीकरण) काही कामाचे नाही. आयुर्वेदाचे नियम आयुर्वेदाच्याच परिभाषेत जाणून घ्यायला हवेत. ते शाश्वत आणि एतद्देशीय (मूळचे) असल्याने अत्यंत उपयुक्त आहेत, हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.
आहार हा विषय इतका व्यापक आहे की, या सदरातील एका लेखात त्याला पुरेसा न्याय मिळणार नाही. म्हणून हा ‘२१ अपेक्षित नियमां’चा मार्ग निवडला आहे.
१. भूक लागल्यावरच जेवावे. भूक नसेल, तर हलका आहार घ्यावा किंवा लंघन करावे. आठवड्यातून एकदा आणि झेपेल इतकेच लंघन करावे.
२. कधीही पोटभर जेवू नये. अन्नाचे पचन होण्यासाठी पोटात थोडी जागा रिकामी ठेवावी. जेवणानंतर हसणे, चालणे, वाकणे, बोलणे, बसणे या क्रिया करणे अवघड जाणार नाही, इतकेच जेवावे. एकदा जेवल्यावर ते पचायला न्यूनतम ३ घंटे लागतात. त्याच्या आत पुन्हा जेवू नये. (प्रत्येकी दोन घंट्यांनी तर अजिबात जेवू नये.)
३. गोड पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे ते जेवणाच्या प्रारंभी, म्हणजे भूक चांगली असतांनाच खावेत. जेवणानंतर गोड पदार्थ खाणे म्हणजे पचनशक्तीला अधिकचे काम करायला लावण्यासारखे आहे.
४. कॅलरीज, प्रोटीन्स, ‘सॅच्युरेटेड (संतृप्त) किंवा अनसॅच्युरेटेड (असंतृप्त) फॅट्स (चरबी)’, व्हिटॅमिन्स यांच्या अगम्य आणि अव्यवहार्य जंजाळात न अडकता षड्रस आहार घ्यावा. गोड, आंबट, तिखट, खारट, कडू आणि तुरट या सहाही चवींनी युक्त आहार संपूर्ण शरिराचे योग्य पोषण करण्यास समर्थ असतो. आहारात कुठल्याही चवीचा अतिरेक नसावा.
५. आपली पणजी किंवा पणजोबा यांनी खाल्लेले पदार्थ आहारात ठेवावेत. त्यांनी न खाल्लेले पदार्थ (उदा. वडापाव, नुडल्स, आईस्क्रीम, पास्ता, बर्गर इत्यादी) नियमित खाऊ नयेत. खाल्ले नाहीत, तरी चालतील. काहीही बिघडणार नाही. चांगलेच होईल !
६. आहार नेहमी उष्ण, ताजा (शिजवल्यानंतर ३ घंट्यांच्या आत) आणि स्निग्ध असावा.
७. शांत चित्ताने, भूमीवर बसून, गप्पा न मारता, फार सावकाश नाही आणि फार भरभर नाही, अशा पद्धतीने भोजन करावे. (५५ मिनिटे भोजन करू नये. त्याने आहार नीट पचत नाही.)
८. जेवतांना दूरचित्रवाहिनीसमोर बसू नये. त्यावरील चलतचित्रे पहातांना मन शांत रहात नाही. अन्नाचा आस्वाद घेतला जात नाही. कधी कधी तर किती खाल्ले, पोट भरले कि नाही, याकडेही लक्ष रहात नाही.
९. मोड आलेली कच्ची कडधान्ये प्रतिदिन खाऊ नयेत. ती रुक्ष, वातूळ आणि पचायला जड असतात. कडधान्य नेहमी शिजवून आणि तेलातुपाचा वापर सढळ हस्ते करूनच (तर्रीयुक्त) खावीत.
१०. पालेभाज्या या अल्पायुषी असल्याने प्रतिदिन खाऊ नयेत. भारतीय पारंपरिक आहारात तंतूमय पदार्थ पुरेशा प्रमाणात असतात. (तिन्ही त्रिकाळ केवळ मांसाहार घेणार्या पाश्चात्त्य लोकांना त्यांची आवश्यकता आहे आणि तिथेच असे शोध लागतात. ते जसेच्या तसे उचलून आपल्याला लागू करायचे नसतात.) कधीतरी खातांना पालेभाज्या वाफवून, पिळून आणि फोडणी देऊन खाव्यात. प्रतिदिन पालेभाजी सेवन हे शुक्र, ओज, बल, नेत्र यांना घातक ठरू शकते.
