मुंबई – मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर येऊन एकनाथ शिंदे यांनी ७ जुलै या दिवशी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हात धरून त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले. या वेळी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, आई सौ. लता शिंदे, सूनबाई सौ. वृषाली शिंदे आणि नातू उपस्थित होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल आणि श्रीफळ देऊन या वेळी सत्कार केला. स्वत: मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला; मात्र फडणवीस यांनी शिंदे यांचा हात धरून त्यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवले. मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही छायाचित्रे लावण्यात आली आहेत.