‘सर्वनामे’ आणि त्यांची वैशिष्ट्ये !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘प्राचीन काळी आर्यावर्ताची मातृभाषा आणि ज्ञानभाषा असलेल्या संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण व्याकरणातील विविध प्रकारच्या ‘नामां’विषयी माहिती घेतली. आजच्या लेखात ‘सर्वनामां’विषयी जाणून घेऊ.

(लेखांक १० – भाग १)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/598484.html

१. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणत असणे

एखाद्या परिच्छेदामध्ये एकच नाम प्रत्येक वाक्यात पुन्हा पुन्हा आले, तर वाचणार्‍याचा रसभंग होतो. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

‘प्रशांत घाईघाईने घरात शिरला. प्रशांतच्या हातात एक जाडजूड भाषाशास्त्राचे पुस्तक होते. ते प्रशांतने घरात अगदी व्यवस्थित ठेवले. प्रशांतला त्याच्या मामाने ते टपालाद्वारे पाठवले होते. प्रशांतसाठी ते पुस्तक अत्यंत अमूल्य होते. प्रशांतच्या काही मित्रांकडेही असेच भाषाशास्त्राचे पुस्तक होते.’

वरील परिच्छेदातील प्रत्येक वाक्यात ‘प्रशांत’ हे नाम आले आहे. ते वाचावयास बरे वाटत नाही. त्याऐवजी हा परिच्छेद पुढीलप्रमाणे लिहिला, तर अधिक वाचनीय होतो.

‘प्रशांत घाईघाईने घरात शिरला. त्याच्या हातात एक जाडजूड भाषाशास्त्राचे पुस्तक होते. ते त्याने घरात अगदी व्यवस्थित ठेवले. त्याला त्याच्या मामाने ते टपालाद्वारे पाठवले होते. त्याच्यासाठी ते पुस्तक अत्यंत अमूल्य होते. त्याच्या काही मित्रांकडेही असेच भाषाशास्त्राचे पुस्तक होते.’

वरील परिच्छेदामध्ये केवळ पहिल्या वाक्यात ‘प्रशांत’ हे नाम आले आहे. पुढे या नामाच्या जागी ‘त्याच्या, त्याने, त्याला’ हे शब्द आले आहेत. अशा प्रकारे सतत येणार्‍या एकाच नामाच्या जागी वापरल्या जाणार्‍या यांसारख्या शब्दांना ‘सर्वनामे’ असे म्हणतात. सर्वनामांची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

मी, तू, आम्ही, तुम्ही, ते, ती, त्या, हा, कुणी, काय इत्यादी.

२. सर्वनामांची वैशिष्ट्ये

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२ अ. सर्वनामांना भाषेतील अन्य शब्दांप्रमाणे स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसणे : भाषेतील विविध शब्दांना स्वतःचे स्वतंत्र अर्थ असतात. ते शब्द उच्चारले की, त्या गोष्टी, तसेच त्यांच्याशी संबंधित गोष्टी क्षणार्धात आपल्या दृष्टीसमोर येतात, उदा. बांगड्या, शेत, आंदोलन, इयत्ता, उदबत्ती इत्यादी. सर्वनामांचे मात्र तसे नसते. ‘तो’ हे सर्वनाम उच्चारले, तर लगेच ‘कोण तो ?’, हा प्रश्न पडतो. फारतर ‘बोलणारा कुठल्यातरी पुल्लिंगी गोष्टीविषयी बोलत आहे’, एवढेच ऐकणार्‍याला समजते. सर्वनामांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो. ज्या नामाच्या ऐवजी ही सर्वनामे वापरली जातात, ते नाम हाच त्यांचा अर्थ असतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. अक्षय सकाळी लवकर उठून शाळेत गेला. आज तो फार आनंदात होता. – यातील ‘तो’ हे सर्वनाम ‘अक्षय’ला उद्देशून वापरले आहे. त्यामुळे ‘अक्षय’ हा त्या सर्वनामाचा अर्थ आहे.

२. मांजर स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत आले. त्याने दुधाच्या पातेल्याच्या झाकणाला पाय लावला. – यातील ‘त्याने’ या सर्वनामाचा अर्थ ‘मांजराने’ असा आहे.

३. समुद्र खवळला होता. त्याचे रौद्र रूप पाहून सारेच घाबरले. – यातील ‘त्याचे’ या सर्वनामाचा अर्थ ‘समुद्राचे’ असा आहे.

२ आ. परिपूर्ण अर्थ सांगणारे वाक्य लिहितांना त्यात प्रथम एखादे नाम आल्याखेरीज सर्वनाम न येणे : ‘मानसीने घर आवरले आणि तिला हरवलेली कागदपत्रे सापडली’, या वाक्यात प्रथम ‘मानसी’ हे नाम आले आहे अन् त्यापुढे ‘तिला’ हे सर्वनाम आले आहे. त्यामुळे ‘तिला’ म्हणजे ‘मानसीला’ हे वाचकाला लगेच कळते. अशा प्रकारे परिपूर्ण अर्थ सांगणारे वाक्य लिहितांना त्या वाक्यात सर्वनाम येण्यापूर्वी नाम येऊन गेले असणे आवश्यक आहे. वाक्य अथवा परिच्छेद यांत केवळ सर्वनामे लिहीत गेलो, तर ‘कुणी, काय, केव्हा केले ?’, याविषयी वाचकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

२ इ. एकच सर्वनाम अनेक नामांसाठी वापरले जात असणे : ‘ते’ हे एकच सर्वनाम ‘बाळ, झाड, उपकरण, चूर्ण, माध्यम, विमानतळ, वाद्य, मन’, अशा सर्व नामांसाठी वापरता येते. अशा प्रकारे सर्व सर्वनामे अनेक नामांसाठी वापरली जातात.’

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड.,