श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग ६)

१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.

प्रकरण ३ : चरित्रकालातील विविध राजसत्ता – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470452.html

प्रकरण ४ : भौगौलिक रचना आणि दळणवळणांची साधने

भौगोलिक रचना –

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पोथीत हिमालयातील १५ हजार फुटांच्यावरची उंच पर्वत शिखरे, श्रीशैल्य, अन्य सह्याद्री पर्वताच्या विविध भागातील ३ ते ५ हजार उंचीची शिखरे.., गंगा, गोदावरी, तुंगभद्रा, कावेरी, भीमा, कृष्णा नद्यांचा प्रदेश जे ५ शे ते १५ हजार  फूट पर्यंत उंचीचे, अरबी समुद्र तट, पुर्व किनारपट्टी, कन्याकुमारी, गोकर्ण, काकिनाडा वगैरे समुद्रावरील बंदरे, नदीच्या किनारी बांधली गेलेली भव्य मंदिरे, प्रासाद, डोंगरखोऱ्यातील गूहा, कपारी, यांचे उल्लेख प्रामुख्याने त्यात वर्णन केलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आले आहेत. आजकाल आपल्याला प्रवासात मोठे पुल, बोगदे, घनदाट जंगले, वळणदार घाट लागतात. मौज म्हणून आपण थांबतो. पावसात, वाहत्या धबधब्यात, समुद्राच्या लाटांत सहलीचा आनंद घेतो. रस्तोरस्ती खानपान व्यवस्थेमुळे टपरी पासून ते सुसज्ज स्टार ह़ॉटेलमधून आधीच बुकिंग करून प्रवासाचा आनंद घेत असतो.

संपूर्ण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात विविध व्यक्तींच्या समावेत कथाभाग पुढे सरकत असताना त्यांच्या संदर्भात अनेक सपाट प्रदेश, नद्या, सागर किनारे, डोंगराळ, पर्वतीय विभाग, वनवासी लोकांच्या जंगलाचे उल्लेख येतात. याची सविस्तर महिती अध्यायनिहाय सादर केलेल्या तक्त्यातून कळून येते. म्हणून त्याची चर्चा इथे सादर केलेली नाही.

प्रवासाची साधने –

सन १३०० च्या सुमारास सध्या सारख्या सुविधा नसताना प्रवास साधारणपणे अगदी गरज असेल तरच केला जात असेल. बरोबर काही लोक असणे महत्वाचे असेल. ठराविक वाटा, त्यावरून जाताना बोलीभाषा जाणकार, वाटाडे यांच्या मदतीशिवाय प्रवास करणे फारच जिकिरीचे असेल. म्हणून लोकांच्या प्रवासाच्या प्रथा मंदिर, गाव यात्रा, लग्नाचे जत्थे, आणि बरेच वेळा नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडायला म्हणून करावी लागणारी वणवण यामुळे प्रवास ही मजा करायला जाण्यापेक्षा संकटात जीव घालायचे एक निमंत्रण असेच मानावे लागत असेल. मोठमोठी सैन्ये, त्यांच्या संचलनामुळे ठिकठिकाणी चौक्या, विहिरी, जनावरे त्यांच्या दाणापाणी, वैरण याची सोय करायला सराया, बाजार आणि रस्त्यावर सुरक्षा व्यवस्था करावी लागत असेल. त्याकाळात पायी, डोली, पालखी, घोडा, उंट, हत्ती, बैलगाडी, घोडागाडी, रथ, पाण्यातून जायला बुट्टी, नावा, होड्या, यांचा समावेश असावा. बरोबरचे परिवारजन, अनोळखी सहप्रवासी, त्यांच्या बरोबर जायची जोखीम, रक्षणाची सोय, वाटाडे, भाषेचा दुरावा कमी करायच्या पद्धती, वाटेत राहायची, जेवण बनवायची सोय, यावर विचार व्हायला हवा. त्यापैकी पोथीतून ज्या साधनांचा उपयोग केला गेला त्यांचा पुर्ण संदर्भ नकाशातून, स्थळांच्या सध्या उपलब्ध फोटोतून केला गेला आहे. साधारण याच काळात जगातील विविध प्रदेशातील असे कोणी लोक सुदूर प्रवासाला गेले होते का? यावर नजर टाकता काहींची नावे समोर येतात. त्यांच्या प्रवासाची वैशिष्ठ्ये, उद्देश आणि वर्णनातून भारताच्या त्या काळातील समाजाची माहिती व्हायला मदत होईल.

