सद्गुरु हेच शिष्याचे सर्वस्व असते. स्वतःची सेवा करतांना इतरांना त्रास होत नाही ना किंवा त्यांच्या सेवेत अडथळा येत नाही ना, याची काळजी शिष्य घेतो. शिष्याच्या कोणत्याही कृतीमुळे इतरांच्या मनात त्याच्याविषयी, गुरूंविषयी किंवा अन्य कुठलेही विकल्प नसतात. इतरांना त्याच्या साधकत्वाविषयी निश्चिती असते. गुरुकार्य व्यवस्थित करण्यासाठी आवश्यक असलेल्या नेतृत्वासाठी लागणारे विविध गुण शिष्यामध्ये असतात. त्याचे गुरुबंधूंच्या आध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष असते. साधकांनी साधनेचे प्रयत्न वाढवून गुरूंचे ‘शिष्य’ होण्यासाठी त्यांच्यात पात्रता निर्माण करणे अपेक्षित असते !
(संदर्भ – सनातननिर्मित ग्रंथ ‘शिष्य’)
भाव म्हणजे देवाच्या अस्तित्वाची जाणीव !
देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे भाव. देवाच्या अस्तित्वाची जाणीव सातत्याने होण्यासाठी साधक विविध प्रकारचे प्रयत्न करतात. आत्मनिवेदन, काही सेकंदाचे भावप्रयोग, काही मिनिटांच्या भावार्चना, कृतीला भाव जोडणे, श्रीकृष्ण किंवा गुरु यांच्याशी सतत बोलणे, प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करणे, ‘आता देवाला काय अपेक्षित आहे’, असा विचार करून कृती करणे, देवाचे किंवा गुरूंचे अस्तित्व सतत अनुभवायचा प्रयत्न करणे, स्वतःमध्येच गुरु किंवा देव यांचे अस्तित्व अनुभवणे, मानसपूजा किंवा आरती करणे असे विविध प्रकारे भाव ठेवून सनातनचे साधक भावजागृतीसाठी प्रयत्न करतात. भावजागृतीच्या या विविध प्रयत्नांनी ईश्वराशी अनुसंधान वाढवण्याची किंवा त्याचे अस्तित्व अनुभवण्याची जाणीव मनाला करून दिली जाते !
भावाचे महत्त्व
न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये ।
भावे तु विद्यते देवो, तस्माद्भावो हि कारणम् ।।
अर्थ : देव लाकडाच्या, दगडाच्या किंवा मातीच्या मूर्तीत नसतो. देव भावात असतो; म्हणून भाव महत्त्वाचा असतो.
‘अमृतप्राशनाने अमरत्व येते’, असे म्हणतात; पण अमरत्व जरी आले, तरी इच्छा-आकांक्षा या रहाणारच. त्यामुळे मायाजालात अडकूनच रहायला होते; पण जो जीव एकदा ‘भावा’चे अमृतप्राशन करतो, त्याची सर्व मोह-माया, जन्म-मरण यांच्या घोर चक्रातून मुक्ती होते. हे आहे भावाचे महत्त्व !
– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
भावाचे घटक आणि टक्के
१. प्रार्थना : २०
२. कृतज्ञता : १०
३. सेवा : १०
४. प्रीती : १०
५. आनंद : ३०
६. शांती : १०
७. इतर : १० टक्के
एकूण १०० टक्के
भाव जागृत झाल्याची लक्षणे
१. स्तंभ (स्तंभित होणे)
२. स्वेद (घाम येणे)
३. रोमांच
४. वैस्वर्य (स्वरभंग)
५. कंप
६. वैवर्ण्य (वर्ण पालटणे)
७. अश्रूपात
८. प्रलय-चेष्टा निरोध (मूर्च्छा येणे)
‘जेव्हा आठही लक्षणे एकाच वेळी दिसतात, तेव्हा ‘अष्टसात्त्विकभाव’ जागृत झाला’, असे म्हणतात.
भाव कुणात निर्माण होतो ?
भाव निर्माण होण्यासाठी एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी न्यूनतम ५० टक्के असायला लागते. पातळी ५० टक्के होण्यासाठी नामजप, सत्संग, सत्सेवा आदी साधनेतील घटक सातत्याने आचरणात आणावे लागतात. भाव निर्माण झाल्यानंतरही सतत भावावस्थेत रहाता येण्यासाठी साधना सतत करावी लागते.
भाव निर्माण होण्यातील अडथळे !
अज्ञान, कर्तेपणा, अहं, दोष आणि बुद्धीचा अनावश्यक वापर
(संदर्भ – सनातनचा ग्रंथ ‘भावजागृतीसाठी साधना’)
भाव निर्माण होण्यासंदर्भात गुरुदेवांनी आश्वस्त करणे !