११. संध्याकाळचे भोजन सूर्यास्तापूर्वी घ्यावे. आपल्या पोटातील पाचक स्रावाचे काम हे सूर्याभिमुख असते. सूर्य मावळला की, अन्न पचवायला कुणीही साहाय्य करू शकत नाही. म्हणूनच ‘दिव्यात वात, तोंडात हात’ अशी म्हण आहे. आज सरसकट सगळे जण रात्री ९ वाजल्यानंतर जेवतात आणि ‘ते पचते’, असा अपसमज बाळगतात. वास्तविक त्या आहाराचे योग्य पचन न झाल्यानेच मधुमेह, हृदयविकार, स्थौर्ल्य, दमा इत्यादी आजारांचे प्रमाण वाढते. संध्याकाळचे भोजन आणि झोप यांत न्यूनतम ३ घंट्यांचे अंतर असावे.
१२. आपण रहात असलेल्या आसपासच्या भागात (२५ ते ५० किलोमीटर परिसरात) नैसर्गिकरित्या येणारी पिके (धान्य, फळे, भाज्या इत्यादी) आपल्यासाठी आवश्यक, हितकर आणि पुरेशी असतात. विशिष्ट प्रदेशातील हवामानाला आवश्यक पदार्थ निसर्गतःच त्या भागात पिकतात. त्यामुळे विदेशी भाज्या आणि फळे यांच्या नादी लागू नये. आपल्या भूमीत त्या भाज्या किंवा फळे पिकवणे, म्हणजे आपल्यासमवेत निसर्गाच्याही आरोग्यावर घाला घालण्यासारखे आहे.
१३. भारतीय वंशाच्या गायीचे दूध हे पूर्णान्न आहे; मात्र दुग्धालयाचे (डेअरीचे) दूध म्हणजे पूर्णान्न नव्हे. तेथील जर्सी प्राण्याला दिल्या जाणार्या औषधांचे दुष्परिणाम आपल्यालाही भोगावे लागतात. त्यामुळे आपल्या गायीचे दूध उपलब्ध नसल्यास मुलांना पिशवीतील दूध बळजोरीने पाजू नये. आपणही ते पिऊ नये.
१४. ज्या ऋतूंमध्ये ज्या भाज्या किंवा फळे येतात, ती खावीत. उगीच बारमाही आंबा वगैरे खाणे चुकीचे आहे. एक तर अन्य ऋतूत ती फळे उत्तम गुणांनी युक्त नसतात आणि त्या ऋतूत ती शरिराला आवश्यकही नसतात. कधी कधी तर ती त्रासदायक ठरतात.
१५. ‘मांसाहार केल्याविना बलवान होत नाही’, हा अपसमज आहे. पिढ्यान्पिढ्या मांसाहार करणार्या लोकांनीही नियमित मांसाहार करू नये. ज्यांचे पूर्वज शाकाहारी होते, अशा लोकांनी उगीच भरमसाठ मांसाहार करू नये. अशाने गुदविकार होण्याची शक्यता बळावते.
१६. उठसूट कुठल्याही आजारात, तसेच वजन किंवा कोलेस्टेरॉल यांच्या भीतीने तेल-तूप बंद करू नये. शरीर ही प्रतिदिन झिजणारी गोष्ट आहे. ती झीज नियंत्रित करण्यासाठी स्नेहाची अत्यंत आवश्यकता असते.
१७. भारतीय गायीचे लोणी किंवा तूप हे उत्तम पाचक, स्मरणशक्तीयुक्त, बलवर्धक आणि दृष्टीदायक आहे. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना अवश्य द्यावे.
१८. जेवतांना मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे. जेवायच्या आधी आणि जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये.
१९. लाकडी घाण्याचे किंवा ‘फिल्टर्ड तेल’ प्रतिदिनच्या स्वयंपाकात वापरावे. हे तेल तीळ, शेंगदाणे किंवा खोबरे यांचे असावे. तिळाचे असेल, तर सर्वांत उत्तम ! अन्य तेलांच्या भानगडीत पडू नये.
२०. जेवणानंतर नागवेलीचे पान, चुना, कात, लवंग, कापूर, वेलदोडायुक्त विडा खावा.
२१. भूक वाढणे, अन्नपचन सुधारणे आणि आरोग्य उत्तम राखणे यांसाठी नियमित व्यायाम हेच सर्वश्रेष्ठ औषध आहे.’
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’)