श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग ३)

१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.

भाग २ : प्रस्तावना – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470400.html

प्रकरण १ : शंकर भट्ट आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचे व्यक्तिमत्व

शंकर भट्ट हे एक व्यक्ति म्हणून कसे दिसत असावेत? त्यांचे माता पिता कोण? त्यांच्या जन्म-मृत्यू  दिनांक काय होता? त्यांना श्रींच्या बद्दल एकदम कसा काय इतका जिव्हाळा व श्रद्धाभाव निर्माण झाला असावा? संपूर्ण पोथीत विविध व्यक्तींचे पुर्वजन्म आणि नंतरच्या काळील जन्म जितक्या मोठ्या प्रमाणात उल्लेख करून वारंवार निर्देशिले आहेत त्या पार्श्वभूमीवर शंकरभट्टाचे पुर्वजन्मातील श्रींशी काय संबंध असावेत? शंकर भट्ट नंतरच्या जन्मात कोण म्हणून मानले जातात का? यावर विचार करावा लागेल.

वरील प्रश्नांचे काय आणि कितपत उत्तर मिळते ते पाहू.

शंकर भट्ट आपल्या बाबत म्हणतात, मी एक स्मार्त उडुपी ब्राह्मण आहे. स्मार्त म्हणजे त्याकाळात आदिशंकराचार्यांच्या  अद्वैत मतप्रणालीला मानणारे, शैव आणि द्वैत रामानुजाचार्य यांच्या वैष्णव मतप्रणालीचे प्रवाह होते. दोन्हीचे अनुयायी कट्टरपणे आपापल्या मतांनुसार मान्यता देणाऱ्यांना मान व प्रतिष्ठा असे. स्मार्त असे होते कि ते दोन्ही प्रणालींचा समन्वय साधून सर्व मतप्रवाहांना मान्यता देणारे होते.

शंकर भट्ट किरकोळ अंगयष्टीचे. उंच व गहुवर्णीय, काटक व्यक्ती असावेत. लांब शेंडीचा संभार बाळगून उरलेले केस वेळोवेळी वपन करणारे असावेत. पोथीतील यात्रेत त्यांच्याकडे हातात आधारी, (लाकडाची काठी, सोटा) गळ्यात यज्ञोपवित, काखेत झोळी त्यात २-३ लुंगी-धोतरे, पंचे, पाण्याचा गडवा, ताटली, लहान भांडी, आग निर्माण करणारे चकमक गारेचे दगड, सुरळी केलेली घोंगडी किंवा पथारी, पळी-पंचपात्र, जपमाळ असे प्रवासात उपयोगी सामान घेतलेले, पायात लाकडी तळव्याचे पादत्राण असलेले असा वेष असावा.  तिरुपतीच्या भागात असताना माझ्या शेंडीला कापून ‘गुंडू’ केले. तिथेच एकांच्या घरच्यांनी पकडून ‘तूच आमचा पळून गेलेला मुलगा आहेस’ म्हटल्याने आलेल्या दबावातून बाहेर पडल्यावर नंतर पुन्हा दाढी वाढलेला, भित्रा, अंगकाठीने हडकुळा, कुठलीही गोष्ट जमेल का नाही या बद्दल साशंक, वेळोवेळी कठिण प्रसंगात आता काय करू? म्हणून घाबरून गेलेला, कावळे, साप, नाग, वाघ, कुत्रे असे प्राणी पाहून आता काही जिवंत राहायची धडगत नाही असे वाटून धावा करून करुणा भाकणारा असे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. शंकर भट्ट सुरवातीच्या कथाभागात, ‘मी सोवळा, ब्राह्मण, मी उच्च कुलातील, अन्य जाती जमातींकडून कोरडा शिधाही (धान्य किंवा पीठ) घ्यायला राजी नसणारा ब्राह्मणेतर लोकांशी फटकून वागणारा (सध्याच्या भाषेतील कट्टर जातीयवादी) होतो. हळू हळू श्रीपादांच्या समाजातील सर्व जाती जमातींना समान वागणूक देणाऱ्या वर्तणुकीतून त्यांच्यात मानसिक बदल घडत उदारमतवादी बनून गेलेले ठळकपणे दिसून येतात. कृष्णानदीच्या पात्रातून पाण्यावर चालताना प्रत्येक पावलांखाली कमलपुष्पांचे अवतरण, सूर्याच्या प्रकाशमय शक्तीतून निर्माण झालेल्या बालिका रुपातील श्रींचे स्त्री रूप, अशा अशक्यप्रायः पण प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांवर कसा विश्वास ठेऊ’? असा त्यांचा साशंक भाव नंतर श्रींच्यामुळे सहवासामुळे हळूहळू श्रद्धा भावात परावर्तित झालेले एक निश्चयी शिष्य, असे चित्र समोर येते.

