परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या केलेल्या रथोत्सवाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तिथीनुसार ८० वा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांचा ‘रथोत्सव’ करण्यास सप्तर्षींनी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’त पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले होते. या रथोत्सवाचा मार्ग गोव्यातील सनातनचा रामनाथी आश्रम ते नागेशी येथे साधक सेवा करतात ते ठिकाण हा १ कि.मी.चा रस्ता आणि पुन्हा नागेशी ते रामनाथी आश्रम, असा ठरवला होता. रथोत्सवाची वेळ दुपारी ३ ते ५ अशी होती. या रथोत्सवाच्या ३ दिवस आधीपासून पुष्कळ पाऊस पडत होता. त्यामुळे या रथोत्सवात पाऊस, वारा यांच्या माध्यमातून आणि आध्यात्मिक स्तरावर कोणतेही अडथळे येऊ नयेत, तसेच हा रथोत्सव सप्तर्षी अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असा व्हावा आणि या रथोत्सवाचे सप्तर्षींना अपेक्षित असे कार्य पूर्ण फलदायी व्हावे, यांसाठी मला नामजपादी उपाय करायचे दायित्व दिले होते. या संदर्भात गुरुदेवांनी माझ्याकडून पुढील सेवा करवून घेतल्या.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. रथोत्सवाला देवांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आश्रमाच्या परिसरातील ३ देवतांसमोर श्रीफळ ठेवतांना पुष्कळ प्रसन्न वाटणे आणि आनंद जाणवणे

रामनाथी आश्रमाच्या परिसरात श्री सिद्धिविनायक, श्री भवानीदेवी आणि सेतूरक्षक हनुमान या देवता आहेत. रथोत्सवाला या देवांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी रथोत्सवाच्या आदल्या दिवशी या देवांसमोर प्रत्येकी एक श्रीफळ (नारळ) ठेवायचे होते. यासाठी मी चांगली वेळ बघण्यास सनातनच्या साधक-पुरोहितांना सांगितले. त्यांनी दुपारी १२ ते २ ही वेळ चांगली असल्याचे सांगितले. मी त्या त्या देवाला ते ते श्लोक म्हणण्यासाठी एका साधक-पुरोहिताला सोबत घेतले. प्रत्येक देवासमोर श्रीफळ ठेवण्यापूर्वी मी पुढीलप्रमाणे प्रार्थना केली.

‘हे देवा, तुला सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उद्या रथोत्सव आहे, हे ठाऊक आहे. यासाठी तू सर्व दिशा चैतन्यमय कर आणि निसर्ग अनुकूल कर. रथोत्सवामध्ये आध्यात्मिक स्वरूपाचे कोणतेही अडथळे येऊ नयेत. आम्हा सर्व साधकांकडून तू भावपूर्ण सेवा करून घे. यामध्ये आम्हा साधकांची साधना परिपूर्ण होऊ दे. आमच्या साधनेमुळे गुरुदेव आणि महर्षि प्रसन्न होऊ देत. या रथोत्सवाचे जे काही कार्य अपेक्षित आहे, हे पूर्ण होऊ दे, अशी तुझ्या चरणी भावपूर्ण आणि शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

प्रार्थना करून झाल्यावर मी देवासमोर श्रीफळ ठेवले. तेव्हा साधक-पुरोहिताने श्लोक म्हटला. प्रत्येक देवासमोर श्रीफळ ठेवतांना मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते आणि आनंद जाणवत होता. ‘सर्व देवांनी माझी प्रार्थना स्वीकारली आहे’, असे मला जाणवले.

२. आदल्या दिवशी रथ सजवणे चालू असतांना रथामध्ये त्रासदायक स्पंदने जाणवल्याने त्याची नारळाने दृष्ट काढणे आणि त्यामुळे रथ सजवण्याची सेवा सहजतेने अन् अपेक्षित अशी होणे

२१ मे या दिवशी सकाळी रथोत्सवासाठी आणलेल्या रथाला सजवणे चालू होते. मी रथाला पाहिले असता मला त्याच्या पुढच्या आणि मागच्या भागात थोडी त्रासदायक स्पंदने जाणवली; म्हणून मी त्याची नारळाने दृष्ट काढली. त्यानंतर तो नारळ रथासमोर फोडला असता तो उभा फुटला. याचा अर्थ ‘रथामध्ये त्रासदायक स्पंदने पुष्कळ आहेत’, असा निष्कर्ष निघतो. त्यामुळे मी रथाची आणखी एका नारळाने दृष्ट काढली. त्यानंतर तो नारळ रथासमोर फोडला असता बरोबर मधोमध आणि आडवा फुटला. याचा अर्थ ‘आता रथामध्ये त्रासदायक स्पंदने नाहीत’, असा निष्कर्ष निघतो. त्यामुळे मी कृतज्ञता व्यक्त केली. आता रथामध्ये त्रासदायक स्पंदने नसल्याने रथ सजवण्याची सेवा सहजतेने, लवकर आणि अपेक्षित अशी झाली.

