इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी नोंदवलेल्या अभिप्रायानंतर गूगलने चुकीचा संदर्भ काढून टाकला !

  • गूगलने महाराणा प्रताप यांच्या इतिहासाच्या केलेल्या विकृतीकरणाचे प्रकरण

  • दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताद्वारे केलेल्या आवाहनाचा परिणाम !

इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात संयत मार्गाने लढा देऊन यश मिळवणारे इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचे अभिनंदन ! नेहमीच अशी जागरूकता दाखवल्यास राष्ट्रहानी आणि धर्महानी रोखली जाईल !

 

मुंबई, २९ जुलै (वार्ता.) – इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी नोंदवलेल्या अभिप्रायानंतर गूगलने महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या खोटा इतिहासाचा संदर्भ काढून टाकला.

‘गूगल’वर ‘पराजित का अर्थ’ असे शोधल्यास ‘हराया हुआ’ असा अर्थ दिला जात होता. त्यासह पुढे कंसात ‘जैसे – अंततोगत्वा अकबर ने हल्दीघाटी के युद्ध में राणा प्रताप को पराजित कर दिया ।’(मराठी अर्थ : जसे -शेवटी अकबराने हळदीघाटीच्या युद्धात राणा प्रताप यांना पराजित केले’) असा चुकीचा आणि संतापजनक संदर्भही दिला होता. हा प्रकार काही राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला कळवला. याविषयीचे वृत्त २९ जुलै २०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्तामध्ये इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांना गूगलवरील हा चुकीचा संदर्भ हटवण्यासाठी अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते.  त्यानुसार अनेक इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी गूगलची चूक त्याच्या निदर्शनास आणून देत सत्य इतिहास नमूद केला. त्यामुळे गूगलने वरील चुकीचा संदर्भ काढून टाकला.

विशेष म्हणजे गूगलवर अन्य कुठल्याही शब्दांचा अर्थ शोधल्यास त्यांचा संदर्भ दिला जात नाही. केवळ ‘पराजित का अर्थ’ याचा शोध घेतल्यासच वरील चुकीचा संदर्भ गूगलकडून दिला जात होता. यातून हिंदुद्वेष्ट्यांकडून जाणीवपूर्वक हिंदूंच्या संदर्भात खोटा इतिहास पसरवून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे स्पष्ट झाले होते.