व्यावसायिकतेच्या हव्यासापोटी सध्याची भरकटलेली पत्रकारिता !

समाजमन घडत असतांना त्यामध्ये पत्रकारितेचे स्थान अतिशय महत्त्वाचे ठरते. सध्याची पत्रकारिता पहाता मात्र ‘त्यातून समाज घडत आहे कि बिघडत आहे ?’ असाच प्रश्न पडतो. पत्रकाराने समाजहित साधणारी पत्रकारिता करावी. नागरिकांनीही समाजहिताला चालना देणारी पत्रकारिता वाचावी आणि पहावी, असे अपेक्षित असते.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राष्ट्र आणि धर्म हिताला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता इतरांपेक्षा वेगळी ठरते. यातूनच ‘सनातन प्रभात’च्या वाचकांमध्ये प्रखर राष्ट्र आणि धर्माभिमान जोपासला जातो. ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून वार्तांकनाची सेवा करतांना पत्रकारितेविषयी आलेले काही कटू अनुभव येथे देत आहे. ‘सध्याच्या पत्रकारितेतून समाजाला कसे भरकटवले जाते’, हे यातून वाचकांच्या लक्षात येईल.

संकलक : श्री. प्रीतम नाचणकर, वार्ताहर, दैनिक सनातन प्रभात, मुंबई

 

निरर्थक वृत्तांच्या मागे धावून वेळ वाया घालवणारे माध्यमांचे प्रतिनिधी !

प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक झाली असतांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याची जामिनावर सुटका झाल्यावर त्याला घरी नेण्यासाठी शाहरूख खान आर्थर रोड कारागृहात येणार होते. काही कामानिमित्त मी त्या दिवशी सकाळी ८ वाजता आर्थर रोड कारागृहाच्या ठिकाणी गेलो होतो. तेथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे कारागृहाच्या बाहेरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता. तेथे असलेल्या काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींकडे चौकशी केली असता ते पहाटे ५.३० वाजल्यापासून रस्त्यावर कॅमेरे लावून उभे असल्याचे समजले. प्रत्यक्षात सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन आर्यन खान याची सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या कालावधीत कारागृहातून सुटका झाली; मात्र तोपर्यंत माध्यमांचे प्रतिनिधी कारागृहाबाहेर तिष्ठत होते. पत्रकारिता करतांना कोणत्या घटनेसाठी किती वेळ द्यावा, हे माध्यमांनी ठरवणे अपेक्षित आहे; मात्र ज्यातून काही समाजहित साधले जात नाही, अशा बातम्या देण्यासाठी पत्रकार घंटोन्घंटे वेळ वाया दवडतात.

श्री. प्रीतम नाचणकर

थेट प्रक्षेपणाच्या नावाखाली निरर्थक बातम्या दाखवणार्‍या वृत्तवाहिन्या !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर पुढे काही दिवस त्यांची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी चालू होती. त्या कालावधीत अनेक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार त्यांच्या निवासस्थानाबाहेर दिवसभर ताटकळत रहायचे. रिया चक्रवर्ती अन्वेषण यंत्रणांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडल्या की, माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या गाडीचा जीवघेणा पाठलाग करून गाडीचे व्हिडिओ ‘एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट’ (विशेष वृत्त) म्हणून प्रसारित करायचे. ‘समाजाला काडीचाही उपयोग नसलेल्या या घटनांना वारेमाप प्रसिद्धी देणार्‍या या पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कसे म्हणावे ?’ हाच खरा प्रश्न आहे.

अर्थहीन वृत्ते प्रसारित करून समाजाला भरकटवणारी माध्यमे !

काही मासांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाह राजस्थान येथे पार पडला. तेथे प्रसिद्धीमाध्यमांना प्रवेशबंदी होती. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला विवाह सोहळ्याच्या ठिकाणच्या एका खिडकीतून कतरिना कैफ आणि विकी कौशल हे दोघे विवाहाचा पोषाख परिधान करून जात असतांनाचा ‘व्हिडिओ’ प्राप्त झाला.

१-२ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दोघांचा तोंडवळा व्यवस्थित दिसत नव्हता. त्या वृत्तवाहिनीने दिवसभर हा ‘एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ’ म्हणून प्रसारित केला. अशा प्रकारे निरर्थक गोष्टींना प्रसिद्धी देऊन अनेक माध्यमे स्वत:सह समाजाचाही वेळ वाया घालवत आहेत.

‘पार्ट्यां’मध्ये मद्यपान करून पत्रकारितेची अपकीर्ती करणारे पत्रकार !

