|
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेमध्ये ९ मे या दिवशी सायंकाळी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर रात्री मोठा हिंसाचार झाला. श्रीलंकेतील हंबनटोटा येथे आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली. यानंतर काही मंत्र्यांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली आहे. या हिंसाचारात एका खासदारासह ५ जणांचा मृत्यू झाला. राजपक्षे कुटुंबियांचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये रस्त्यावर हिंसाचार चालू आहे. श्रीलंकेतील सर्व शहरांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस आंदोलकांवर अश्रुधुराचा आणि बळाचा वापर करत आहेत; मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत असून आंदोलकांची संख्या वाढत आहे. कोलंबोमध्ये झालेल्या या संघर्षात १३८ जण घायाळ झाले होते. त्यांना कोलंबो नॅशनल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
Sri Lanka | Deadly violence kills MP, protester; PM Mahinda Rajapaksa quits
Watch for full report pic.twitter.com/OQjUA7nvkh
— Hindustan Times (@htTweets) May 9, 2022
सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकीर्ती अथुकोराला यांनी प्रथम सरकारविरोधी निदर्शकांवर गोळीबार केला आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली. यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, अमरकीर्तीने निट्टामबुआ येथे त्यांची चारचाकी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करणार्या दोन लोकांवर गोळीबार केला. गोळी लागून एकाचा मृत्यू झाला. यानंतर लोकांचा रोष टाळण्यासाठी खासदाराने जवळच असलेल्या इमारतीत लपण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त लोकांनी संपूर्ण इमारतीला घेराव घातला. लोकांनी वेढलेले पाहून खासदाराने स्वत:वर गोळी झाडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.