श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘देवच माझ्या माध्यमातून ही सेवा करवून घेणार आहे’, असा साधकाचा भाव असावा !

‘मी’च सेवेचे दायित्व पार पाडणार आहे’, अशी ज्याची भूमिका असते, त्याला त्याच्या ‘मी’पणातूनच सेवेचा ताण येतो; परंतु जो साधक ‘देवच माझ्या माध्यमातून ही सेवा करून घेणार आहे’, असा विचार करतो, त्याला त्या दायित्वाचा ताण न येता उलट आनंद मिळतो.

तेव्हा ‘सेवा स्वतः करायची कि देव सेवा करवून घेत आहे’, अशी भूमिका घ्यायची, हे ज्याचे त्याने ठरवावे आणि सेवेचे दायित्व स्वतःतील देवावर सोपवून स्वतः तणावमुक्त रहावे.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.४.२०२०)


सतत भावावस्थेत रहाण्यासाठी प्रत्येक कृती भाव ठेवून करण्याचा सराव करावा !

‘सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची. असा सतत सराव केल्याने आपण जास्त वेळ भावस्थिती अनुभवू शकतो, उदा. साडी नेसतांना ‘देवीला साडी नेसवत आहे’, असा भाव नसला, तर अर्धी नेसलेली साडी सोडून पुन्हा भाव ठेवून साडी नेसावी, तसेच केस विंचरणे, बसणे इत्यादी कृती करतांना करावे.’’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, गोवा.


‘घरात आपल्या समवेत साक्षात् भगवंत आहे’, या दृढ श्रद्धेने साधना करावी !

घरात एकटे राहून साधना करतांना घरात करता येतील, अशा सोप्या सोप्या सेवा कराव्यात. ‘मी घरात एकटी आहे, तर काय करणार ?’, असा विचार करू नये. ‘आपल्या समवेत साक्षात् भगवंत आहे. तो सार्‍या ब्रह्मांडाचा चालक आहे. तो आपल्या जीवनाचा सारथी होणार नाही का ?’, अशा दृढ श्रद्धेनेच साधना करावी.’ – श्रीचित्‌‌शक्ति  (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)


साधकातील भाव कसे कार्य करतो ?

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मर्दन करण्याची सेवा करून आलेल्या साधकात भाव नसल्याने त्याच्या मनाची स्थिती चांगली नसणे; मात्र त्या साधकाकडे पहाणार्‍या अन्य साधकाचा भाव चांगला असल्याने त्या साधकाला संतांतील चैतन्याचा अधिक लाभ होणे

‘एक साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मर्दन करण्याची सेवा करायचा. एकदा त्याला होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे त्याच्या मनाची स्थिती चांगली नव्हती. परात्पर गुरु डॉक्टरांना मर्दन करून झाल्यावर तो सहसाधकांशी नेहमीप्रमाणे सेवेच्या काही विषयांवर बोलत होता. संतसेवा करणार्‍या साधकाला पाहून एका साधकाला मनोमन पुष्कळ आनंद झाला आणि त्याची भावजागृती होऊ लागली. तेव्हा त्या साधकाचा भाव होता, ‘संतांचा प्रत्यक्ष सत्संग लाभलेल्या, त्यांची स्थुलातून सेवा करणार्‍या साधकाचा सहवास मला लाभत आहे’, हे माझे भाग्यच आहे.’ त्यामुळे त्या साधकाची संतांची सेवा करणार्‍या साधकाच्या चरणीही कृतज्ञता व्यक्त होत होती. संतसेवा करणार्‍या साधकाच्या मनाची स्थिती मात्र आतून चांगली नव्हती. तो प्रत्यक्ष संतसेवा करूनही भावाच्या अभावामुळे कोरडाच राहिला होता.

संतसेवा करणार्‍या साधकाची स्थिती चांगली नसली, तरी त्याच्याकडे पहाणार्‍या साधकाचा भाव मात्र चांगला असल्याने प्रत्यक्ष संतसेवा करणार्‍या साधकापेक्षा दुसर्‍या साधकाला संतांच्या चैतन्याचा अधिक लाभ झाला.

२. साधकाने भावजागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ‘सर्वत्र देवाला कसे पहायचे ?’, हे त्याला शिकायला मिळून साधनेत प्रगती करून घेता येणे

‘भाव तेथे देव’, असे का म्हणतात ?’, हे यातून लक्षात येते. भावसत्संगात जे भावप्रयोग सांगितले जातात, भावजागृतीसाठी आपण जे प्रयत्न करतो, ते साधकाला केवळ आनंद आणि उत्साह देण्यापुरते नसून त्याच्या इतरांकडे पहाण्याच्या दृष्टीमध्येही योग्य पालट घडवून आणतात. त्यामुळे साधक ‘सर्वत्र देवाला कसे पहायचे’, हे शिकतो आणि प्रगती करून घेतो.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१४.४.२०२०)