सध्या कारागृहात असलेल्या एका मंत्र्याने पत्रकारांसाठी उपाहारगृहामध्ये (हॉटेलमध्ये) पार्टी ठेवली. तेथे मद्यही दिले जात होते. अनेक पत्रकार मंत्र्यांसमवेत गप्पा मारत मद्यपान करत होते. हेच पत्रकार त्या नेत्याच्या पत्रकार परिषदेला वारेमाप प्रसिद्धी देत असल्याचे लक्षात आले. काही राजकीय नेते पत्रकारांशी हितसंबंध राखण्यासाठी अधून-मधून पत्रकारांना जेवणाचे निमंत्रण देतात. या वेळी होणार्‍या अनौपचारिक गप्पांतून राजकीय घडामोडींची देवाणघेवाण होते. लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांनी नैतिकतेचे भान ठेवायला हवे; मात्र दुर्दैवाने तसे होत नाही.

मौजमजा करण्याच्या हेतूने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणारे पत्रकार !

वर्ष २०२१ मध्ये ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे भुजबळ सिटीमध्ये घेण्यात आले. संमेलनाच्या वृत्तसंकलनासाठी मुंबईहून येणार्‍या पत्रकारांची रहाण्याची व्यवस्था तेथील पंचातारांकित उपाहारगृहात (हॉटेलमध्ये) करण्यात आली होती. काही पत्रकार केवळ खाणे, फिरणे आदी मौजमजा करण्यासाठी आले होते. काही पत्रकार दिवसभर फिरून मधेच येऊन आमच्याकडे बातम्या मागायचे.

वृत्तप्रसिद्धी करण्यासाठी पैसे मागणारे भुरटे पत्रकार !

कोरोनाच्या संकटापूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला आलेल्या ‘यू ट्यूब’ वाहिनीच्या २ पत्रकार युवतींनी प्रवक्त्यांची मुलाखत (बाईट) घेतली. एका युवतीने मला दुसर्‍या दिवशी दूरभाष करून त्यांनी केलेले वृत्त पाठवले. काही दिवसांनी दादर येथे समितीचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन असतांना दोन्ही युवती तेथे आल्या होत्या. आंदोलनाचे वृत्त प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केली. कोरोनाकाळात छोटी वृत्तपत्रे बंद पडली. त्यामुळे अनेक पत्रकारांनी स्वत:ची ‘यू ट्यूब’ वाहिनी काढली. मुंबईत आझाद मैदान, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब आदी ठिकाणी पत्रकार परिषदा, आंदोलने, छोटे-मोठे कार्यक्रम आदींच्या बातम्या करून संबंधितांना पाठवतात. काही पत्रकार संबंधितांकडून पैसे घेऊन त्यांच्या बातम्या लावतात. अशा बोगस पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पुरो(अधो)गाम्यांची बटिक झालेली पत्रकारिता !

पुणे येथील एल्गार परिषदेच्या प्रकरणात पुढे आलेल्या शहरी नक्षलवादाला साहाय्य करणार्‍या काही पुरोगामी मंडळींना अटक करण्यात आली. गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या या मंडळींचा उल्लेख अनेक मोठी वृत्तपत्रे ‘विचारवंत’ म्हणून करतात. दुसर्‍या बाजूला मालेगाव स्फोट, दाभोलकर, कॉ. पानसरे यांची हत्या आदी प्रकरणांत अडकवलेल्या हिंदुत्वनिष्ठांचा एकेरी उल्लेख करून न्यायनिवाडा होण्यापूर्वी तेच गुन्हेगार असल्याप्रमाणे ‘मिडिया ट्रायल’ चालवतात. दुसरीकडे सैन्यात असलेले प्रसाद पुरोहित किंवा साध्वी प्रज्ञा सिंह यांचा एकेरी उल्लेख केला जातो. या विरोधाभासातून पत्रकारितेतील हिंदुद्वेष पहायला मिळतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात डाव्या आणि पुरोगामी विचारांचा पगडा अशा अनेक उदाहरणांतून दिसून येतो.

पत्रकारिता करतांना साधनेची जोड आवश्यक !

सध्या पत्रकारितेला व्यावसायिक स्वरूप आले असले, तरी राजकारण्यांच्या अधीन न रहाता अभ्यासू वृत्तीने पत्रकारिता करणारे काही पत्रकारही पहायला मिळतात. राजकारण्यांकडून दिली जाणारी पाकिटे आणि भेटवस्तू यांचा स्वीकार न करता काही पत्रकार व्रतस्थपणे पत्रकारिता करतात. अशांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यांचे अनुभव मार्गदर्शक ठरतात. असे पत्रकार प्रामाणिकपणे पत्रकारिता करतात; मात्र साधनेची जोड नसल्यामुळे त्यांच्यात कर्तेपणाची भावना निर्माण होते.

– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई