श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्याचा वृत्तांत
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी प्रवासात ऋषिमुनी आणि देवता यांच्या अनेक स्थानांचे दर्शन झाले. एके दिवशी हिमाचल प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागातील अधिकार्यांकडून कळले की, हिमाचल प्रदेशमध्ये लाहौल भागामध्ये ‘सूर्यताल’ आणि स्पिती भागामध्ये ‘चंद्रताल’ आहे. ताल म्हणजे तलाव. ‘हे दोन्ही तलाव पुष्कळ सुंदर आहेत; मात्र प्रवास अत्यंत कठीण आहे’, असे त्यांनी सांगितले. ही माहिती श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना कळताच त्यांनी ‘काहीही झाले, तरी आपण सूर्यताल आणि चंद्रताल येथे जायचेच’, असे ठरवले. सनातन संस्थेचे एक हितचिंतक श्री. किशन सिंग यांच्याकडून कळले की, सूर्यतालकडे जातांना वाटेत आधी ‘दीपकताल’ लागतो. त्याचेही दर्शन घ्यायचे ठरले. आज आपण सूर्यताल, दीपकताल आणि चंद्रताल या तीन स्थानांविषयी जाणून घेऊया.
१. सूर्यताल
हिमाचल प्रदेशमधील मनालीपासून १४० कि.मी. दूर मनाली-लेह रस्त्यावर हिमालय पर्वताच्या ‘बारलाचा ला पास’जवळ एक सुंदर तलाव आहे. त्याचे नाव ‘सूर्यताल’ आहे. हा तलाव हिमाचल प्रदेश या राज्याच्या लाहौल भागात आहे. या भागात ३६५ दिवस बर्फ असतो. सूर्यताल हे समुद्रसपाटीपासून १६ सहस्र फूट उंचीवर आहे. सूर्यतालमधून भागा नदी उगम पावते आणि चंद्रतालमधून चंद्रा नदी उगम पावते. या दोन्ही नद्या पुढे एकत्रित होऊन चंद्रभागा नावाची नदी सिद्ध होते. आता तिला लोक ‘चीनाब नदी’ या नावाने ओळखतात.
२. दीपकताल
मनालीहून सूर्यतालला जातांना मधे रस्त्याच्या कडेलाच दीपकताल नावाचा तलाव आहे. (‘दीपक ताल हे दिव्यासारखे दिसते. दीपकतालमध्ये अग्नितत्त्व आहे.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ)
३. चंद्रताल
हिमाचल प्रदेशमधील मनालीपासून १२० कि.मी. दूर मनाली-काजा रस्त्यावर हिमालय पर्वताच्या ‘कांजूम ला पास’जवळ एक सुंदर तलाव आहे. त्याचे नाव ‘चंद्रताल’ आहे. हा तलाव हिमाचल प्रदेश या राज्याच्या स्पिती या भागात आहे. चंद्रतालमधून चंद्रा नदी उगम पावते. चंद्रताल हे समुद्रसपाटीपासून १५ सहस्र फूट उंचीवर आहे. स्थानिक लोक मानतात की, चंद्रतालमध्ये ब्राह्ममुहूर्तावर अप्सरा ज्योतीरूपाने जलक्रीडा करायला येतात.