श्रीपादांबद्दल प्रथम माहिती 

चरित्रलेखक म्हणून शंकर भट्टांना चरित्रनायक श्रीपादांची माहिती हळूहळू मिळत जाते. अ. १ मधे मरुत्वमलाईच्या डोंगरातील गुहेत एका सिद्धयोग्यांवर संशय ठेऊन असलेले शंकर, वाघाने आधी गर्जना करून ‘ओम’ म्हटले आणि नंतर ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ म्हणून घाबरवून सोडले. आणि गुहेतील आणून अदृश्य झाल्याचे ‘हे श्रीपादवल्लभ कोण’? असा प्रश्न शंकरांना पडतो. पण मग गूहेत असलेल्या सिद्धवरेंण्य (असे शंकर त्यांना संबोधतात) योग्यांसमोर बसून समोर पेटवलेल्या कुंडातून काढून दिलेल्या रुचकर फळे, मधुर अन्न खाऊन झाल्यावर यज्ञ कुंडातील अन्न भक्षण केल्याचे फळ म्हणून शंकरांना दत्तावतार श्रींची भेट नक्की होईल असा आशीर्वाद देतात.  नंतरच्या चर्चेतून खुलासा होतो की जो वाघ दिसला ते ‘व्याघ्रेश्वर’ नामक योगी हिमालयातून कुरवपुरात श्रीपादांना भेटायला एकदा गेले होते, तेंव्हा ‘श्रीपाद पलिकडील तीरावरून पाण्यावरून चालत कुरवपुर बेटावर भेटून, पुन्हा पंचदेवपहाड भागातील जनसामान्यांना दर्शनासाठी केलेल्या मंडपात गेले’. इथे शंकरांना श्रींबद्दल त्यांना भेटलेल्या व्यक्तींबद्दल माहिती मिळायला सुरवात होते.  कुरवपूर म्हणून एक गाव आहे तिथे श्रीपादांची भेट घ्यायला नुसतेच जायचे नसून नंतर पीठापूरमला पैंडा लोकांमधे जायला मिळेल असे सुचवून दिले जाते. ज्यांच्यामुळे ‘अत्यंत अलौकिक आनंद’ मिळवायला बाहेर पडलो आहोत ते व्यक्तिमत्व किती प्रभावी असेल याची झलक त्यांना हळू हळू कळायला लागते.

मरुत्वमलाई गूहा असलेला रमणीय पर्वत

अ २ मधे सिद्धेंद्र योगींशी पांड्यदेशातील कदंब वनातील त्यांच्या आश्रमात भेट होते. कुलशेखर पांड्य राजाने कोट करून वसवलेल्या वेग(द?)वती नदीच्या (सध्याचे नाव वैगई) तीरावरील मधुरा नगरी(मदुराई) तील मीनाक्षी मंदिराचे व माणसांनी गजबजलेल्या रस्त्यावरील व्यापार उदीमाचे दर्शन होते. त्यांच्या चर्चेचून एक महत्वाची गोष्ट शंकरांना कळते. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत प्रकंपन (Vibrations) होत असते. प्रकंपन वैविध्यामुळे त्यात आकर्षण विकर्षण होते. शरीरावर, मनावर ते प्रभाव पाडते. त्यातून त्याच्या कर्मावर प्रभाव पडतो. सुकर्मे सत् प्रवृत्तींकडे आकर्षतात. कुकर्मे निश्चल भक्ती पासून दूर नेतात. दैवीरहस्य तर्कवितर्क करणाऱ्यांना, नास्तिकाना सांगू नये आणि जिज्ञासू, पात्र लोकांना मात्र जरूर कळवावे असा नियम आहे.

