१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.
प्रकरण ४ : भौगौलिक रचना आणि दळणवळणांची साधने – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470463.html |
प्रकरण ५ : सामाजिक व्यवस्थेची घडी
गेल्या हजारो वर्षात ‘गरीब असणे’ हे नैसर्गिक असल्याने त्याला दुखाःचा दंश नसावा. कपडेलत्ते, दाग-दागिने, पायांना चपला, बूट यांचे दर्शन सामान्य जनतेला नसल्याने राजेराजवाडे, पैसेवाले सावकार, काही प्रमाणात वतनदार लोकांच्यापाशी ते सीमित असावेत. बाकीच्यांना ‘एक अंगावर अन एक धुवून वाळत’ अशा वर्णनाप्रमाणे कमीतकमी खर्चाचे जीवनयापन करताना घरच्यांच्या, वरिष्ठांच्या दांडगाईच्या वर्तनामुळे दबून राहणे, मार खाणे, उलटून न बोलणे आदि गोष्टीना सामोरे जाताना काही विशेष आहे असे वाटत नसावे. जातीपातींचा उल्लेख न करायची सध्याची दक्षता घेण्याची प्रथा, तेंव्हा पाळली जात नसावी. उलट जात कितीही कामाच्या दर्जाच्या दृष्टीने खालची किंवा किळसवाणी असली तरी त्याचा उल्लेख वारंवार करणे हे त्या समाजरचनेचे वैशिष्ठ्य असावे. शेतीची जमीन, गाय आणि अन्य पशुधन, सोनेनाणे यांच्या संख्येवर समाजातील आर्थिक पत, मान निगडीत असल्याने शेतसारा भरायचा आणि उरलेल्या अन्नधान्यातून पुढील वर्षाच्या उत्पादनापर्यंत गुजराण करायची, या कालचक्रातून जीवनयापन करायची त्याकाळात पद्धत असावी. शेतीला लागणारी, घरकामाला वापरात येणारी अवजारे बनवणे, युद्धात, वन्यजनावरांच्या शिकारीत कामाला येणारी धारदार शस्त्रे बनवणे, घर बांधणी, लाकूडकाम, भांडीकुंडी, गाडगी-मडकी, कापड वस्त्रे, उबदार कांबळी असे लोकांच्या सामान्य गरजा पुरवणाऱ्या कसबी लोकांच्या एकत्रित सहजीवनातून खेडी, गावे यातील सामान्य लोकांचे जीवन व्यतीत होत असावे. गावाचे संरक्षण करायला, वेळप्रसंगी त्या भागातील शेतसारा वसूल करणाऱ्या शासनातर्फे जे तरुण शेतकरी शस्त्र चालवायचे धाडस आणि कसब प्राप्त करत त्यांची सैन्यात भरती होत असावी. वयात यायच्या आत मुलींना घरातील वरिष्ठ स्त्रियांच्या हाताखाली घरकामे करणे, पाण्याची साठवण करायला नदी, ओढे, विहिरी वगैरे मधून डोक्यावरून कळशीतून अन्य बायकांच्या सोबतीने खेपा मारून आणणे, गोठे साफ सफाई, जनावरांची देखभाल ह्यात रमावे लागत असावे. उघड्यावर प्रातर्विधीस संकोच वाटून पहाटे उजाडायच्या आत तो उरकणे, घरकामातून उसंत मिळाली तर सागरगोटे, चिंचोके, गुंजा, यांच्या बैठ्या खेळात भावंडांत रांगोळी, शिवण काम, भरतकामातून संसाराला हातभार लावायचे प्रशिक्षण मिळत असावे. १३-१४ व्या वयात लग्नविधीनंतर नवऱ्याबरोबर त्याच्या घरी जाऊन वंशवृद्धी करायचे नियतकार्य करावे लागत असावे. शारीरिक आजार, रोगराई यांवर घरगुती उपाय, ऐपतीप्रमाणे वैद्याकरवी औषधपाणी करणे, यावर भिस्त असावी, या शिवाय मुलांना शाळा नामक सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था नसल्याने, बालपणापासून मुलांनी टंगळमंगळ करण्यात वेळ घालवणे, मोठेपणी कामे करून परतल्यावर घरच्यांकडून त्यांचे पाय चेपणे, अंग रगडणे, घरगुती समस्यांवर, गावाकुसातील वादविवादांवर पारापाशी बसून सांजवातीचा कंटाळवाणा वेळ घालवायची सवय लागली असेल. काही अपवाद सोडता घरगुती अभ्यास करणे, परंपरेने आलेल्या व्यवसायात प्राविण्य मिळवणे यात बालपण सरून तारुण्यात विवाहित होऊन मोठ्या एकत्र कुटुंबातील सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडणे असे शतकानुशतके परंपरेचे जीवन जगले जात असावे.
दररोज स्नान करणारे, धार्मिक कृत्ये करायला, जेवण बनवायला वेगळे वस्त्र, सोवळे घालणारे लोक, स्त्रिया यांना मुद्दाम स्पर्श न करण्याचे भान इतरांना ठेवावे लागत असेल. काही वेळा मला आता कोणी शिवू नका म्हणणे म्हणजे मी कोणी मोठा, वेगळा(ळी) आहे असा संकेत मिळून त्यांचा मान राखणे हे सार्वजनिक शिष्टाचाराचे वागणे म्हणून मान्य झाले असावे. अशा मानसिकतेतून कधी वैतागून तर कधी अन्य कारणांनी घर सोडणे हे गरज म्हणून पाहिले जात असावे. एखाद्याने घरातून न सांगता निघून जाणे, हे त्या काळात वाजवी मानले जात असावे. ज्यांची चरित्रे समाजसुधारक, विविध क्षेत्रात काही तरी भव्य, उदात्त, कामे करणारे म्हणून आजकाल नावाजतो ते आयुष्यात केंव्हाना केंव्हा तरी घरातून पळून गेल्यामुळेच नंतरच्या त्यांच्या आयुष्यातील कर्तृत्वाला धार आल्याचे निदर्शनास येते. ‘घर सोडून हिमालयात जाईन’ म्हणणारे कितीतरी अर्ध्यावाटेतून परत आलेले असतील. एकदा लग्न झालेल्या स्त्रीला पुन्हा विवाह करण्याने समाजव्यवस्थेची घडी विस्कटेल याचे भय दाखवून विधवेला दबून हीन किंवा वयाच्या वडीलकीचे किंचित बऱ्या मानाचे स्थान दिले जात असावे. व्यवसायानुसार अंगवळणी पडलेल्या समाजात विश्वरचना, मानवाचे या विश्वाशी असलेले नाते, आकाशातील ग्रहगोलांचे निरीक्षण, कालमापन पद्धती, संख्यागणन, काव्य निर्मिती, विविध कलांच्या वर्धनाला जोपासणारांना उच्च दर्जा बहाल करणे, त्यांच्या बौद्धिक विचारांना नोंदवून ठेवायची सुयोग्य संधी देऊन व्यवस्था करून देणे, शांततेचा वेळ, निर्मित केलेल्या कलाकृतींचा आस्वाद घेणारे रसिकजन यांना राजाश्रय देणे स्वाभाविक होते. निसर्गाच्या कोपांचे वेळोवेळी अनुभव घेऊन त्या भितीला दूर करेल असे कोणी तरी असावे, म्हणून आपल्याला संकटातून वाचवले गेले अशा घटनातून मानवी मनाला भावेल, मान्य होईल अशा शक्तींना मानणे, आळवणे यातून शक्तिशाली देव-देवतांची प्रतीके निर्माण झाली असावीत. त्यांच्या अचाट जीवनचरित्राचे गान करणे, पुजा करणे यासाठी घरात देव्हारा आणि सार्वजनिक ठिकाणी मंदिरांची उभारणी केली गेली असावी.
ज्या काळात पोथीतील चरित्रनायक जीवंत होते. त्यांच्या त्या काळातील जीवन शैली, धार्मिक मान्यता, वैचारिक बैठक, सामाजिक बंधने यांचा प्रभाव पोथीतील विविध घटनांवर, कथनांवर पडलेला आढळतो. उदा. गजानन महाराजांनी स्त्रियांसाठी राखीव डब्यातून केलेला रेल्वेतून केलेला प्रवास व नंतर उडालेला गोंधळ, गुरुचरित्रातील शेतकऱ्याने उभ्या जोंधळ्याच्या पिकाची हानी झाली तर भरून देण्याचे हमीपत्र, सायंदेवांवर आलेला सुलतानी दरबारी जाऊन भेटण्याचा, तोंड देण्याचा प्रसंग, साईबाबांच्या जीवनात रोगाच्या साथीत हैराण झालेली सामान्य जनता व त्यांचे लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न वगैरे…
शिवाय असे ही एक महत्वाचे ठरते की चरित्र नायकाच्या कामगिरीवर पोथीतून त्याचे लिखाण करताना त्याच्या काळातील विचारांचा प्रभाव, लेखकाचे वैयक्तिक मत, मान्यता, यातून कधी कधी वेगवेगळ्या दोन कालखंडातील सामाजिक भानांचा प्रभाव घटना कथनांवर पडतो.
त्यामुळे चरित्रनायकाच्या जीवन प्रसंगातून, कथनातून असे काही विचार, जे विविध काल खंडातील प्रचलित मान्यतांना छेद देणारे असतील तर ते चरित्र लेखकाला कौशल्याने हाताळावे लागते. घटनांतील महत्वाच्या चित्रिकरणात त्याला शब्द योजना आणि त्यांचा शब्दशः आणि लाक्षणिक असे दोन्ही लक्षात घेऊन लेखन करावयाचे असते. लेखकाच्या जीवनकालापर्यंत ज्यांच्यासाठी ती लिहिली गेली किंवा काळातील सामाजिक धारणांचे प्रतीक किंवा प्रतिबिंब असले पाहिजे.
अशा पार्श्वभूमीवर श्रीपादांचे वर्तन, वैचारिक बैठक, सामाजिक चालीरिती, जातपाताची उतरंड, आर्थिक विषमता, स्त्री-पुरुष संवाद आणि समता, याबाबत काय मत होते त्याच्या वर्तनातून, त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब पडलेले दिसते का? याचे उत्तर हो असे मिळते. वेळोवेळी त्यांच्या बोलण्या आणि वागण्यातून ते जाणवते. याची काही उदाहरणे –
तात्कालिन सामाजिक रीतिभाती
श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः चातुर्वण्य पाळत नसत. विविध अध्यायातील कथानकातून ते उठून दिसते.. (अ ८) जात म्हणजे सामुहिक व्यक्तिमत्व. प्रत्येक जातीचा एक आत्मा असतो. त्यात त्या व्यक्तीचे विविध गुण, शक्ती, सामर्थ्य लीन असते. त्याच प्रमाणे गावाचा, शहराचा, देशाचा आत्मा असतो. म्हणूनच आपण आपल्या निवासभूमीला ‘भूमाता’ म्हणतो. हे त्यांचे कथन विचार करायला लावते.
ब्राह्मण वर्गाच्या कुरीतीवरील श्रींचे वर्तन आणि प्रबोधन
उपनयनचा अधिकार फक्त ब्राह्मणांना नाही तर सर्वच जातीमधे तो समान आहे. असे ब्राह्मणांचे प्रतिनिधी बापनाचार्य, क्षत्रिय कुलातील नरसिंह वर्मा, वैश्य समाजाचे प्रतिनिधी सुब्बय्या श्रेष्ठी वगैरे त्या काळातील विचारक आणि समाजाला वळण देणारे लोक होते. जेंव्हा त्यांच्या विचारांना कर्मठ लोकांची मान्यता दिली जात नाही असे पाहून बाल श्रीपादवल्लभ त्यांच्या बाजूने ठामपणे बोलताना व कृती करताना दिसतात. इतकेच नाही तर तिथल्यातिथे कर्मठांचा पाणउताराकरून अद्दलही घडवताना दिसतात.
अ ६.४४ शास्त्राधाराच्या काही अडीअडचणींचा धाक दाखवून जास्त दान दक्षिणा उकळणाऱ्या आणि कर्मकांड मात्र थातुरमातुर करून मेहनताना कसा भरपूर मिळेल याचा विचार करून काही ब्राह्मण मंडळी आपले वर्चस्व निर्माण करीत. बंगाल प्रांतातील ब्राह्मण ‘मासे खाऊ’ म्हणून याचा गहजब करून असले कसले उच्च ब्राह्मण? वगैरे आपला दरारा कायम राहण्यासाठी तत्पर असलेल्या भटजी मंडळींना बालपणात श्रींच्या सडेतोड वृत्तीतून समानता आणि सामंजस्य याचा कसा मेळ घालावा यावर त्यांचे लक्ष असे दिसून येते.
अ ३८ कुकुटेश्वर मंदिरात बंगाली ब्राह्मणाची मेला म्हणून आवई – एकदा एक पुराणिक कथा कीर्तने करायला आला होता. त्याला पंडित पुजाऱ्यांच्या दांडगाईने मंदिरात प्रवेश नसलेल्या समाजात तू प्रवचने दे असे मान्य करायला तयार केले गेले. मात्र समाजाने प्रतिष्ठा न दिलेल्या जनतेने दिलेल्या दानातील आम्हाला निम्मा वाटा दे असे सांगितले. तो बिचारा हो म्हणाला. काही घटनांच्या नंतर तो म्हणतो, ‘माझ्या पश्चात तेथील ब्राह्मण पुजारी वर्गाने मी क्षुद्र विद्येने कुक्कुटेश्वराशी काही साधना करताना ‘हा मेला’ असे उठवले. मेलो नव्हतो तरी पण त्या दांभिक पुजाऱ्यांनी ‘आम्ही केलेल्या विधिपूर्वक पुजापाठामुळे तो मेला नाही, वाचला’. अशी हाकाटी केली. अशा लालची पुजाऱ्यांनी गरीब भाविकांनी दिलेल्या संभावना (दान दक्षिणा) मंदिरात जमा करण्याऐवजी घरी नेऊन लपवल्या जात. ते खोटेपणाचे बिंग श्रींनी उघडे पाडले. या कथानकात श्रींच्या आशीर्वादाने श्रद्धाळूपणे दानधर्म करणार्यांना कसा न्याय मिळाला ते कथन रंजक आहे. ….
पंचम जात – चातुर्वर्णातील लोकांच्या व्यतिरिक्त जे लोक गावकुसाच्या बाहेर राहून आपले जीवन व्यतीत करत असत ते पंचम जातीचे (?) अ १४ मध्ये दत्तदास आपला अनुभव सांगताना श्रींच्या उपनयनाचा सोहळा पहायला न मिळालेल्या पंचम लोकांना भेटायला त्यांच्या वस्तीत श्री जातात. मुंज झालेल्या बटूने असे गावाबाहेरच्या अंत्य लोकांत जाऊन मिसळणे अमान्य असलेल्यांना उद्देशून, श्रींनी रागावून म्हटले, ’ येत्या शतकात तुम्ही ब्राह्मण लोक सेवक वृत्तीने धर्म आणि कर्म भ्रष्ट व्हाल. तुम्ही ज्यांना नीच जातीचे समजता आहात ते उन्नत स्थितीत पोहोचतील’. आजकालच्या समाजरचनेत तसे योग्य बदल घडलेले आपणांस दिसत आहेत.
मैलार या जातीची पोटजात गंगा काविळी, कपाळावर त्रिपुंड्र लावलेले, हातातील घंटा वाजवत कन्यका देवी परमेश्वरीची स्तुती गात फिरत असत. वीरमुष्ट्य, कमरेला प्रभावळ बांधून, तेलगूत त्याला ‘प्रभ’ म्हणत. ते त्या प्रभावळीवर खड्ग कवच आणि अन्य युद्धाच्या आयुधांची, रणरंगाची चित्रे रेखटलेली असत. ते वाजत गाजत आले की वैश्य राजे त्यांचा घरच्या विवाह आदि शुभकार्यात सत्कार करत असत. अ २७ मधील कथनात एका शेतमालकाने मैलार जातीच्या गाणी म्हणत फिरत देवाची स्तुती करणाऱ्यांचा व तेथे अतिथी म्हणून आलेल्या शंकरभट्ट व धर्मगुप्तांचा भोजन देऊन सत्कार केला. श्रींनी त्या दोघांना तुम्ही ‘गोशाला बांधून काढा’ असा आदेश दिला होता. त्याकरता फिरत फिरत त्या शेतकऱ्याकडे पोहोचले होते. शंकर भट्ट म्हणतात, ‘गोशाळा बांधून देणे या सारखी अंगमेहनतीची कामे आधी कधी करायची सवय नसल्याचे लक्षात घेऊन शेतमालकाने अतिथी पंचम जातीच्या लोकांना ती गोशाळा बांधून तयार करायला सांगितले व आम्हाला त्यांची मदत करायला सांगितले. आम्ही गोशाळा बांधायला जितपत जमेल तेवढी मदत केली आणि श्रींनी केलेल्या आदेशानुसार एका रात्रीत ती उभी राहिली. श्री भक्तांंना संकटात टाकून नंतर लीला करून धडा घालून देत असत की अपार श्रद्धा असेल तर – सृष्टीनियंत्याला – काहीच अशक्य नाही. वासवी मातेचे भक्त बालानगरू या भक्तांबरोबर फिरत श्री असत. ज्या त्या समाजातील, आदिवासी आणि भटक्या जाती-जमातीतील चालीरिती व परंपरांचा मान राखून श्रींनी त्यांचे संरक्षण करणे व त्यांच्या सांसारिक समस्यांना सोडवायला मदत करणे याला प्राधान्य दिलेले वरील अध्यायांच्या कथाभागातून प्रकर्षाने लक्षात येते.
५. रजक रविदास – अ ५ धोबी काम करणाऱ्या तिरुमल दास व त्याच्या प्रथम पत्नीचा मुलगा रविदास यांच्या कथानकातून श्रींचे त्यांच्यावर असलेले कृपाछत्र समजून येते. त्याची इच्छित वासना पूर्ण करायला त्यांनी रविदासाला राजाचे वैभव भोगायला पुढील जन्म दिला. अ ५.३७ – तिरुमलदास आधीच्या जन्मातील वेद पंडित होता. मळकट कपड्यावर मरतेसमयी मन गेले म्हणून पुढील जन्मी तो धोबी झाला ! त्यांचा मुलगा रविदास श्रींची सेवा करत मेला व नंतर बादशहा म्हणून जन्मला. ( माणूस ज्या संकल्पाने प्राण सोडतो त्यास त्या अनुसरून त्याला तसा पुढचा जन्म मिळतो. असा पुनर्जन्म सिद्धांत आहे.)
६.ताडीविक्या – अ १४७. शंकर भट्टाला कुरवपुर जवळ येत असताना एका गावात ताडीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून बळेबळे ताडी पाजली जाते. दुर्गंधीयुक्त तोंडाची चव न आवडून वैतागलेल्या शंकरभट्टांना पुर्वजन्मीची राहिलेली इच्छा पुर्ण करायला परिस्थिती प्राप्त करून दिली गेली. अ १४.११२ गौडकुलातील ब्राह्मण लोक ताडी पीत असत. तसेच जे पैंद्य ब्राह्मण सध्या हिमालयात शंबल (सिक्कीम राज्यातील) गावात जाऊन राहीले आहेत. अ १४.१०९. ताडी पिण्याचा कुलगोत्रशी संबंध नाही.
७. परित्यक्ता स्त्रिया – एकदा विवाह झाल्यावर कारणपरत्वे एकाकी जीवन जगणे किती कष्टाचे होत असावे, याची जाणीव अ १६ सुशिलाच्या कथानकातून तर अ ५ मधील नवरा बालपणीपासून घरातून गायब झालेल्या परिस्थितीत सासू-सासऱ्यांच्या आसऱ्याने राहायची प्रथा पाळणाऱ्या स्त्रीवर्गाची कुचंबणा लक्षात येते.
८. यवन लोक – राजकीय परिस्थितीचे वर्णन पोथीतून कमी वेळा दिसत असले तरी यवनांच्या आडमुठ्या व त्रासदायक वर्तणुकीची झलक अ १७ मधील दोन बनेल आडदांड लोकांच्या मार्फत समजून येते. नंतरच्या शतकात यवनांचा जोर वाढत गेला तसा रयतेला सोशीकपणाने राहायला श्रींच्या साई अंशाअवतारातून प्राधान्य मिळाले. यवन वेश धारणकरून त्यांनाही आपल्याकडे आकर्षित करून सामान्य जनतेसोबत शिष्यकरून दुष्टाव्याची व शत्रुत्वाची भावना बोथट करायची हातोटी शिरडीच्या अवतारातून प्रकट होते.
९. नावाडी – अ २७ आजकालचे रिक्षावाले, टांगेवाले जितके वाहतुकीला गरजेचे तितकेच पुर्वी नदी पार करायला नेणाऱ्या नावाड्यांची (निषाद जात सध्या. उ. प्र, बिहार मधे जात आहे )चलती होती. अशा किरकोळ वाटणाऱ्या कामाची कदर करून त्यांची विचापूस व केलेल्या सेवेची जाणीव ठेवणे श्रींच्या एकंदरीत वर्तनाचे वैशिष्ठ्य होते.
१०.आदिवासी, वनवासी – अ २७ ज्या काळात शेत जमीन सोडता उरलेल्या जंगलजागांवर शेकडो वर्षे मानवीसमाज शिकार व अत्यल्प साधनांच्या जीवनयापन करत होता. त्यांनी खेड्यातील जनतेशी सहसा संपर्कात न येता कधीमधी रोगराई, नैसर्गिक आपत्ती किंवा सैनिकी कारवायांतून वाचवायला मदत करायला संपर्कात यावे लागत असे. रात्रीच्या अंधाऱ्या प्रकाशात बहुरंगी वेष धारण करून आपल्या देवतांना प्रसन्न करायला एकट्या दुकट्या माणसांना पकडून त्रास देण्याची प्रथा दर्शवणारी कथने चेंचुलक्ष्मी, बगला मुखी, आदि किंवा वनवासीरुपातून दर्शवली गेली आहेत. अशा देवतांना सीमित परंतु प्रभावी शक्तीचे वरदान श्रींच्या स्त्रीरुपातील निसर्गशक्तीतून दिले जाते.
वरील समाज चित्र रंगवताना प्रस्तूत लेखकाला त्याच्या आयुष्यातील अनुभवास आलेल्या गोष्टींचा, समाजशास्त्रातील तज्ज्ञांच्या लेखनाचे, अन्य वाचनातील संदर्भ आहेत. उदाहरणार्थ,200 वर्षांपुर्वीची भारतातील खेडी आणि जनजीवन, गाव, चालिरिती, समाजरचना, यावर आधारित लेख ‘चित्रे आणि चरित्रे’. (उत्कर्ष प्रकाशन पुणे. पहिली आवृत्ती – जानेवारी १८८३, मूल्य ३० रुपये.) त्यातील ‘नवे गाव’ शीर्षकाचा एक लेख ‘साप्ताहिक तेजस्वी’मधे सुन १९७०च्या सुमाराला प्रसिद्ध झाला होता.’
प्रकरण ६ : अविश्वासी लोकांचा प्रादुर्भाव – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470980.html |