|
सांगली – महाराष्ट्र राज्य परिवहन बसस्थानकाच्या २०० मीटरच्या परिसरात खासगी वाहतुकीच्या गाड्या उभ्या करण्यास किंवा त्यांची तिकीट विक्री करण्यास बंदी आहे; मात्र राज्यातील अनेक ठिकाणी सर्रास खासगी वाहतूक आस्थापनांच्या गाड्या गावातील किंवा शहारातील बसस्थानकांच्या समोरच उभ्या केलेल्या असतात. संबंधित खासगी गाड्यांचे ‘एजंट’ थेट बसस्थानकाच्या परिसरात येऊन, जे जे प्रवासी रिक्शातून बसस्थानकाच्या परिसरात येतात त्यांना बाहेरच गाठून ते खासगी गाडीतून प्रवास करण्यासाठी बळजोरी करतात. अशांवर कारवाई करण्याचे अधिकार हे प्रादेशिक परिवहन खाते आणि पोलीस यांच्याकडे आहेत; मात्र वस्तुत: ते अशा ‘एजंट’वर कारवाई करतांना दिसत नाहीत. काही जिल्ह्यांमध्ये तर अशा ‘एजंट’वर लक्ष ठेवण्यासाठी, कारवाई करण्यासाठी दोन पोलीसही ठेवलेले असतात; मात्र तेही बघ्याची भूमिका घेतात.
१. या संदर्भात एका जिल्ह्यातील राज्य परिवहन मंडळाच्या स्थानिक वभाग नियंत्रकांशी (जिल्ह्यातील प्रमुख) बोलल्यावर ते म्हणाले, ‘‘या संदर्भात आम्ही वेळोवेळी प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस यांना पत्र देतो; मात्र प्रत्यक्षात या दोन्ही विभागांकडून अत्यंत तुटपुंजी कारवाई होते. अशा वेळी अशा ‘एजंटां’वर कारवाई करण्याचे अधिकार एस्.टी. आगारप्रमुख, तसेच तेथील संबंधित अधिकार्यांना देणे आवश्यक आहे. असे अधिकार दिल्यास काही प्रमाणात एस्.टी.ला प्रवासी मिळतील.’’
२. अनेक ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सवाले अधिक तिकीट किंवा देयक प्रवाशांना देत नाहीत, तर काही ठिकाणी ‘बोगस’ तिकिटे देण्यात येतात, ज्यावर जावक क्रमांक नसतो त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अवघड होते.
संपादकीय भूमिका‘खासगी वाहतूक आस्थापनांच्या ‘एजंट’वर कारवाई न करणारे आगारप्रमुख किंवा पोलीस यांचे त्यांच्याशी काही आर्थिक हितसंबंध आहेत कि ते कारवाईविषयी निष्क्रीय आहेत ?’, असा प्रश्न नागरिकांना पडतो ! |
कोल्हापूर एस्.टी. बसस्थानक परिसरात ‘खासगी ट्रव्हल्स’ गाड्या थांबवण्यास केली बंदी !पोलीस अधीक्षकांची स्तुत्य कारवाई !कोल्हापूर – संभाजीनगर खंडपिठाने दिलेल्या आदेशाचेे पालन करत कोल्हापूर पोलीस अधीक्षक लक्ष घालून कोल्हापूर येथील एस्.टी. बसस्थानकाच्या परिसरात २०० मीटरपर्यंत कोणत्याही ‘खासगी ट्रव्हल्स’ आस्थापनांच्या गाड्या लावल्या जाणार नाहीत, याविषयी दक्ष आहेत. यामुळे या सर्व गाड्या कोल्हापुरात बसस्थानकाच्या परिसरापासून लांब थांबलेल्या आढळतात. यामुळे काही प्रमाणात तरी एस्.टी.चे प्रवासी वाढण्यास लाभ होत आहे. अशी कारवाई सर्वच जिल्ह्यांत पोलीस प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे, असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. |