दैनिक ‘सनातन प्रभात’ची कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका
नदीत म्हशींना आंघोळ घालण्याचा प्रकार
पंढरपूर – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी आणि नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित असे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. वारकरी ज्या नदीला पवित्र समजून त्यात श्रद्धेने स्नान करतात, तसेच तिचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात, त्याच नदीच्या पाण्यात शहरातील लोक मोठ्या प्रमाणात म्हशींना आंघोळ घालतात. यामुळेही नदीचे पाणी प्रदूषित होते. घाटांवर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला. ज्या ठिकाणी भाविकांची दर्शनाची रांग असते, तेथेही हा कचरा आढळून आला. नदीच्या परिसरात, तसेच शहरातही काही ठिकाणी भटक्या गायी आढळून आल्या. त्यांची एकत्रित व्यवस्था होण्यासाठी प्रशासनाकडून विशेष हालचाल होत असल्याचे दिसून येत नाही. यासह घाटावर माहिती देण्यासाठी लावलेले सूचनाफलक अशुद्ध भाषेत आहेत. केवळ ९ शब्दांच्या या सूचनाफलकात व्याकरणाच्या अनेक चुका आढळून आल्या.
भाविकांना भेडसावणार्या अन्य अडचणी आणि समस्या
१. भाविकांना तृतीयपंथी लोकांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. हे तृतीयपंथी लोकांची अडवणूक करून त्यांच्याकडून बळजोरीने पैसे वसूल करतात. हे लोक गटागटाने फिरून दर्शनाच्या रांगेतील भाविकांकडूनही पैसे वसूल करतात. वारीसाठी पंढरपूरला येणार्या रेल्वेतही हे तृतीयपंथी मोठ्या प्रमाणात असून ते तेथेही प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास देतात. पैसे न दिल्यास प्रसंगी शिवीगाळही करतात.
२. वारीच्या काळात पुष्कळ मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने त्यांना रहाण्यास जागा अपुरी पडते. अशा प्रसंगी शहरात मठ कुठे आहेत ? कुठल्या खोल्या रिकाम्या आहेत ? अन्य पर्यायी जागा कोणती ? याची कोणतीच नेमकी माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे काही वेळा भाविकांना चढ्या दराने मिळणार्या खोल्यांमध्ये रहावे लागते.
दरवाढ करून वारकर्यांची लूट !पंढरपूरच्या वारीला येणारा वारकरी हा तसा सर्वसामान्य मध्यवर्गीय-गरीब असाच असतो. असे असूनही वारीच्या काळात बहुतांश गोष्टींचे दर वाढवले जातात. यातून वारकर्यांकडून कसा आर्थिक लाभ मिळवता येईल ? याचाच विचार केला जात असल्याचे दिसते. रिक्शाचालक दुप्पट, तिप्पट किंवा अगदी पाचपट भाडे आकारतात. चंद्रभागा नदीवरील होडीवाले दर वाढवतात, तसेच निवासाचेही दर वाढवले जातात. यात सामान्य वारकरी भाविकांची परवड होते. |