‘नामे’ आणि त्यांचे प्रकार

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘दुहेरी अवतरणचिन्ह (‘‘  ’’)’ आणि ‘अपसारणचिन्ह (-)’ यांविषयीची माहिती घेतली. आजच्या लेखात व्याकरणातील विविध प्रकारच्या ‘नामां’विषयी जाणून घेऊ. 

(लेखांक ९)

१. ‘नाम’ या शब्दाचा व्याकरणातील अर्थ

‘नाम’ हा संस्कृत शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ ‘नाव’ असा आहे. व्याकरणात मात्र ‘व्यक्ती, प्राणी, वनस्पती, पदार्थ, वस्तू इत्यादी कोणत्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टी; त्यांचे गुण, अवगुण, तसेच धर्म (नैसर्गिक वर्तन) यांना दिलेल्या नावांना ‘नामे’ असे म्हणतात, उदा. संगीता, दीपक, गाय, प्राजक्त, दूध, पालेभाजी, पलंग, साधेपणा इत्यादी.’ अशा प्रकारे व्याकरणात नामाचा अर्थ पुष्कळ व्यापक आहे.

२. नामांचे प्रकार

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

२ अ. सामान्यनाम : एकाच जातीच्या गोष्टींमध्ये समान गुणवैशिष्ट्ये आढळतात. मग या जातीला भाषेत एक नाव दिले जाते. हे नाव त्या संपूर्ण जातीचे नाव असते. अशा नावाला ‘सामान्यनाम’ असे म्हणतात, उदा. ‘ज्या जातीतील प्राण्यांना चार पाय असतात, जे भुंकतात, तसेच स्वतःच्या धन्याप्रती निष्ठावान असतात, त्या जातीतील प्राण्यांना ‘कुत्रा’ असे म्हणतात.’ येथे ‘कुत्रा’ हे सामान्यनाम आहे. अशी आणखी काही सामान्यनामे पुढे दिली आहेत.

देश, अरण्य, आई, भाषा, खाऊ, कपडे, खूण, वनस्पती इत्यादी.

२ आ. विशेषनाम : ज्या नामाद्वारे कोणत्याही एका संपूर्ण जातीचा बोध होत नसून एखाद्या जातीतील एखादी विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राणी इत्यादींचा बोध होतो, त्याला ‘विशेषनाम’ असे म्हणतात. विशेषनाम हे त्या गोष्टीचे स्वतःचे नाव असते. सूत्र क्र. ‘२ अ’मध्ये दिल्याप्रमाणे ‘कुत्रा’ हे एका जातीचे नाम आहे; म्हणून ते सामान्यनाम आहे; पण एखाद्याने स्वतःच्या कुत्र्याचे नाव ‘मोती’ असे ठेवले, तर ते त्या विशिष्ट मोती नावाच्या कुत्र्याचे स्वतःचे नाव होते. त्यामुळे ते विशेषनाम ठरते. अशा काही विशेषनामांची उदाहरणे पुढे दिली आहेत.

दासबोध, सह्याद्री, नर्मदा, सावित्री, दीपक, कन्नड, इस्रायल, कबड्डी इत्यादी.

२ इ. ‘धर्मवाचकनाम’ किंवा ‘भाववाचकनाम’

२ इ १. कोणत्याही गोष्टीतील गुणावगुण अथवा त्यांचा धर्म यांचा बोध करून देणारी नामे ! : ज्या नामांद्वारे व्यक्ती, प्राणी, वस्तू इत्यादींमध्ये असलेले गुण, अवगुण, भाव किंवा त्यांचा धर्म (नैसर्गिक वर्तन) यांचा बोध होतो, त्यांना ‘धर्मवाचकनामे’ अथवा ‘भाववाचकनामे’ असे म्हणतात, उदा. किचकटपणा, शौर्य, ममत्व, दादागिरी इत्यादी. कोणत्याही गोष्टीचे गुणावगुण किंवा तिचा धर्म हे त्या गोष्टीतच सामावलेले असतात. एक प्रकारे तो त्या गोष्टीचा स्वभाव असतो. बहुतांश भाववाचकनामे ही शब्दांना ‘य, त्व, पणा, ई, ता, गिरी, वा, आई’ यांसारखे प्रत्यय लागून सिद्ध होतात. याची उदाहरणे सूत्र क्र. २ इ ४. मध्ये दिली आहेत.

२ इ २. एखाद्या गोष्टीची स्थिती किंवा क्रिया दर्शवणारी नामे ! : वृद्धत्व, गरिबी, स्थूलपणा, आपलेपणा हे शब्द एखाद्याची स्थिती दर्शवतात; तर चाल, हास्य, लूट, नृत्य या क्रिया आहेत. कोणत्याही गोष्टीची स्थिती किंवा क्रिया दाखवणार्‍या नामांनाही भाववाचकनामेच म्हणतात.

२ इ ३. सामान्यनामांचे अनेकवचन होऊ शकणे; पण विशेषनामे आणि भाववाचकनामे एकवचनीच रहाणे : सामान्यनामांचे अनेकवचन होऊ शकते, उदा. अनेक पुस्तके, अनेक मुलगे, अनेक उपवने इत्यादी. मात्र विशेषनामे, उदा. राजेश, यमुना, विंध्य इत्यादी आणि भाववाचकनामे, उदा. चातुर्य, देवत्व, शहाणपण यांची अनेकवचने होऊ शकत नाहीत. ही नामे एकवचनीच रहातात.

२ इ ४. सामान्यनामे आणि विशेषनामे यांना ‘य, त्व, पणा, ई, ता, गिरी, वा, आई’ यांसारखे प्रत्यय लावून भाववाचकनामे सिद्ध करण्याची पद्धत

थोडक्यात, सामान्यनामे आणि विशेषनामे यांच्याद्वारे ‘कोणत्या सजीव-निर्जीव गोष्टींविषयी आपण बोलत आहोत ?’, याचा बोध होतो, तर भाववाचकनामांद्वारे विशिष्ट गोष्टींतील गुण, त्यांचे धर्म, त्यांची स्थिती आदींचा बोध होतो.

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/600287.html

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२२)