‘हिंदुत्व’ हेच आमचे धोरण : हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही ! – नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – आमच्या रक्तात गद्दारी नाही. आम्ही गद्दारी केलेली नाही, तर आम्ही उठाव केला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांद्वारे आम्ही पुढे जाणार आहोत. आम्ही काल शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत आणि भविष्यातही शिवसैनिकच राहू. आम्ही जे केले, त्यामागे हिंदुत्वाचा विचार आहे. ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यांच्याकडेच आम्ही गेलो आहोत. हिंदुत्व हेच आमचे धोरण असून पदासाठी हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

(सौजन्य : ABP MAJHA)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,

१. महाविकास आघाडीची कार्यपद्धत पहाता ‘भविष्यात शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून येतील कि नाही ?’ असा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. शिवसैनिक माझ्याकडे येऊन त्यांच्या व्यथा सांगत होते.

२. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी समजावून सांगण्याचा मी ५ वेळा प्रयत्न केला; परंतु त्यात अपयश आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमवेत सत्तेत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका होऊनही आम्ही बोलू शकत नव्हतो. दाऊदच्या समवेत लागेबांधे असणार्‍यांवर कारवाई करू शकलो नाही. ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ नामांतर करण्यासाठी आम्हाला इतका वेळ लागला.

३. ‘शिवसेना कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना समवेत घेणार नाही. ते आपले शत्रू आहेत. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. ज्या वेळी असे होत आहे, असे मला वाटेल, तेव्हा मी हे सर्व बंद करीन’, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. बाळासाहेबांचे हेच विचार आम्ही पुढे नेत आहोत.

४. हे शिवसेना आणि भाजप युतीचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शासन आहे. यापुढे शिवसैनिकांच्या जीवनात आमूलाग्र पालट केल्याविना आम्ही रहाणार नाही.

५. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला लाभ होऊ शकला नाही. शिवसेनेकडे सत्ता असूनही त्याचा लाभ शिवसेनेला होणार नसेल, तर कधी होणार ? मी सर्वांच्या हक्काचा माणूस आहे.

२०० आमदार निवडून आणले नाहीत, तर गावाला शेती करायला जाऊ !

‘सद्यःस्थितीत आमचे ५० आणि भाजपचे ११५, असे १६५ इतके संख्याबळ आहे. पुढील निवडणुकीत मात्र शिवसेना आणि भाजप युतीचे २०० आमदार निवडून आणू, अन्यथा गावाला शेती करायला जाऊ’, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.

कोणतीही न्यूनता भासू देणार नाही, असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला ‘तुमच्यामागे खंबीरपणे उभे राहू’, असे आश्‍वासन दिले आहे.

आमची संख्या अल्प असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री केले गेले. ‘तुम्हाला कोणत्याही गोष्टीची न्यूनता भासू देणार नाही’, असे आश्‍वासन मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे, असे या वेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.