डी.आर्.डी.ओ.चा बोलबाला !

डी.आर्.डी.ओ. म्हणजे भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने कोविड आजारावर औषध शोधून काढले आहे. ‘२-डिऑक्सी-डि-ग्लुकोज (२ डिजी)’ असे या औषधाचे नाव आहे. डी.आर्.डी.ओ. ही संस्था संरक्षण उपकरणे, तंत्रज्ञान विकसित करते. डी.आर्.डी.ओ.कडून आतापर्यंत ‘ब्राह्मोस’, ‘अग्नी’, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, तसेच अन्य अनेक क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली आहेत. भारताची संरक्षणाची बाजू भक्कम करण्यात या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भारताची भिस्त या संस्थेवर आहे. भारतात सध्या कोविडची दुसरी लाट आहे. लाखो लोक प्रतिदिन बाधित होत आहेत, तर सहस्रो लोकांचा मृत्यू होत आहे. सिरम आणि भारत बायोटेक यांनी विकसित केलेल्या लसींचे उत्पादन होऊन लसीकरण चालू आहे, तरी भारताच्या अवाढव्य लोकसंख्येपर्यंत लस पोचण्यास विलंब होणार आहे. रशियानिर्मित ‘स्पुटनिक व्ही’ या लसीचे काही कोटी डोस भारतात येणार आहेत, असे समजते आहे. तरीही ते अल्प पडू शकतील अशी स्थिती आहे. अशा स्थितीत संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका संस्थेने अशा प्रकारे औषधाच्या निर्मितीस प्राधान्य देणे, हे कौतुकास्पद आहे.

चांगली कामगिरी !

लसीकरणाच्या व्यवस्थापनामध्ये होणारा गोंधळ, लसींचा अपुरा पुरवठा यांमुळे लसीकरणात अडथळे येत आहेत. डी.आर्.डी.ओ. चे औषध पावडर स्वरूपात उपलब्ध करण्यात येत आहे. या औषधाला प्रायोगिक स्वरूपात मान्यता मिळाली आहे. डी.आर्.डी.ओ. ने या व्यतिरिक्त ३०० खाटांची २ कोविड रुग्णालये उभारण्याच्या कामाला गती दिली आहे. त्याचे बांधकाम चालू झाले आहे.

काही मासांपूर्वी आंतरखंडीय म्हणजे ५ सहस्र किलोमीटरवरील लक्ष्याचा भेद करू शकणार्‍या क्षेपणास्त्र प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी घेऊन डी.आर्.डी.ओ. ने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आणि आता असे संशोधन करून ‘आम्ही सामाजिक भानही राखतो’, असा संदेश दिला आहे. या औषधाचे स्वरूप अगदी साधे असल्याने त्याचे उत्पादन सहज करता येईल. त्यामुळे देशभरात मुबलक प्रमाणात औषध उपलब्ध करता येईल. हे औषध केवळ संक्रमित पेशींनाच लक्ष्य करत असल्याने रुग्णाची ऑक्सिजनची आवश्यकता तात्काळ घटते, तसेच कोविड ‘पॉझिटिव्ह’ असलेला रुग्ण अल्प दिवसांत ‘निगेटिव्ह’ होतो, असाही दावा केला आहे.

भारतात बुद्धीमत्तेची कमतरता नाही. भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे अभियंते आज जगात विविध प्रसिद्ध बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. जणू आस्थापनांच्या मालकांनी त्यांच्याकडे आस्थापन सुपुर्द केले आहे. भारताला अवकाश संशोधनासाठी रॉकेट उडवण्यास क्रायोजेनिक इंजिन जगातील तंत्रज्ञान असणार्‍या देशांनी देण्यास नकार दिला, तेव्हा ‘इस्रो’ने हे आव्हान स्वीकारून ते पूर्णत्वास नेले.

चीनच्या उचापती !

