तिरुपती मंदिराने घोषित केलेली एकूण संपत्ती २ लाख २६ सहस्र कोटी रुपये !

१०.३ टन सोने अन् १६ सहस्र कोटी बँकेत जमा !

तिरुपती (आंध्रप्रदेश) – तिरुमला तिरुपती देवस्थानम्ने प्रथमच मंदिराची एकूण संपत्ती घोषित केली आहे. यामध्ये मंदिराच्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ५ सहस्र ३०० कोटी रुपय; मूल्याचे १०.३ टन सोने, तर १५ सहस्र ९३८ कोटी रोख जमा असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिराची एकूण मालमत्ता २ लाख २६ सहस्र कोटी इतकी आहे.

१. देवस्थानम्चे कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांनी सांगितले की, वर्ष २०१९ मध्ये अनेक बँकांमध्ये १३ सहस्र २५ कोटी रोकड होती, ती वाढून १५ सहस्र ९३८ कोटी झाली आहे. गेल्या ३ वर्षांत गुंतवणुकीत २ सहस्र ९०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

२. मंदिराच्या परिसरात आणि आजूबाजुच्या परिसरात ७ सहस्र १२३ एकरात पसरलेल्या एकूण ९६० मालमत्ता आहेत.

३. देवस्थानम्चे अध्यक्ष आणि मंडळ यांनी आंध्रप्रदेश सरकारी ‘शेअर्स’मध्ये निधी गुंतवला आहे, हा आरोप फेटाळून लावण्यात आला. देवस्थानम्ने सांगितले की, अशा प्रकारे आम्ही काहीही केलेले नाही. उर्वरित निधी हा ‘शेड्युल्ड बँकां’मध्ये गुंतवण्यात आला आहे.

४. देवस्थानम्ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भक्तांना विनंती आहे की, त्यांनी अशा खोट्या प्रचारावर विश्‍वास ठेवू नये. बँकांमध्ये जमा केलेली रोख आणि सोन्याची गुंतवणूक अत्यंत पारदर्शक अन् योग्य पद्धतीने केली जाते.