पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – राज्यातील नवे सरकार हे जनता आणि सर्वसामान्य यांचे आहे. मी २४ घंटे जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असल्याच्या भावनेने मला हे काम करायचे आहे. राज्यातील अनेक लोकांमध्ये बुद्धीमत्तेचे प्रमाण अधिक आहे. याचा लाभ आपण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी करू. पंढरपूरचा विशेष विकास आराखडाही सिद्ध करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते पंढरपुरात जनतेशी संवाद साधत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘शासन आणि प्रशासन ही रथाची २ चाके असल्याने ती समान वेगाने धावायला हवीत. दोन्ही चाके गतीने धावली, तरच राज्याच्या विकासालाही गती येईल. पंढरपूर हे आपल्यासारख्या गोरगरिबांचे दैवत आहे. वारकर्यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण असायला हवे. त्यासाठी पंढरपूरच्या विकासासाठी एक विशेष विकास आराखडा सिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सर्व सुविधांनी युक्त असेल.’’