मंदिरात कुणी यावे आणि कुणी येऊ नये ?

ह.भ.प. सखाराम बांद्रे महाराज

‘देवाला भोळे आणि भाबडे भक्त आवडतात. लबाड (‘चॅप्टर’) आवडत नाहीत. अशांनी येथे येऊच नये. स्वार्थासाठी नारळ घेऊन येणारे चोर येथे अल्प आले, तरी चालतील. मला मंदिरात ५ आले, तरी चालतील; परंतु ते खरे भक्त असले पाहिजेत. चोर, लबाड, लुच्चे, फसवे, बुडवे, ढोंगी, नाटकी, स्वार्थी, कळलावे, आगलावे, भ्रमणध्वनी घेऊन मंदिरात येणारे, फालतू संसारी गप्पा मारणारे, राजकारणाच्या गप्पा मारणारे, अशा घाणेरड्या लोकांनी येथे येऊच नये, असे मला वाटायला लागले आहे; कारण कोळसा कितीही उगाळला, तरी तो पांढरा होणारच नाही. मग फुकट उगाळण्याचे श्रम कशाला घ्या ?’

– ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

मोठी आणि सुंदर मंदिरे बांधूनही एकही भक्त न झाल्याने मंदिरांवरील सर्व खर्च व्यर्थ जाणे !

गावात चकाचक मंदिरे झाली; परंतु एकसुद्धा भक्त झाला नाही. भक्ताविषयी गाव भिकारी आहे. ईश्वरासाठी सर्व सोडलेला माणूस ‘निवळी’ गावात बांद्रे बुवाशिवाय दुसरा झालाच नाही आणि होणार नाही. सर्व संसार आणि विकार जिंकून देवाकडे यायची कुणाची सिद्धता नाही. सगळे भोगाचे भागीदार. निवळी गावात ४० – ५० लाखांची नवीन मंदिरे झाली आहेत; परंतु ईश्वराचे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान हे कुणी घेत नाही, धर्माचे ग्रंथ कुणी वाचत नाही आणि कोणीही ध्यानाला बसत नाही. माणसाच्या शरिरातील विकार धुतले गेले नाहीत, तर तो देवासारखा वागणार नाही. एवढे मोठे मंदिर बांधण्याचा उद्देश माणूस देवासारखा वागावा, हा आहे; पण वाघ्याचा पाग्या झालाच नाही. वाघ्या वाघ्याच राहिला. त्यामुळे मंदिर बांधण्याचा व्यय व्यर्थ गेला. ‘नवा देव, जुना देव’, असा वाद आणि टकरी मारण्याचा धंदा चालू झाला.’ – ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.