वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ दुकानाच्या बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !
वाशी (नवी मुंबई), २५ सप्टेंबर – ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या आस्थापनाच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असे धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारे विज्ञापन केले. ते अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरत आहे. या विज्ञापनामुळे व्यापक आणि उच्च मूल्य जोपासणार्या धार्मिक विधीविषयी लोकांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आला आहे. या विज्ञापनाचा निषेध म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने केली आहेत. ‘वेदांत फॅशन्स लि.’ आस्थापनाने हिंदूंची बिनशर्त क्षमा मागून ‘मान्यवर’ ब्रँडचे हे विज्ञापन त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी या वेळी केली. वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ दुकानाच्या समोर झालेल्या निदर्शनांत विविध हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. त्यात ते बोलत होते. ‘शिव माऊली’ सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष राहुल यादव हेही या वेळी उपस्थित होते.
या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह हिंदु धर्मप्रेमींनी हातात निषेध फलक धरून लोकांमध्ये जागृती केली. ‘हे विज्ञापन मागे घेऊन जोपर्यंत क्षमा मागत नाही, तोपर्यंत हिंदु समाजाने ‘मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावा’, असे आवाहनही या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले.
विज्ञापन मागे न घेतल्यास हिंदु जनजागृती समितीची तीव्र आंदोलनाची चेतावणी !
‘मान्यवर’ने प्रसारित केलेल्या विज्ञापनातून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले असून ‘कन्यादान’ कसे चुकीचे आणि प्रतिगामी आहे, तसेच ‘दान करायला कन्या ही काय वस्तू आहे का ?’, असे संभ्रम निर्माण करणारे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ‘कन्यादान’ नको, तर कन्यामान म्हणा’, अशा प्रकारे थेट परंपरा पालटण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘मान्यवर’ ब्रँडचे विज्ञापन मागे न घेतल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल’, असेही डॉ. धुरी यांनी या वेळी सांगितले.
‘मान्यवर’ दुकानाच्या व्यवस्थापकांकडून हिंदूंच्या भावना व्यवस्थापनापर्यंत पोचवण्याचे आश्वासन !
या वेळी ‘मान्यवर’ दुकानाचे व्यवस्थापक नरसिंग सिंग यांना धुरी यांनी निवेदन देऊन या विज्ञापनाविषयी हिंदूंच्या असलेल्या तीव्र भावनांची जाणीव करून दिली. त्यावर सिंग यांनी ‘तुमचे म्हणणे मी व्यवस्थापनापर्यंत पोचवतो’, असे आश्वासन दिले.