अफगाणी निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये !  – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

पुतिन यांना जे कळते ते भारतालाही कळले पाहिजे अन्यथा अफगाणी निर्वासितांना आश्रय देण्याच्या प्रयत्नांत तालिबानी भारतात घुसतील ! – संपादक

मॉस्को (रशिया) – अफगाणिस्तानातून बाहेर पडलेल्या निर्वासितांना रशियाच्या जवळील देशांमध्ये आश्रय देण्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आक्षेप घेतला आहे. ‘निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये. आम्हाला रशियामध्ये अफगाणी आतंकवादी नकोत’, असे पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी काही पाश्‍चात्त्य देशांकडून अफगाणिस्तानमधील निर्वासितांना मध्य आशियाई देशांमध्ये स्थलांतरित करण्याच्या कल्पनेला विरोध केला आहे.

१. निर्वासितांच्या अमेरिका आणि युरोप येथे व्हिसाची (अन्य देशात रहाण्याची अनुमती देणारा परवाना) प्रक्रिया चालू आहे. यावर पुतिन यांनी म्हटले, ‘याचा अर्थ ते (पाश्‍चात्त्य देश) स्वत: व्हिसाविना कुणालाही प्रवेश देत नसतांना व्हिसाविना आमच्या शेजारी देशांमध्ये निर्वासित अफगाणींना पाठवणार आहेत का ?’

२. दुसरीकडे रशियाने ‘तालिबानने अफगाणिस्तानमधील परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली’, असे कौतुक केले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सेरेगी यांनी ‘तालिबानचे नेते सध्या तरी दिलेले आश्‍वासन पाळत आहेत’, असे म्हटले आहे. (रशियाकडून होणार्‍या तालिबानच्या या कौतुकामागे रशियाचा राजकीय स्वार्थ आहे. अशा स्वार्थी महासत्तांमुळेच आज अफगाणिस्तानची ही स्थिती निर्माण झाली आहे ! – संपादक)