श्रावणमास, त्यातील सण, व्रते आणि उत्सव !

१. श्रावण पौर्णिमा

श्रावण पौर्णिमेला ‘रक्षाबंधना’चा सण साजरा केला जातो आणि या तिथीला श्रावणी उपाकर्म असते. रक्षाबंधनात ‘अपरान्हव्यापिनी’ तिथी (टीप) घेतली जाते. ती तिथी दोन दिवस असेल किंवा दोन्ही दिवस नसेल, तरी ती ‘पूर्वा’ घेतली पाहिजे. व्रत करणार्‍यांनी सकाळी नदी किंवा इतर जलस्थानी सविधी स्नान करून तर्पण इत्यादी करावे. दुपारी सिद्ध केलेल्या संरक्षणसूत्राची प्रतिष्ठापना करून त्याचे पूजन करावे आणि ते ब्राह्मणाकडून बांधून घ्यावे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.

टीप – दिवसाचे ‘सूर्योदय ते सूर्यास्त’ या काळाचे चार भाग केले जातात. त्यातील पहिल्या भागाला ‘पूर्वान्ह’, दुसर्‍या भागाला ‘मध्यान्ह’, तिसर्‍या भागाला ‘अपरान्ह’ आणि चौथ्या भागाला ‘सायान्ह’, असे म्हणतात. ‘अपराण्हव्यापिनी तिथी’ घ्यावी म्हणजे पौर्णिमा तिथी अपराण्हकाळापर्यंत असावी. सध्या ३.४५ ते ४ या कालावधीत अपराण्ह काळ संपतो. या वर्षी ११ आणि १२ ऑगस्ट या दोन्ही दिवशी पौर्णिमा आहे; परंतु ११ या दिवशी अपराण्हकाळ चालू असतांना पौर्णिमा आहे. त्यामुळे ११ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन करावे.

१ अ. श्रावणी उपाकर्म : श्रावण पौर्णिमा हा ‘उपाकर्मा’चा मुख्य काळ आहे. वेदपारायणाच्या शुभ कार्याला ‘उपाकर्म’ म्हणतात. हा यज्ञोपवीत पालटण्याचा काळ असतो. या दिवशी सिद्ध केलेले नवीन यज्ञोपवीत धारण केले जाते. सर्वप्रथम तीर्थाला प्रार्थना करून नंतर पंचगव्य प्राशन केले जाते. प्रायश्चित्त-संकल्प आणि हेमाद्रि स्नानसंकल्पाने दशविध स्नान असते. त्यानंतर अरुंधतीसहित ऋषिपूजन, सूर्योपस्थान, ऋषितर्पण, यज्ञोपवीत पूजन आणि नवीन यज्ञोपवीत धारण करण्याचा विधी आहे. आधी धारण केलेले यज्ञोपवीत विसर्जित करून प्रतिष्ठापना केलेले नवीन यज्ञोपवीत धारण केले जाते. यज्ञोपवीत धारण करण्याचा मंत्र पुढे दिला आहे.

यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात् ।
आयुष्यमग्य्रं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः ।।

– ब्रह्मोपनिषद्, श्लोक ५

अर्थ : गुरु शिष्याला यज्ञोपवीत धारण करण्यास सांगतांना म्हणतात, ‘‘हे यज्ञोपवीत अत्यंत पवित्र असून जेव्हा ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, तेव्हाच याची उत्पत्ती झालेली आहे. आयुष्य प्रदान करणारे, श्रेष्ठ असे हे यज्ञोपवीत तू समोरून धारण कर. हे यज्ञोपवीत तुला बळ आणि तेज प्रदान करो.’’

२. श्रावण कृष्ण चतुर्थी

श्रावण कृष्ण चतुर्थीला ‘संकष्ट-चतुर्थी व्रत’ असते. यामध्ये श्री गणेशाची उपासना केली जाते.

३. श्रावण कृष्ण सप्तमी

श्रावण कृष्ण सप्तमीला ‘शीतलासप्तमी व्रता’च्या दिवशी ‘शीतलादेवीचे’ पूजन आणि तिच्या कथेचे श्रवण केले जाते.

४. श्रावण कृष्ण पक्ष एकादशी

श्रावण कृष्ण एकादशी ‘कामदा एकादशी’ या नावाने प्रसिद्ध आहे. तिच्या माहात्म्याविषयी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले, ‘‘या दिवशी व्रत करून तुळशीच्या मंजिरीने भगवान विष्णूचे पूजन करावे. त्यामुळे सर्व प्रकारची शुभकार्ये पूर्ण होतात.’’

५. श्रावण मासाचे महत्त्व

श्रावण मासात संयमाने आणि नियमपूर्वक जो एकभुक्त व्रत करतो आणि प्रतिदिन भगवान शिवाला अभिषेक करतो, तो स्वतःसुद्धा पूजनीय होऊन जातो अन् कुळाची वृद्धी करतांना त्याचे यश आणि गौरव वाढतो. या मासाच्या कृतींशी संबंधित महाभारतात पुढीलप्रमाणे सांगितले आहे,

श्रावणं नियतो मासमेकभुक्तेन यः क्षिपेत् ।
यत्र तत्राभिषेकेन युज्यते ज्ञातिवर्धनः ।।

– महाभारत, पर्व १३, अध्याय १०९, श्लोक २६

अर्थ : जो संपूर्ण श्रावण मास स्वतःचे मन आणि इंद्रिय यांचे संयमन करून केवळ एकभुक्त राहून (एक वेळाच भोजन करून) घालवतो, त्याला विविध तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य मिळते, तसेच त्याच्या कुटुंबाचीही वृद्धी होते.’

(साभार : मासिक ‘कल्याण’, जुलै २०१६)