मार्कोपोलो

१. मार्कोपोलो –  इटली प्रजासत्ताकमधील एक हौशी साहसी भ्रमंती करणारा होता. ( व्हेनिस, १२५४ – मृत्यू १३२५). मार्कोने वयाच्या सोळाव्या वर्षी, १२७० मध्ये प्रवासास सुरुवात केली. त्याने आशिया खंडात चीनपर्यंत प्रवास करून पूर्वेकडील देशांमधील निसर्ग, सांस्कृतिक जीवन, व्यापार इत्यादीविषयी बारीक माहिती मिळवली. १२९५ च्या सुमारास परतीच्या प्रवासात मार्कोने भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तिथली गूढविद्या याचेही मार्कोच्या पुस्तकात वर्णन आहे. पुढे दोन शतकांनी मार्को पोलोचे पुस्तक ख्रिस्तोफर कोलंबस याच्या वाचनात आले आणि भारतासाठी जलमार्गाचा शोध घेण्याचा ध्यास त्याने घेतला! आशियाई देशांची मूलभूत माहिती युरोपियन लोकांना प्रथम मार्को पोलोच्या नोंदीमुळेच झाली. मार्को पोलोच्या भारत व चीनच्या वर्णनांमुळे युरोपभर भारतभेटीचे वेध लागले व त्याचे पर्यवसान पुढे कोलंबस व वास्को द गामाच्या साहसी शोधांमध्ये झाले. साहस आणि नवनव्या भागातून जाताना जलमार्गांचा ध्यास हे त्याच्या भ्रमंतीचे सूत्र होते. ना त्याला कोणी बोलावले होते ना कोणा एकाच्या भेटीचा ध्यास त्याला होता.

२. इब्न (इब्न किंवा बिन Ibn or Bin याचा अर्थ ‘चा मुलगा’ उदा. लादेन -चा मुलगा- ओसामा ) बतूत (ता)-
…(१३०४ ते १३७८) ह्याचें नांव अबुअबदुल्ला महंमद असे असून बापाचे आडनांव बतूत हे होते. हा टांजियर आजकालच्या मोरोक्कोत, येथे जन्मला. १३२५ त याने आपल्या प्रवासाला आरंभ करून १३५५ मध्ये तो पुरा केला. सरळ रस्ता धरून मोजल्यास ७५००० मैलांच्यावर होणारा प्रवास त्यानें २८ ते ३० वर्षाच्या काळात पुरा केला. राजाज्ञेने त्याने आपल्या प्रवासाचा इतिहास महंमद इब्नजुझाई यांस सांगितला. व त्याने तो १३ डिसेंबर १३५५ त लिहून पुरा केला. १३७८ मध्यें ७३ वर्षांचा इब्नबतूता होऊन वारला ….

श्री डग्लस बुलीस यांच्या लेखावर आधारित माहिती मराठीत मिसळपाव या संस्थळावर सन २०१० मधे जयंत कुलकर्णींनी १२ भागात सादर केली होती. त्यात ते म्हणतात, ‘मार्कोपोलो मेल्यानंतर एकाच वर्षाने त्याने आपल्या पूर्वेच्या प्रवासास सुरुवात केली. फेज ते चीनमधील बिजिंग असा प्रवास त्याने केला. तो कसा केला आणि त्याचा मार्ग काय होता हे फारच मनोरंजक आहे. निघताना त्याने असे ठरवले होते की त्याच मार्गावरुन परत प्रवास करायचा नाही, तरीसुध्दा त्याने चारवेळा हजची यात्रा केली. आजच्या नकाशात बघितले तर त्याने आजच्या हिशेबाने चाळीस देश ओलांडले, जवळजवळ निम्म्या लोकांचा सल्लागार म्हणून त्याने कुठल्या ना कुठल्यातरी स्वरुपात काम केले. ह्या प्रवासाच्या आठवणी त्याने ज्या पुस्तक स्वरुपात लिहून ठेवल्या त्याचे नाव आहे “रिहला” ह्यात तो भेटलेल्या तब्बल २००० माणसांची नावे नोंदवली आहेत. तुर्कस्तान, मध्य एशिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका, मालदीव, भारतातला काही भाग, ह्या भागातील त्यावेळचे लोकजीवन, कसे होते हे समजण्याचा हे पुस्तक एक विश्वासपूर्ण स्त्रोत आहे. …

