अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम

हे स्तोत्र म्हणतांना पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे.

१. उच्चार अगदी स्पष्ट असावेत.

२. स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.

३. स्तोत्रपठण ‘तदर्थभावपूर्वक = तत् + अर्थ + भावपूर्वक’, म्हणजे ‘त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह’ झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त झाला पाहिजे.

४. जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावयाचे असते तेव्हा ‘वरदमूर्तये नमः ।’ येथपर्यंतच म्हणावे. त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याप्रमाणेच शांतीमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता प्रारंभी एकदा म्हणावा.

५. या स्तोत्राच्या २१ आवृत्ती म्हणजे १ अभिषेक होय.

६. स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे.

७. पाटावर न बसता त्याऐवजी धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.

८. दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.

९. पाठ म्हणण्यापूर्वी आई, वडील आणि आपले गुरु यांना नमस्कार करावा.

१०. पाठाला प्रारंभ करण्यापूर्वी जमल्यास श्री गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल वहावे. पूजा करता न आल्यास निदान गणपतीचे ध्यान एक मिनिटभर करावे, नमस्कार करावा आणि मग पाठास प्रारंभ करावा.

११. स्तोत्र म्हणतांना श्री गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ॐ कडे पाहून म्हणावे, म्हणजे लवकर एकाग्रता होते.

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘श्री गणपत्यथर्वशीर्ष व संकष्टनाशन श्री गणेशस्तोत्र (अर्थासह)’)