३. अग्निनारायणाला रथोत्सवाच्या मार्गाची शुद्धी करण्याची प्रार्थना करणे

रथोत्सवाच्या आदल्या दिवशी सकाळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अग्निहोत्र करतांना अग्निनारायणाला रथोत्सवाच्या मार्गाची शुद्धी करण्याची प्रार्थना केली, तसेच मार्गातील झाडांवर वाईट शक्ती असतील, तर त्यांना दूर करण्याचीही प्रार्थना केली. आश्चर्य म्हणजे त्या वेळी माझ्याकडूनही तशाच प्रार्थना झाल्या.

४. रथोत्सवासाठी देवाने ५ गोष्टींसाठी जप करणे आवश्यक असल्याचे, तसेच ‘जप कोणते करायचे ?’, हे सुचवणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या अग्निहोत्र करत असतांना दुसऱ्या दिवशी असलेल्या रथोत्सवासाठी प्रार्थना करत होत्या. तेव्हा त्यांना देवाने विचार दिला, ‘उद्या रथोत्सवामधील ध्वनीयंत्रणेमध्ये पुष्कळ अडथळे येणार आहेत.’ हे त्यांनी मला सांगितले. (रथोत्सवामध्ये ध्वनीयंत्रणेवर निवेदन करण्यात येणार होते, तसेच नृत्य करण्यासाठी भक्तीगीत आणि नामजप लावण्यात येणार होता.) तेव्हा मी ((सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ) ‘रथोत्सवाकरता कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी उपाय करणे आवश्यक आहे ?’, असा प्रश्न देवाला विचारला. तेव्हा देवाने मला पुढील ५ गोष्टींसाठी जप करणे आवश्यक असल्याचे, तसेच ‘जप कोणते करायचे ?’, हे सुचवले.

५. रथोत्सवासाठी संतांनी नामजप करण्याचे केलेले नियोजन

अ. रथोत्सवातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होण्यासाठी वरील सारणीतील १ ते ३ क्रमांकांचे उपाय प्रत्येकी १ घंटा आणि रथोत्सव गुरुदेव आणि सप्तर्षी यांना अपेक्षित असा होण्यासाठी ४ क्रमांकाचा उपाय १ घंटा, असे एकूण ४ घंटे उपाय रथोत्सवाच्या आदल्या रात्री संतांनी केले.

आ. रथोत्सवाच्या दिवशी सकाळपासून ते रथोत्सवाला आरंभ होईपर्यंत सर्व प्रकारचे अडथळे दूर होण्यासाठी वरील सारणीतील १ ते ३ क्रमांकांचे उपाय तेथे दिलेल्या कालावधीपर्यंत, म्हणजे एकूण ७ घंटे केले.

इ. रथोत्सवाला आरंभ झाल्यावर सारणीतील ४ आणि ५ क्रमांकाचे उपाय तेथे दिलेल्या कालावधीपर्यंत, म्हणजे एकूण ३ घंटे केले.

ई. रथोत्सवाला आरंभ झाल्यावर १० मिनिटांनी ध्वनीयंत्रणेची ‘वायर’ तुटल्याने त्यामध्ये अडथळा आला. ‘वायर’ तुटणे, हे स्थुलातील असले, तरी त्यामागे वाईट शक्तींचाच हात असल्याचे जाणवले. मी रथोत्सवामध्ये सहभागी झालो असल्याने मला ते समजल्यावर मी लगेच नामजपाला आरंभ केला. १० मिनिटांनी ध्वनीयंत्रणा सुरळित झाली. ध्वनीयंत्रणेत पुन्हा अडथळा येऊ नये, यासाठी एका संतांना रथोत्सव पूर्ण होईपर्यंत २ घंटे नामजप करण्यास सांगितले.

६. कृतज्ञता

अशा प्रकारे रथोत्सवासाठी संतांनी एकूण १६ घंटे नामजप केला. तसेच मी ((सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ) आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अन्य उपाय केले. या उपायांमुळे, तसेच देवता, सप्तर्षी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे रथोत्सवामध्ये पावसाचा किंवा अन्य कुठलाही विशेष अडथळा आला नाही. समाजातील लोक आणि शासन यांचे सहकार्य लाभले. मुख्य म्हणजे साधकांना रथोत्सवाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेता आला. परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सनातनच्या तिन्ही गुरूंचे दर्शन साधकांना लाभल्याने ते कृतकृत्य झाले. अशा तऱ्हेने देवता, सप्तर्षी, गुरुदेव, सद्गुरु आणि संत यांच्या कृपेने गुरुदेवांचा सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे जन्मदिनी काढलेला हा रथोत्सव ‘न भूतो न भविष्यती’, असा झाला. यासाठी आम्ही सर्व साधक या सर्वांप्रती कोटीशः कृतज्ञ आहोत !’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.५.२०२२)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.