१४व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा युरोपातील रक्तपात आणि उपासमारीने थैमान घातले होते त्या काळात दारेसलाममधे म्हणजेच इस्लामी जगतामधे सोन्याचा धूर निघत होता. बारा एक मुसलमान पंथ गुण्यागोविंदाने नांदत होते. कुराणातील तत्वांवर आधारित हे पंथ ही तत्वं मोकळ्या मनाने त्यांची देवाणघेवाण करत पुढे जात होते. ह्या सर्व पंथांमधल्या अनेक वैद्य, कलाकार, वास्तुविशारद, कारागीर, तत्वज्ञानी ह्यांचा एकामेकांशी संबंध येऊन त्याचा ह्या शास्त्रांना फायदाच होत होता. तो काळ सुंदर आणि भव्य इमारतींचा होता. ह्या इमारतीत मशिदी होत्या तशीच वाचनालयं पण होती. असा काळ, की ज्यात विद्वत्तेला मान होता आणि मुसलमानांच्या एक छत्री अंमलाखाली स्थैर्य होते.
एका औलिया शेखसाहेबांनी (बतूतला पडलेल्या स्वप्नाचा) अर्थ असा लावला “तू हजला जाशील. प्रेशिताच्या कबरीचे दर्शन घेऊन तू येमेन, इराक, तुर्कस्तान वगैरे देशातून शेवटी हिंदुस्थानात पोहोचशील. हिंदुस्थानात तुझा मुक्कम बराच काळ होईल आणि तेथे तुला माझा भाऊ ‘हिंदुस्थानी दिलशाद’– आम्ही त्याला त्याच नावाने संबोधतो, भेटेल. हा तुला एका मोठ्या संकटातून वाचवेल.” इब्न बतूतचा प्रवासाचा वेग हा धिमा पण एकसारखा होता. गलबतं साधारणत: सरासरी १५० कि.मी. एका दिवसात प्रवास करायची. कधी कधी जास्तपण करायची पण वाऱ्याच्या दिशांवर बरेच काही अवलंबून असायचे. लुटमारीच्या भीतीमुळे जमिनीवरचा प्रवास हा एकत्र म्हणजे काफिल्यातून व्हायचा. सपाट प्रदेशात हा काफिला ६५ कि.मी. चे अंतर सहज तोडायचा. पण डोंगराळ प्रदेशात त्याचा वेग फारच कमी असायचा. तेव्हा एका दिवसाचा प्रवास हे अंतर सापेक्ष असायचे. पण त्या काळात अंतर हे दिवसाच्या प्रवासात सांगण्याची सर्रास पध्दत होती. इब्न बतूत शक्यतो अंतर मैलात सांगतो. हा मैल बहुधा अरबी मैल असावा. म्हणजे आजचे १.९ कि.मी. त्याच्या पुस्तकात अर्थात इतर मोजमापांचा पण उल्लेख आहे. उदा. इजिप्तचे फारसाख (५७६३ मी.) आणि एक फरसाख म्हणजे १२००० इल्स.

इब्न बतूतने एका व्यापाऱ्यांबरोबर भागीदारी केली. त्या व्यापाऱ्याकडून बरेचसे दीनार, उंट, घोडे त्याने कर्जाऊ घेतले आणि सुलतानाकडून परत मिळणाऱ्या भेटीमधे त्याला भागीदारी दिली…. इब्न बतूतने बगदाद आणि दमास्कसमधे जो वेळ कायद्याचा अभ्यास आणि तेथील विचारवंतांबरोबर त्याचा अर्थ शोधण्यात घालवला, त्याचा भरपूर उपयोग त्याला दिल्लीमधे झाला. त्याने त्याचा उपयोग करुन सुलतान मुहम्मद इब्न तुघलकवर छाप पाडली. सुलतानाने लगेच त्याला क्वादीची नोकरी देऊ केली. वार्षिक पगार – १२००० चांदीचे दीनार अधिक १२००० दीनार नोकरी पत्करून तेथे कायमचे राहण्याचे कबूल केले… तो ८ वर्षे तिथे राहिला. पण नंतर सुलतानाची लहरी बदल्यावर त्याला चीनला राजदूत म्हणून जावे लागले’… वरील संकलित माहितीवरून बतूताला अध्यात्मिक आनंदाची वगैरे काही गरज नव्हती. प्रवासातील थरार आणि जीवघेण्या प्रसंगातून विविधयुक्त्या करायची हिकमत हे त्याचे वैशिठ्य होते.

हुएनत्संग

३. हुएनत्संग –  एक प्रसिद्ध चिनी प्रवासी. हा चीन मध्यें क्यूशी जिल्ह्यांत होनन फू गांवांजवळ ६०६ सालीं जन्मला. बौद्ध धर्माचें मूलस्थान जो हिंदूस्थान तो पाहण्याची त्याची फार इच्छा होती. म्हणून तो ६२९ सालीं हिंदूस्थानाकडे यावयास निघाला. चीनची सरहद्द कोणाहि माणसाला न ओलांडूं देण्याविषयी चीन सरकारची आज्ञा होती. तथापि युक्तिप्रयुक्ती करून त्यानें चीनची सरहद्द ओलांडली व अनेक संकटें सहन करून शेवटीं तो  हिंदुस्थानांत आला. काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांतील मठांत दोन वर्षे अध्यायनांत घालविल्यानंतर तो मथुरेस गेला… नंतर बौद्ध व हिंदु धर्म क्षेत्रें व प्रसिद्ध शहरें पाहिली. नालंद येथें त्यानें दोन वर्षे संस्कृतच्या अध्ययनांत घालविलीं. या ठिकाणीं त्यानें बौद्धतत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. पुढें तो आसाम, ओरिसा इत्यादि ठिकाणीं जाऊन व जवळ जवळ सर्व हिंदुस्थानभर प्रवास करून काबूल मार्गानें १५ वर्षांनीं परत चीनला गेला. त्यानें बरोबर, हिंदुस्थानांतून मोठा ग्रंथसंग्रह. मूर्ती व इतर अवशेष चीनला नेले. चीनचा बादशहा ताईसुंग यानें त्याचा मोठा सन्मान करून त्याला आपलें प्रवासवृत्त लिहिण्यास सांगितलें. तो ६६४ सालीं वारला. त्यानें जें प्रवासवृत्त लिहून ठेविलें तें हिंदूस्थानचा प्राचीन इतिहास लिहिण्याच्या कामीं फार उपयुक्त आहे. यांचा प्रवास धार्मिक स्थाने पाहून, धर्मग्रंथ अभ्यासून परतायचा होता.

या पार्श्वभूमीवर शंकर भट्ट यांचे घरातून बाहेर पडून अशा एका अज्ञात व्यक्तीच्या, गावाच्या शोधात निघणे, एकामागून एक कलाटणी देणाऱ्या घटनांतून पुढचा प्रवास चालू ठेवायला दैवी आनंदाशिवाय काहीही प्रलोभने नसताना जितके आजच्या काळात ते अशक्यप्राय असे कृत्य मानले जाईल तसेच ते त्याकाळातही मानले गेल्याचे संदर्भ पोथीतील वर्णित व्यक्ती करतात असे प्रत्ययास येते.

४. जॉन – जर्मनी (हे नाव अलिकडे प्रचारात आले असे मानले जाते. त्या आधी प्राशिया असे संबोधले जात असे) मधील या व्यक्तीची माहिती पोथीतूनच  मिळते. अन्यत्र नेटवर वगैरे सध्यातरी पोथीतील माहितीची सत्यता पडताळून पाहता ती उपलब्ध नाही. हे महाशय, श्रींना भेटायला सन १३४० च्या सुमारास दूरवर आले होते. इतक्या जवळ आल्यावर नदीतील बेट शोधायला वेळ लागू नये या विचाराने श्रींनी विरुपाक्षाना (श्रींचे एक रूप) पाठवून बेटापाशी आणले. भ्रूमध्यावर स्पर्शाने त्यांना दीक्षा मिळाली मग दिव्यानंदाने ते तल्लीन झाले. ते जर्मन भाषेमधे तर श्री तेलुगूतून बोलत होते. तरीही दोघांचे बोलणे एकमेकांना समजत होते. याच वेळी उपस्थितांना आकाशात देवनागरीत एक (चाळीस आकडी) संख्या पहायला मिळाली. ती विश्वसंख्या असून पुढे पदार्थ तत्वाला शोधणाऱ्यास (फिजिक्समधील सत्य शोधकांना?) त्यांच्या स्थायी (गरजे?)नुसार अवगत होणार असे श्रींनी सांगितले.

वरील कथनाचे वैशिष्ठ्य असे की शंकरभट्ट पायी चालत (कदाचित चिदंबरम गावातील प्रख्यात नटराजाचे दर्शन) घेऊन जाताना जवळच्या एका डोंगरांच्या कुशीत पलनीस्वामी या वृद्ध योगीमहात्म्याने  गूहेत बोलावून शंकर आणि माधव यांना समोर बसवून त्यांना स्वतःला ध्यानात काय दिसले ते सांगताना वरील घटना सांगितली. म्हणजे पलनी स्वामींनी ती सूक्ष्मरुपाने उपस्थित राहून जे घडले ते या दोघांना ध्यानातून बाहेर पडल्यावर सांगितले. म्हणजे हे कथन जेंव्हा शंकर भट्टांनी गूहेत ऐकले (दिनांक २७ मे १३४० च्या नंतर) तेंव्हा श्री अजून कुरवपुरात आलेले नव्हते! श्रींच्या जीवनचरित्रातील महत्त्वाच्या घटनांचा तारीख नुसार अभ्यास पुढील प्रकरणात सादर केला आहे.

श्रीपाद वल्लभ- पीठापुरम सोडल्यावर हिमालयात काही काळ फिरून अनेक साधकांना दर्शन देतात. तेथून गोकर्ण महाबळेश्वरला साधारण ३ वर्षे राहून पुढे श्री शैल्यला चातुर्मास करून भीमा-कृष्णासंगमावर एक रात्र थांबून मग कुरवपुरला येतात. त्यांच्या पर्यटनाचे अंतर साधारण ८ हजार किमी होते. परंतु हे अंतर ते पायी न चालत जाता दैवी साधनांचा जोरावर अवकाशमार्गांनी करत असत. या शिवाय लीला चरित्र पोथीत विविध अध्यायात व्यक्तींच्या कथनातून ते पीठापूरला किंवा कुरवपुरला येण्याआधी कुठे कुठे प्रवास करत आहे होते यांचा उल्लेख येतो त्यानुसार लेख सादर केला आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी

या संदर्भात शंकर भट्टांच्या बरोबर सहप्रवासी म्हणून ज्यांचा उल्लेख येतो त्यांचे कथन पाहणे रंजक ठरेल. शंकरभट्टांसमावेत चालत असलेल्यांचा संदर्भ –

१. व्याघ्रेश्रर – अत्रेयपुरम या आंध्र प्रदेशातून निघून ते बद्रिनाथ , केदारनाथ करून मरुत्वमलाईच्या गूहेत भेटले. त्याआधी ते कुरवपुरला श्रींच्या दर्शनानंतर त्यांना व्याघ्ररूपात पाठीवरून कृष्णा नदी पार करून भेट घडली. मग त्यांच्या आज्ञेने ते कन्याकुमारीच्या अलिकडे १० किमीच्या डोंगराळ भागातील मरुत्वमलाईला साधक ‘योगवरेंण्य’ यांच्या सानिध्यात राहत असत. वरील यात्रा प्रवास ५२५० किमी होतो. किती वेळात तो पूर्ण केला गेला त्याचा तपशील मात्र पोथीत मिळत नाही.

२.  विचित्रपुरला परत जाताना बरोबर आलेला ब्राह्मण – एके ठिकाणी भिक्षा मागायला गेला असताना एका ब्राह्णणाला त्याची बायको अपशब्दाने भांडताना दिसली. भोजन मिळायचे दूर त्यांच्या कचाट्यातून कसे सुटावे असे विचार करत असताना आधी भेटलेल्या लहरी राजाच्या दरबारात त्यांना न्यायला काही सैनिक शोधत तिथे येतात. रागावलेल्या पत्नीपासून दूर राहायला मिळेल तर बरे असे वाटून तो ब्राह्मण  शंकरभट्टांसमावेत येतो. राजा त्याच्या मुक्या मुलाला बोलायला यायला लागल्याने खुष होऊन सत्कार करतो. त्यातील सर्व सुवर्ण दानमुद्रा त्या ब्राह्मणला देऊन टाकतो. त्यामुळे पतिपत्नीत सलोखा होऊन बायकोचे वागणे सुधारते… वगैरे वगैरे

३ .माधव नंबूद्री – विचित्रपुरच्या लहरी राजाच्या कथानकात माधव नामक एक नंबूद्री मी तुमच्या बरोबर येतो म्हणून आपणहून शंकर भट्टांसोबत येतो. तो असतो व्यवसायाने आचारी. पलनी स्वामींच्या शरीराच्या अदलाबदलीच्या जोखमीच्या दिवसात खूप निष्ठेने कामाला येतो. मात्र पलनीस्वामींच्या आदेशानुसार कुरवपूरला न जाता विचित्रपुरला परततो. सध्या केरळी मानले जाणारे नंबुद्री हे लोक आले कुठून?  याचे उत्तर या पोथीमधे असे मिळते – नुंबरु या सध्याच्या आंध्र प्रदेश राज्यातील गावातून काही ब्राह्मण कुटुंबे – कालडीच्या आसपास केरळात स्थलांतरित झाली कालांतराने त्यांना नुंबरुचे म्हणून ‘नंबुद्री’ ब्राह्मण असे अपभ्रंश नाव पडले. त्यांचे स्थलांतर साधारण ९६४ किमी दूर होते. नकाशा तक्त्यात पहा.

४. पीडित स्त्री आणि दोन तोतया ब्राह्मण – अ १७, १८ कुरवपुर आताजवळ आले आहे अशा अंतरावर या रंगतदार कथानकात एकामागून एक धक्कादायक घटनांतून श्रीपादांच्या आणखी काही पैलूंवर प्रकाश पडतो. एक अबला स्त्री अचानक थरथरत्या अवस्थेत धावत शंकर भट्टांच्या सहाय्याची काकुळतीने याचना करते. तिच्या मागे दोन आडदांड हातात सोटे घेऊन तिला पळवून न्यायच्या इराद्याने शंकरभट्टांसमोर ठाकतात. स्वतःचे संरक्षण करायची धडगत नसलेल्या शंकर भट्टांना अचानक स्फुरण येते आणि तिला ते अभय देऊन त्या टारगट इसमांना उद्देशून जे म्हणतात त्यामुळे ते दोघे एकदम खचून जातात. तुम्ही मोठे ज्योतिषी दिसता वगैरे म्हणून आपल्या कृत्याची माफी मागतात. ती स्त्री आपले पुर्वकर्म सांगते. सुशिला नामक ती विवाहिता असून पती, सासू-सासरे यांच्या छळापासून सुटका करून घ्यायला, आई-वडील, भाऊ वगैरेंच्याकडे जाऊनही काही उपयोग झाला नाही. (त्या काळातील समाजरचनेप्रमाणे आईवडिलांना तिला पुनर्विवाह करायची परवानगी देणे शक्य नसावे. घरात तरुण परित्यक्ता ही गावातील पापीवासनेच्या लोकांचे सावज होऊन बदनामी व वाळीत टाकले जायच्या भितीने व आधीच गरिबी त्यात आणखी एकाची भर म्हणून भावांना नकोशी वाटली असावी. – कंस प्रस्तूत लेखकाचा) त्यांनी तिला हाकलून दिल्यावर त्या दरम्यान त्या कष्टी प्रवासात तिने एका दुष्टाला दगड डोक्यात हाणून मारले. आणखी एक माणूस जवळ आला, त्याला तिने मारीन म्हणून धमकावले. पण त्याने तिला सौम्य शब्दात समजावले की मी रविदास म्हणून धोबी आहे. जवळच असलेल्या कुरवपुरला असतो. तू श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घे. ते तुझी या सांसारिक संकटातून सुटका करतील असा उपदेश करून निघून गेला. त्यानंतर सोटा घेतलेले  दोघे आडदांड मागे लागले.  तोवर शंकर भट्ट तिला दिसले. सभ्य वेषातील वाटल्याने ती त्यांच्या आश्रयाला गेली. वगैरे कथन पोथीत आले आहे… यानंतर ती स्त्री – सुशिला-, दोन आडदांड रुपी ब्राह्णण शंकर भट्टांसह चौघे कुरवपुरला जाताना वाटेत नामानंदांच्या आश्रमात पोहोचतात. पण तिथे त्या स्त्रिचा नवरा तिला परत न्यायला येतो. ती त्याच्याबरोबर परत जाते. मग तिघे कुरवपुरला जात राहतात. जे दोन ब्राह्मण शंकरभट्टांना वाटले तेच नंतर आम्ही मुसलमान असल्याचे श्रींच्या कानउघाडणी नंतर म्हणू लागतात. त्यांना हाकलून देताना श्रींच्या मुखातून त्यांच्या पुढील जन्माचे रहस्य उघडते. पैकी एक अब्दुल बाबा बनून साईबाबांच्या शरीराला सांभाळताना सत्शिष्य होतो दुसरा बाबा बनून साईंचा शिष्य बनतो.

६. गुरूचरण अ २० २१. मांचाल मंत्रालय यात्रा

७. कृष्णदास परतीच्या वाटेवर बरोबर.

८. धर्मगुप्त अ २३ ते ४६ पर्यंत.

९. भास्कर पंडित घर ते त्रिपुरांतकेश्रर मंदिर परिसर. अ ४४ ( या क्र. ६ ते ९ सर्वांची माहिती अध्याय निहाय नकाशा तक्त्यात सविस्तर येते म्हणून इथे दिलेली नाही)

१०. अ ४६ एक वृद्ध संन्यासी विजयवाडा कनकदुर्गा मंदिर ते राजमहेंद्रम ते पीठीकापूर तिथे आल्यावर घरचे लोक १८ घोडा गाड्यातून श्रींच्या दर्शनाला कुरवपुरास निघाले आणि पंचदेवपहाड भागात वायुमार्गाने काही तासात पोहोचले.  अ. ४७ नंतर भेटीचा सोहळा झाल्यावर अचानक गायब झाले आणि फक्त श्री तो सन्यासी आणि शंकर भट्ट उरले!

या पार्श्वभूमीवर शंकर भट्टांचे  पायी व अन्य वाहनाने एकूण ३ हजारापेक्षा किमी प्रवास घडल्याचे असे होतात. त्यांना नवनवीन देश पहायचा शौक, पैसे कमावणे, श्रीमंती थाटात राहायला, किंवा वाटेतील प्रदेशात राजकारणात सहभागी होणे, लढायात साहसी कृत्ये करणे यात मुळीच रस वाटत नाही. ते फक्त निश्चष्यात्मक बुद्धीने श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी आपले जीवन समर्पित करतात. हा इतर जगप्रवासाला निघालेल्या इतर विदेशी विख्यात प्रवाशांमधील फरक आहे. –

१.उडिपि ते गुरुवायूर, कन्याकुमारी किमी.७००

२. कन्याकुमारी ते मदुरै,चिदंबरम,तिरुपती,चित्तूर, ताडीपत्री कुरवपुर किमी. १०००.

३. कुरवपुर ते मांचाल (मंत्रालयम) किमी. २५०

४. कुरवपुर ते त्रिपुरांतक  ते  राजमहेंद्री ते पीठापुरम किमी. ६००

५. पीठीकापुरम ते कुरवपुर (वायुमार्गे).

प्रकरण ५ : सामाजिक व्यवस्थेची घडी – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470769.html