संग्राहक : श्री. विनायक शानभाग, कुलु, हिमाचल प्रदेश. (२५.६.२०२१)
क्षणचित्रे१. दुर्गम रस्ता आणि ऑक्सिजनचे प्रमाण अल्प असूनही परात्पर गुरुदेवांच्या कृपेने कोणताही त्रास न होणे ‘सूर्यताल, दीपकताल आणि चंद्रताल’ ही स्थाने समुद्रसपाटीपासून पुष्कळ उंचीवर आहेत. तेथे जाण्याचा रस्ता दुर्गम आहे आणि तेथे ऑक्सिजनचे प्रमाण अल्प आहे. सूर्यतालला तापमान २ डिग्री सेल्सिअस होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हा सर्वांना कोणताही त्रास झाला नाही. २. खडतर प्रवास मनालीहून चंद्रतालला जायला ६ घंटे आणि परत यायला ६ घंटे लागतात. त्यात १ घंट्याचा रस्ता चांगला आहे. उर्वरित ५ घंट्यांचा रस्ता म्हणजे रस्ता नाहीच. शेवटचे ६० कि.मी. अंतर जायला ५ घंटे लागतात. वाटेत शेकडो ठिकाणी हिमालयाचे बर्फ वितळून पाणी खाली येत असल्याने पूर्ण रस्ताच वाहून गेलेला असतो. काही ठिकाणी एकच गाडी जाऊ शकते, एवढा रस्ता असतो आणि रस्त्याच्या दुसर्या बाजूला खोल दरी आहे. असा ५ घंट्यांचा खडतर प्रवास केल्यावर आम्ही चंद्रतालच्या ‘बेसकॅम्प’ला पोचलो. येथून १ कि.मी. चालावे लागते. ऑक्सिजनचे प्रमाण अल्प असल्याने १ कि.मी. चालायला अर्धा घंटा लागतो. त्यानंतर मात्र सुंदर अशा चंद्रतालचे दर्शन घडते. ३. हिमालयाच्या शिखरांवर शुभचिन्हे दिसणे सूर्यताल आणि चंद्रताल येथे जातांना वाटेत हिमालयाच्या शिखरांवर शुभचिन्हे दिसली. एके ठिकाणी हिमशिखरावर ‘श्रीविष्णु शेषावर पहुडलेला आहे’, असे दिसले. एका पर्वतावर बर्फाचा आकार गरुडासारखा होता. एका शिखरावर ‘ॐ’ दिसला. सूर्यतालला एकाच ठिकाणी उभे राहून काढलेल्या दोन छायाचित्रांमध्ये सूर्यतालच्या पाण्याच्या रंगात फरक दिसला. पहिल्या छायाचित्रात पाण्याचा रंग हिरवा, तर दुसर्या छायाचित्रात पाण्याचा रंग निळा आहे. ४. दीपकतालच्या ठिकाणी एकीकडून बघतांना पाण्यात ‘पणती आणि तिची ज्योत’, असा आकार दिसतो. संग्राहक : श्री. विनायक शानभाग |
संध्याकाळी अग्निहोत्र करतांना अग्नीमध्ये सूर्यताल आणि चंद्रताल यांचे दर्शन होणे, ‘सूर्यताल अन् चंद्रताल येथील एकत्रित शक्तीने श्री भुवनेश्वरीदेवीची निर्मिती झालेली आहे’, असे दिसणे आणि पद्मासनात बसलेल्या श्री भुवनेश्वरीदेवीचे दर्शन होणे
‘२६.६.२०२१ या दिवशी संध्याकाळी अग्निहोत्र करतांना मला अग्नीमध्ये हिमाचल प्रदेशमधील हिमालय पर्वतावरील सूर्यताल आणि चंद्रताल यांचे दर्शन झाले. त्या वेळी लक्षात आले, ‘सूर्यतालमध्ये ‘मार्तंड’ शक्ती आणि चंद्रतालमध्ये ‘रोहिणी’ शक्ती आहे, तसेच सूर्यताल ही विश्वाची सूर्यनाडी अन् चंद्रताल ही विश्वाची चंद्रनाडी आहे.’ ‘सूर्यताल आणि चंद्रताल येथील एकत्रित शक्तीने, म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्या एकत्रित शक्तीने
श्री भुवनेश्वरीदेवीची निर्मिती झालेली आहे’, असे दिसले. ‘देवी भुवनेश्वरी हातांची मुद्रा करून पद्मासनात बसलेली आहे. देवीच्या भोवती जांभळी आभा आहे’, असे साक्षात् देवीने दर्शन दिले. सूर्यताल आणि चंद्रताल या दोन्हींमधील प्रदेश म्हणजे ‘भुवनेश्वरी लोक’ आहे. ‘भुवनेश्वरीदेवीची कृपा मिळवण्यासाठीच महर्षींनी आम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये पाठवले असावे’, असे मला जाणवले.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, हिमाचल प्रदेश.
श्री भुवनेश्वरीदेवीचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे.
भुवनेशीं महामायां सूर्यमण्डलरूपिणीम् ।
नमामि वरदां शुद्धां कामाख्यारूपिणीं शिवाम् ।।
अर्थ : जी स्वतःच ‘महामाया’ आहे, अशा सूर्यमंडलाप्रमाणे तेजस्वी रूप असणार्या, वरदान देणार्या, पवित्र, ‘कामाख्या’ या नावाने ओळखल्या जाणार्या, कल्याणकारी देवी भुवनेश्वरीला मी नमन करतो.
(‘वरील श्लोकात ‘देवी सूर्यमंडलरूपिणी आहे’, असा उल्लेख केलेला आहे, तसेच देवीपुराणात ‘देवीच्या डोक्यावर चंद्र विराजमान आहे’, असा उल्लेख आहे.’ – संकलक)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सूर्यताल आणि चंद्रताल यांची विलोभनीय छायाचित्रे पहाण्यासाठी येथे क्लिक करा !