गंगानदीच्या पाण्यामध्ये ‘कोरोना’चा विषाणू जिवंत राहू शकत नाही ! – संशोधकांचा निष्कर्ष

  • गंगानदीच्या पाण्यामध्ये घातक विषाणूंची निर्मिती होत नाही !

  • गंगाजलापासून ‘कोरोनाविरोधी औषध’ बनवण्यावर संशोधन चालू !

गंगानदीच्या पावित्र्यावर शंका घेणारे, तसेच तिच्यावर श्रद्धा असणार्‍या हिंदूंना वेड्यात काढणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक ! – संपादक
गंगा नदी

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील बी.आर्.डी. मेडिकल कॉलेजकडून करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये उत्तराखंडमधील हृषिकेशपासून ते उत्तरप्रदेशातील वाराणसीपर्यंत गंगानदीमध्ये कोरोनाचे विषाणू सापडले नाहीत. याच काळात लक्ष्मणपुरी येथील नाल्यांमध्ये कोरोनाचे विषाणू सापडले होते.

बी.आर्.डी. मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) विभागाचे प्रमुख असलेले डॉ. अमरेश सिंह यांनी सांगितले की, गंगानदीच्या पाण्यामध्ये ‘बॅक्टेरियोफेज’ नावाचे ‘व्हायरस’ (विषाणू) मोठ्या प्रमाणात सापडतात. हा विषाणू इतर कोणत्याही विषाणूंना पाण्यात जगू देत नाही. तो हानीकारक विषाणूंना नष्ट करतो. त्यामुळेच गंगानदीच्या पाण्यात कोरोनाही विषाणूही जगू शकत नाही. यासमवेतच घातक जीवाणूंनाही नष्ट करण्याची ‘बॅक्टेरियोफेज’ची क्षमता असल्यामुळे गंगानदीमध्ये  बॅक्टेरियाची निर्मितीही होत नाही. ‘आय.आय.एम्. बेंगळुरू’ येथील निवृत्त प्राध्यापक आणि एक खासगी संस्था यांच्या साहाय्याने गंगानदीच्या जलाद्वारे कोरोनाविरोधी औषध बनवण्यावर संशोधन चालू आहे.

कोरोनावर उपचार म्हणून ‘बॅक्टेरियोफेज’च्या संदर्भात झालेले विशेष संशोधन !

लंडन येथील ‘हिंडावी’ ही सूक्ष्मजीवशास्त्रच्या (‘मायक्रोबायोलॉजी’च्या) क्षेत्रात कार्य करणारी जगप्रसिद्ध संस्था आहे. तिच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका शोधनिबंधामध्ये ‘बॅक्टेरियोफेज’संदर्भात विस्ताराने माहिती प्रसारित करण्यात आली आहे. संकेतस्थळावर सप्टेंबर २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोधनिबंधानुसार ‘बॅक्टेरियोफेज’ कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. त्यांचा दुहेरी लाभ होतो. ‘बॅक्टेरियोफेज’ हे घातक बॅक्टेरियांना नष्ट करण्यास सक्षम असल्याने एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यास तिच्या फुफ्फुसांमध्ये ‘बॅक्टिरियल इन्फेक्शन’ (जिवाणूंचा संसर्ग) होण्याची शक्यता बळावते. त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत, तर ती व्यक्ती मृत्यूमुखी पडू शकते. ‘बॅक्टेरियोफेज’चा दुसरा लाभ असा की, त्यातून प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) यांची निर्मिती करणे सुलभ होते. न्यूयॉर्क येथील ‘लिबर्टपब’ या संस्थेच्या मते ‘फेज डिस्प्ले’ या नोबेल पारितोषिक मिळालेल्या पद्धतीद्वारे ‘बॅक्टेरियोफेज’चा वापर करत कोरोना विषाणूंच्या विरोधात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) यांची निर्मिती केली जाऊ शकते. या एकूण पार्श्‍वभूमीवर ‘गंगाजला’चा कोरोनावरील उपचार म्हणून चालू असलेल्या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते.

‘बॅक्टेरियोफेज’ची तांत्रिक माहिती !

‘बॅक्टेरियोफेज’ हा एक व्हायरस (विषाणू) असून तो सर्व प्रकारच्या हानीकारक बॅक्टेरियांना (जिवाणूंना) नष्ट करतो. तसेच त्याच्यामध्ये ‘अँटीव्हायरल’ (विषाणूविरोधी) आणि ‘अँटीफंगल’ (बुरशीविरोधी) गुणधर्म असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यामध्ये हानीकारक अशा कोरोना विषाणूंना नष्ट करण्याचीही क्षमता आहे.