स्वत:च्या प्रवासासाठी दिला जाणारा विशेष राजशिष्टाचार मुख्यमंत्र्यांनी नाकारला !

मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफ्याच्या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव मार्गावरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. यामुळे अन्य वाहनचालकांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन स्वत:च्या प्रवासाच्या वेळी विशेष राजशिष्टाचार न पाळण्याचे निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ जुलै या दिवशी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या प्रवासाच्या वेळी मार्गावरील पोलीस पहारा यापुढे न्यून करून कुठेही वाहने अडवली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ‘हे सर्वसामान्यांचे शासन असून महनीय व्यक्तींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य द्यावे’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. या वेळी   प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी त्या मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, तसेच पहार्‍यासाठी अनेक पोलीस नियुक्त केल्याने पोलीस दलावरही कामाचा ताण येतो. मागील ३-४ दिवस प्रवास करतांना हा भाग मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आला. यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. अतीमहत्त्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका या वेळी वाहतूक कोंडीत अडकल्या, तर रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व कारणांमुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

संपादकीय दृष्टिकोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेखनीय आणि अभिनंदनीय निर्णय !