फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण : एक विनाशकारी नरकासूर !

दिवाळी म्हटली की, मौजमजा, मिष्टान्न, फराळ, नवीन वस्त्रे, धार्मिक परंपरा या सगळ्या गोष्टी केल्या जातात. यासह आज बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातो. खरेतर फटाके हे मानवाच्या आरोग्यासाठी घातक आहेत. फटाक्यांमधून होणारे प्रदूषण हे विनाशकारी आहे. याविषयी ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

फटाके फोडण्याचे धोके !

१. जीवघेणे ध्वनीप्रदूषण, म्हणजे प्राणाशी गाठ !

‘दिवाळीपूर्वी गणपति आणि नवरात्री या उत्सवांच्या वेळी होणार्‍या प्रदूषणामुळे आजारी पडलेले रुग्ण माझ्याकडे उपचाराला आले होते. एक ३५ वर्षांचा तरुण दिवसभर गणपतीच्या मंडपात बसला होता. त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक चालू होता. दुसर्‍या दिवशी कळले की, त्याला ऐकू येत नाही. त्याच्या तपासण्या झाल्या; पण आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) हात टेकले. दुसरा ३० वर्षांचा तरुण उपचारासाठी आला होता. देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत १० सहस्र फटाक्यांची माळ त्यानेच लावली होती. दुसर्‍या दिवशी दम लागल्याने त्याला थेट अतीदक्षता विभागात भरती करावे लागले. तेथून सुटल्यावर तो माझ्याकडे आला. तिसरी घटना गावाकडे घडलेली. एक पंचविशीचा परिचित युवक नुकताच तापातून उठला होता. त्याला थोडा अशक्तपणा बाकी होता. सार्वजनिक गणपतीला गेला. तेथे डिजे ध्वनीक्षेपक चालू होता. अर्ध्या घंट्याने त्याने कुणाला तरी ‘निघतो’ म्हणून सांगून देवापुढे डोक टेकले, ते कायमचेच. तेथील आधुनिक वैद्याने त्याचे ‘डिजेजन्य हार्ट अटॅक (ध्वनीक्षेपकामुळे आलेला हृदयविकाराचा झटका)’ असे निदान केले.

वैद्या सुचित्रा कुलकर्णी

२. समाजाने फटाके आणि ध्वनीक्षेपक यांमुळे होणारे प्रदूषण टाळणे आवश्यक !

जीवन नष्ट अथवा विस्कळीत करू शकतील, असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेश यांमध्ये मिसळणे, म्हणजे प्रदूषण होय. ध्वनी मोजण्याच्या मापाला ‘डेसिबल’ म्हणतात. साधारणपणे १० ते ५० डेसिबल्सचा ध्वनी आपल्याला व्यवस्थित त्रास न होता ऐकू येतो. या मर्यादेच्या वरील आवाज आपल्याला नकोसा वाटतो, उदाहरणार्थ पुष्कळ मोठ्याने बोलणे ६० डेसिबल्स, टीव्ही किंवा रेडिओ यांचा मोठा आवाज ७० ते ७५ डेसिबल्स, प्रेशर कुकरची शिट्टी ७५ डेसिबल्स, वाहनांचे हॉर्न ७५ ते ८० डेसिबल्स, विमान उडतांना ११० ते १२० डेसिबल्स आवाज निर्माण करतात. ध्वनीक्षेपकांचा आवाज, तर याहून कितीतरी अधिक असतो, म्हणजे कानांवर किती अत्याचार ! ध्वनीप्रदूषण करणारे घरातील आवाज, औद्योगिक क्षेत्रातील आवाज, वाहनांचे आवाज, यातील कुठलेही ध्वनी आपल्याला टाळता येत नाहीत; कारण ते जीवनावश्यक कामातून निर्माण होतात. त्यात आपण फटाके आणि ध्वनीक्षेपक या टाळता येणासारख्या गोष्टींची भर घातली आहे. झाडाला मिठी मारून ‘झाड मला सोडत नाही’, असे म्हणणार्‍या शेखचिल्लीसारखी आपली गत झाली आहे.

३. ध्वनीप्रदूषणामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होणे

ध्वनीप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनीप्रदूषणामुळे शारीरिक आणि मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडते, तो भांडखोर होतो आणि रक्तदाब वाढतो. कारखान्यात मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना म्हातारपणी बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनीवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनीप्रदूषणामुळे हानी पोचू शकते. प्राणी आणि पक्षी यांच्या कित्येक प्रजाती मनुष्यकृत मोठ्या आवाजाने नष्ट झाल्या आहेत.

४. वायूप्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर सर्वाधिक परिणाम होणे

वायूप्रदूषणाचे सर्वांत धोकादायक परिणाम श्वसनसंस्थेवर होतात. विविध प्रदूषक घटक थेट श्वसनसंस्थेवर आक्रमण करतात. ओझोन आणि नायट्रोजन डायऑक्साईड हे फुफ्फुसांवर अतिशय धोकादायक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमकुवत करतो. त्यामुळे दमा वाढतो. नायट्रोजन डायऑक्साईड श्वसन नलिका आणि फुफ्फुस यांमध्ये गेल्यावर तो विरघळण्यासाठी अधिकाधिक कफाची निर्मिती होते. त्यामुळे कफाचे आजार होतात. ते जुने झाले की, जीवाणूंचा संसर्ग होतो आणि परिस्थिती गंभीर होते. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वहनाचे काम करणार्‍या हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी हवेतील वाढलेला कार्बन डायऑक्साईड मिसळून जातो आणि शरिरातील सर्व भागात पोचतो. हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो. कुठल्याही इंद्रियांचा अतीवापर हे आयुर्वेदातही रोगांचे कारण सांगितले आहे.

फटाके प्रदूषण

५. फटाक्यांमुळे निर्माण झालेले विषारी वायू शोषण्याची क्षमता झाडांमध्ये नसल्याने त्यांना टाळणे हाच एकमेव उपाय असणे !

सर्वांत वाईट गोष्ट, म्हणजे फटाक्यांचे प्रदूषण झाडे लावून अल्प होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे किंवा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो.

फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण : एक विनाशकारी नरकासूर !

कागद, लाकडे, काडीकचरा जाळला, तर त्यातून केवळ कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो की, जो वायू झाडाचे अन्न आहे. त्यामुळे भरपूर झाडे लावली की, हे प्रदूषण न्यून होऊ शकते. प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन करतच असतो. या प्रदूषणातून आपल्याला झाडेच सोडवतात; परंतु फटाक्यांच्या ज्वलनात सल्फर आणि कार्बनयुक्त अनेक विषारी वायू अन् धातू निर्माण होतात. आवाज न करणारे शोभेचे फटाके, तर अधिक विषारी वायू निर्माण करतात. दुर्दैवाने कुठल्याही फटाक्यांनी सिद्ध केलेले विषारी वायू शोषण्याची क्षमता झाडांमध्ये नाही; म्हणूनच फटाक्यांना ‘नाही’ म्हणण्याखेरीज आपल्याकडे पर्याय नाही.

फटाके अन् डिजे, हे नव्हे प्रतिक धर्माचे ।
हे शोध परक्यांचे, तेही काल परवाचे ।।

धर्म म्हणजे स्मरण नित्य ईश्वराचे ।
ठेवावे ते भान सकलांच्या आरोग्याचे ।।

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी, एम्.डी. (आयुर्वेद), बी.ए. (योगशास्त्र (सुवर्णपदक))

(साभार : ‘आरोग्यदूत’ व्हॉट्सॲप गट’ आणि ‘मराठीसृष्टी’ संकेतस्थळ)