चीनचे सैन्य चीनची ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’शी संगनमत करून धोकादायक जैविक अस्त्रे सिद्ध करत आहे, अशी माहिती सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. कोविडचा पहिला व्हेरिएंट (विषाणूचा प्रकार) आणि दुसरा व्हेरिएंट असे दोघांचे गुणधर्म असलेला तिसरा व्हेरिएंट बनवून तो कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरवत आहे. ‘दोन व्हेरिएंटचे गुणधर्म असलेला तिसरा व्हेरिएंट लगेच कसा सिद्ध झाला ?’ यावर जग विचार करत आहे. याहीपेक्षा घातक व्हेरिएंट चीनकडे असून तो टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रसार करणार आहे. एक प्रकारे चीनने कपटाने हे युद्धच चालू करून दिले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

प्रतीकात्मक छायाचित्र

भारतात बंगाल आणि अन्य राज्ये येथील निवडणुकांपासून दुसर्‍या लाटेला प्रारंभ झाला. हा प्रभाव वाढता राहिला आहे. त्याच वेळी भारताच्या शेजारील देश पाकिस्तान, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान येथे भारताच्या तुलनेत वैद्यकीय सेवांची स्थिती एवढी चांगली नसतांनाही तेथे संसर्ग वाढलेला नाही. काही दिवसांपूर्वी भारतात जळणार्‍या चिता पाहून चीनच्या एका सरकारी विभागातील व्यक्तीने सामाजिक माध्यमांवर त्याचे छायाचित्र प्रसारित करून त्याची टर उडवत ‘चीन ज्या वेळी त्याचा नियोजित अंतराळ केंद्र सिद्ध करण्यासाठी अग्नीने रॉकेट उडवत आहे, त्याच वेळी भारतात अग्नीने चिता जळत आहेत’, असा संदेश प्रसारित केला होता. चीनच्या या संदेशावर जगातून टीका झाल्यावर हा संदेश पुसला. चीनच्या या कृतीतूनच तो भारताविरुद्ध सैन्य आणि संशोधन संस्था यांच्या माध्यमातून युद्ध छेडत आहे, हे लक्षात येते. चीनचे सैन्य हेच तेथे सार्वभौम असल्यामुळे सैन्यच भारताविरुद्ध भूमिका ठरवत आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. आता २ दिवसांपूर्वी हाती आलेल्या वृत्तानुसार चीनने सीमेवरील सैन्य माघारी बोलावल्यानंतर पुन्हा तेथे मोर्चेबांधणी चालू केली आहे. भारताला कोरोनाच्या महामारीत आणि त्यासंबंधी समस्यांमध्ये गुंतवून ठेवून पुन्हा सैन्य कारवाई करण्याच्या सिद्धतेत चीन दिसत आहे. अशा वेळी भारताने कोविड पाठोपाठ येणार्‍या चीनच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्जता करणे आवश्यक आहे.

अमेरिकेत कोरोनाचा कहर झाल्यावर तेथील नासा या अवकाश संशोधन संस्थेने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सहज वाहून नेऊ शकू, अशा व्हेंटिलेटर्सची निर्मिती केली होती. यातून अमेरिकेतही अंतराळ संस्था देशाला जी समस्या प्रकर्षाने भेडसावत आहे, ती सोडवण्याच्या संशोधनात उतरली, हे दिसून येते. मागील वर्षी इस्रायलमध्ये कोरोनाचा कहर वाढत असतांना ‘मोसाद’ या गुप्तचर संस्थेने त्याच्या मुख्य कार्यालयात ‘वॉर रूम’ स्थापन करून देशाला कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लागणारे साहित्य जगभरातून कसे मिळवता येईल ? यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्याच प्रकारे आता भारतातही संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था महामारी रोखण्यासाठी औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन करते, हे अभिनव आहे. ‘आमचे क्षेत्र केवळ संरक्षणापुरते मर्यादित आहे’, अशी संकुचित वृत्ती या संस्थेने न दाखवता व्यापक वृत्तीचे प्रदर्शन केले, हे सुखावणारे आहे. देशात आपत्काळ आल्यावर केवळ स्वतःचे क्षेत्र किंवा काम यांपुरता मर्यादित विचार न करता व्यापक विचार करून कृती कशी करायची ? याचा पायंडा ‘डी.आर्.डी.ओ.’ने घालून दिला आहे. सरकारी यंत्रणेतील सर्वच विभागांनी राष्ट्रहितार्थ अशी व्यापक मनोवृत्ती दाखवल्यास भारताचा उत्कर्ष होण्यास वेळ लागणार नाही !