८० टक्के तळमळ असल्यास भाव निर्माण होणारच ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
वर्ष २००३ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी एकदा म्हटले होते, ‘यापुढे मी भाव असलेल्या साधकांनाच भेटीन.’ त्या वेळी मला पुष्कळ वाईट वाटले होते. ते परात्पर गुरु डॉक्टरांना सांगण्याची संधी त्यांच्याच कृपेने मिळाली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘८० टक्के तळमळ असेल, तर भाव निर्माण होणारच आहे.’’ ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी असे सांगून मला आशीर्वादच दिला’, असे त्या वेळी मला वाटले आणि साधनेच्या पुढील प्रवासाला आरंभ झाला. वर्ष २००८ मध्ये पू. काकांनी (सद्गुरु जाधवकाका यांनी) सेवेच्या शेवटच्या दिवशी उपायांचे महत्त्व सांगतांना ‘गुरुकृपेने तुमचा भाव जागृत झालेला आहे. पुढे अव्यक्त भावाकडे जायचे आहे’, असे सांगताच वरील ५ वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. खरंच, परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक साधकाकडे कसे लक्ष ठेवून असतात, याचीच ही अनुभूती आहे. माझ्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेला हा खाऊच आहे. परात्पर गुरु डॉक्टर ‘आपल्याला खाऊ का पाठवत नाहीत ?’, असे यापूर्वी वाटत असे; पण हा खाऊ माझ्या साधनेच्या प्रवासातील पुढील टप्पाच होता, असे वाटते.’
– श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), नांदेड
भाव कसा असावा ?
१. ‘मी भगवंताचे ऐकत आहे’, असा भाव ठेवावा.
२. प्रार्थना करतांना ‘आपण देवाच्या चरणांजवळ बसून किंवा चरणांवर डोके ठेवून प्रार्थना करत आहोत’, असा भाव ठेवावा.
३. प्रार्थना करतांना आपल्यात देवाचे तत्त्व जागृत होते आणि चारही मुक्ती प्राप्त होतात. त्यामुळे ‘ही प्रार्थना मला मोक्षाला नेणार आहे’, असा भाव हवा.
४. प्रार्थना गोड स्वरात, संथ आणि एका लयीत करावी. त्यामुळे भावजागृती होऊन भाव टिकून रहातो.
– गुरुचरणी शरणागत, सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२०)
१. ‘मी श्रीकृष्णाशी बोलतांना ‘तो माझ्या समवेतच आहे’, असे वाटते.
२. मी एखाद्या दिवशी बोलायचे विसरले, तर ‘तो माझ्यावर रुसून दूर निघून गेला आहे’, असे वाटते. त्यानंतर त्याचा राग घालवण्यासाठी मला त्याची पुष्कळ मनधरणी करावी लागते.
३. काही चूक करून मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर ‘तो माझ्याकडे रागावून पहात आहे’, असे जाणवते. जेव्हा मी सकाळी उशिराने उठते, तेव्हा तो माझ्याकडे रागाने पहातो.
४. मी नामजप करून श्रीकृष्णाच्या चित्रासमोर जाते. तेव्हा ‘तो माझ्याकडे पाहून मधुर हसत आहे आणि तो माझ्यावर पुष्कळ प्रसन्न आहे’, असे जाणवते.’
– कु. पूजा आचार्य, जिल्हा चिक्कमगळूर, कर्नाटक. (१७.११.२०१८)
भावजागृती म्हणजे काय ?
भावजागृती म्हणजे लहान मुलांच्या भातुकलीच्या खेळासारखे असल्याचे वाटणे
‘मला प्रतिदिन नवीन अनुभूती येण्यामागचे कारण काय, ते शास्त्रच समजून घेऊया; म्हणून मी त्या दिशेने चिंतन करायला आरंभ केल्यावर ‘भावजागृती म्हणजे लहान मुलांच्या भातुकलीच्या खेळासारखे आहे’, असे वाटले. जशी लहान मुले मातीच्या खेळण्यांना ‘हे आवडते कि ते ?’, असे प्रश्न विचारून मनात आलेल्या विचारानुसार खेळ खेळत असतात. त्याचप्रमाणे मीही प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांना प्रार्थनास्वरूप प्रश्न विचारत गेलो अन् मला नवीन नवीन अनुभूती येऊ लागल्या.’
– श्री. अशोक नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
श्रद्धेचे भक्तीत रूपांतर करणारा तो भाव होय !
‘भाव तेथे देव’ अशी म्हण आहे. ‘श्रद्धा तेथे देव’ अशी नाही. भाव हा श्रद्धा आणि भक्ती यांच्या दरम्यान असतो. श्रद्धा ही प्राथमिक स्वरूपाची म्हणता येईल. ‘जो विभक्त नाही तो भक्त’, ही अद्वैताची अवस्था आहे. श्रद्धेचे भक्तीत रूपांतर करणारा तो भाव होय ! बुद्धी हा भावाचा घटकच नाही. त्यामुळे भाव हा नेहमी ‘भोळा भाव’ असतो.
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – ‘शिष्य’)
भावामुळे स्थूलदेहाची शुद्धी होते !
भावामुळे स्थूलदेहाची शुद्धी होण्यास आरंभ होतो. देहाची शुद्धी होणे म्हणजे सत्त्वगुण वाढणे. या प्रवासात जीव साधनेतील अनेक टप्पे शिकत असतो. व्यक्त भावामुळे प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी होते, तर अव्यक्त भावामुळे प्राणमयकोष आणि मनोमय कोष यांची शुद्धी होते.
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – ‘भावाचे प्रकार आणि जागृती’)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |