१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.
प्रकरण १ : शंकर भट्ट आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचे व्यक्तिमत्व – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470408.html |
प्रकरण २ : चरित्रनायक श्रीपाद श्रीवल्लभ यांचे व्यक्तिमत्व
चरित्रनायक श्रीपाद श्रीवल्लभ उर्फ श्री कसे दिसायचे? –
श्री बालपणापासून कसे दिसायचे याची उत्सुकता शंकर भट्टांना जशी होती तशी ती वाचकांना देखील असल्याने त्यांचे वर्णन विविध तऱ्हेने वाचकांसमोर येते. श्रीपाद जन्मल्यापासून ते त्यांच्या निजगमनापर्यंत झालेल्या स्थित्यंतरातून त्यांच्या शारीरिक देखलेपणाचे वर्णन त्रोटकपणे कळते. जन्मले तेंव्हा ते सर्व अवयवांनी निरोगी होते, याचे समाधान मातापित्यांसह सर्व लोकांना झाले. कारण त्या आधीची दोन अपत्ये अनुक्रमे अंध आणि मूक झाल्याने एक विशाद घरच्याना होता. ते काही महिन्यांचे झाल्यावर मातेचे दूध पुरेना याची चिंता निर्माण झाली.
जन्मसमयी अदभूत दृष्य –
आशुतोष या बंगाली व्यक्तीने पीठिकापुरात येऊन नाडी ग्रंथांच्या संदर्भ सांगून श्रीपादांच्या जन्म दिनांकाचे भाकित केले होते. ते दत्तावरात असून तो बालक शुभ लक्षणांनी युक्त असेल म्हटल्यामुळे एक प्रकारची उत्सुकता गावात निर्माण झाली होती. श्रींच्या जन्मकाळात एक दिव्यज्योती समान प्रकाश गर्भातून बाहेर येताना झाला होता. अठरा दिवसांपर्यंत तीन फण्यांचा नाग सतत त्यांच्यावर देखरेख करताना दिसत असे. त्यांनी काही महिन्याचे असताना प्रणव ध्वनी करणे, पाळण्यात असताना संस्कृत भाषेत प्रज्ञायुक्त चर्चा करणे यामुळे ते असामान्य बालक होते. याची कल्पना घरातील वरिष्ठांना आली होती. गावात त्यामुळे त्या बालकाला पहायला उत्सुकता होती. काही विद्वानांना आदर वाटे तर काहींना ते बालक काळी तंत्रविद्या प्राप्त (बगलामुखी) असावे असे मत व्यक्त केले जात असावे. नरसावधानी यांनी तर बालकाची परीक्षा घेऊन पाहिली. प्रश्नोत्तर रूपाने अनेक शंका उपस्थित करून पाहिल्या आणि विचित्र अनुभव आल्याने आपटी खाऊन आपली चूक दुरुस्त केली. त्यावरील चर्चा वेगळया प्रकरणात केली आहे. मात्र शंकेची पाल त्यांना भेटायला येणाऱ्यांच्या मनात नेहमीच चुकचुकत असावी. ते बालक म्हणून जितके निरागस दिसते त्यापेक्षा अधिक समजदारीचे संभाषण करताना, बोलताना पाहून आजकाल काही मुले जशी प्रथमदर्शनी आगाऊ, भोचके बोलणारी वाटतात तसे त्यांच्याशी संबंध येण्याआधी त्रयस्थाचे मत होत असेल. म्हणून अनेक वृद्ध योगी, अवधूत, पंडित पुजारी त्यांच्या समोर आपल्या वरिष्ठत्वाचा टेंभा मिरवताना पाहून त्यांचा मान भंग होत असे. काही आणखी रागावून परत जात तर काही विनम्र होऊन बालकाच्या पाया पडत किंवा प्रेम भावनेने ओथंबूत परत जात असावेत.
घरात बनवलेल्या राजगिऱ्याची भाजी आवडत असे, खीर विशेषत- चांदीच्या वाटीतून आजीने दिली की स्वारी खूष होई. अ ४७.२५९ व अ ४२ मधे शेवटी पीठापुरहून सर्व नातलग हवाईमार्गाने आले तेंव्हा खीर त्यांनी आजीच्या हातून आवडीने खाल्ली आणि वेंकट सुब्बमांच्या हातांनी लोणी तळहाताला लावून घेतले. गरम पाण्यानी शेकून घेतले. इतरांना देखील शिरा वगैरे खाऊ घातला. साधी राजगिऱ्याची भाजी मागून खाल्याने समाधान आजीबाई, आजोबा आणि इतर नातलगांना त्यांनी दिले.निजगमनच्या वेळी वयाच्या ३० व्या वर्षी देखील ते १६ वर्षाचेच असावेत असे पाहणाऱ्याला वाटत असावे. असे त्यावेळी उपस्थित सदस्य म्हणताना दिसतात.
श्रींचे अवतार कार्य –
प्रधान लक्ष्य सायुज्य स्थिती अनुभवणाऱ्या योग्यांची संख्या १ लाख २५ हजार करणे. अ. १७.१३४ सर्व कर्मबंघनातून मुक्ती करून देणे. आपल्या इष्ट देवतेच्या चैतन्यात एकरूप होणे याला सायुज्य मुक्ती म्हणतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांवर एक नवे पोथी समान पुस्तक सन २०१०पासून मराठीतून अनुवादित लीला चरित्रात अ. ५.४७ विठ्ठल बाबा म्हणतात, ‘उपनयन होत असताना श्रींनी सर्वांना चकित केले. ८ वर्षाचा बटू खास उच्च स्वरात ऋग्वेदातील ऋचा सांगू लागला, “अजामिळे पुरोहितं… नंतर, यजुर्वेदातील ऋचा “इशेत्वोर्जेत्वा वायवस्ये…” नंतर साम आणि अथर्ववेदांचे, “अग्नि आयाहि वीतये.. शंनोदेवी रभीष्ट्य…” आदि म्हटले. जमलेल्या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जय हो, जय हो असा जयघोष करून चिरंजीव हो असा आशीर्वाद मातामहांनी बटूला दिला….’
अध्याय २३.१९१ वर निजगमनाच्या वेळी ‘(श्रींनी) दुपारी १२ सर्व उपस्थित भक्तांना उद्देशून, मी इथेच अदृष्य रुपाने संचार करणार आहे. मला हे प्रिय पुण्यक्षेत्र आहे. नामस्मरणानेच आम्हाला संतोष होईल. तुमचे शुभ होवो. असा आशीर्वाद देत श्रीपाद स्वामी सर्वांच्या देखत एका ज्योतीच्या रुपात बदलून आकाशमार्गाने वर जाताना दिसले. असे म्हटले. डोळ्यातून अश्रुधारा वाहत सर्वजण नामस्मरण करीत होते…
प्रकरण ३ : चरित्रकालातील विविध राजसत्ता – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470452.html |