ईश्वराप्रमाणे सर्व कार्य करून स्वतः नामानिराळे रहाणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकाविषयी काढलेले कौतुकोद्गार !

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांक काढण्यात आले. ९.५.२०२१ या दिवशी ‘सनातनची दैवी गुरुपरंपरा’ हा विशेषांक प्रसिद्ध झाला. यामध्ये ‘परात्पर गुरु डॉक्टर’ आणि ‘सनातनची गुरुपरंपरा’ यांची महती सांगणारे सप्तर्षींचे लिखाण, तसेच अन्य विषयांवरील लिखाण प्रसिद्ध झाले आहे.

हा विशेषांक पाहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आनंद झाला. ते आनंदाने म्हणाले, ‘‘हा विशेषांक खूप सुंदर आहे. तुम्हा दोघींचीही (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची) छायाचित्रे पुष्कळ सुंदर आहेत. अंकातील लिखाणही खूपच अप्रतिम आहे. यापुढे माझ्यापेक्षा तुमचे लिखाणच अधिक यायला हवे.’’

त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर ईश्वराप्रमाणेच सर्व कार्य करून स्वतः मात्र नामानिराळे रहाणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांची ती अहंशून्य अवस्था पाहून माझे डोळे भावाश्रूंनी भरून आले. प्रत्यक्ष श्रीविष्णूचा अवतार असलेल्या आणि अहोरात्र जगत्पालनाचे कार्य करणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच सनातनचे हे दैवी कार्य दिवसागणिक वर्धिष्णु होत आहे.

परात्पर गुरुमाऊली, केवळ आपल्याच कृपेने सनातनला ही दैवी गुरुपरंपरा लाभली आहे. आपल्या चैतन्यामुळे ‘सनातन प्रभात’चा विशेषांकही चैतन्यमय झाला आहे आणि आपल्याच कृपेने साधकांना आम्हा दोघींविषयी अनुभूती येत आहेत. सर्वकाही आपणच करून घेत आहात. हे भगवंता, आपली शक्ती आणि कृपा यांविना एक पाऊलही पुढे टाकणे सर्वथा अशक्य आहे.

‘हे गुरुदेव, आम्हा सर्वांना आपल्या कृपाछत्राखाली सेवा आणि साधना करण्याचे महत्भाग्य निरंतर लाभू दे’, अशी आपल्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