नंतरच्या प्रवासात भेटलेल्या वल्लभदास नामक चांभारकर्मी व्यक्तिविशेषातून उमजते की वर्ण, जात ही जन्मावरून सिद्ध न होता कर्मावरून होते, असे श्रींचे मत आणि वर्तन होते. श्रींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्यांच्या समोर उघड होतात. एके ठिकाणी गाढवावर बसून जायची पाळी येते. एका राज्याच्या लहरी राजासमोर नमक-चमक म्हणावे लागते. त्याकाळी हातवारे करून मुकेपणावर मात करता येत असे. मूकभाषेत अभ्यास करून विचित्रपुरच्या मंत्र्यांनी त्यावर लेखन केले होते. तेथील विक्षिप्त राजाच्या समोर आपण हातवारे करून दिलेली प्रश्नांची उत्तरे नेमकी बरोबर कशी आली याचे त्यांना गूढ वाटून राहिले. वर्गमूळ काढायची ‘चमे गणिती पद्धती सोडवून दाखवली. ‘ परमाणूंच्या सूक्ष्म कणसंख्या भेदामुळे विविध धातू बनतात’, ‘सृष्टी परमाणूंचे रहस्य आहे हे सांगणारे  कणाद महर्षीं होते वगैरे पांडित्य त्यांच्या तोंडून सहज निघत गेले. सर्व कथन अभ्यास नसताना आपसूक कसे आपल्याला सांगता आले ? यामुळे श्रीपादांच्या मुळेच ते घडत गेले असा श्रद्धाभाव खूप वाढला. ‘कणाद सिद्धांत काय? ते पुन्हा सांग म्हटल्यावर असे विचारता मला फारशी माहिती नाही’ असे प्रांजळपणे शंकर कबूल करतात. हे सर्व कसे जमले याचे आश्चर्य शंकर भट्ट करत असताना त्यांना लहरी राजाकडे पुन्हा परत उभे करून सुवर्ण दक्षिणा दान मिळते. हा सर्वस्वी अशक्यप्राय घटनाक्रम श्रींच्या कृपेमुळे होत आहे की काय? असे वाटत असताना पुढे खूप चालून गेल्यावर चिदंबरमच्या जवळच्या एका डोंगरावर पळणी स्वामींशी संपर्क येतो. कणाद सिद्धांत त्याच्या कडून शंकरांना नीट कळतो.

चरित्र लेखनाचा आदेश 

एक महत्वाचा संदर्भ असा येतो की शंकर भट्टांना माहित नसले तरी त्यांच्या हातून श्रींच्या चरित्राची निर्मिती करायचे कार्य होणार आहे.  शंकर मनातून प्रार्थना करतात, ‘मी उडुपीहून निघाल्यापासून अनेक चित्रविचित्र घटना घडत आहेत. हे सगळे अनुभव ग्रंथस्थ करावेत यासाठी प्रार्थना करावी का’?  यावर पळणी स्वामी त्याच्या मनातील भाव ओळखून ‘श्रींचा चरित्रग्रंथ तू लिहिशील’ अ. ४.२९ असे म्हणतात.

अ ५.३५ तिरुमलाहून तिरुपतीला खाली आल्यावर एका न्हाव्याच्याघरासमोर आईवडिलांनी अचानक सामोर येऊन ‘तूच आमचा हरवलेला मुलगा सुब्बय्या घरी चल’ म्हणून जबरदस्तीने नेले. नंतर अनेक परीने सांगून ते ऐकेनासे झाले मात्रिकांचे शारिरीक त्रास सहन करायला लागले. शेवटी ‘तो मीच’ असे म्हणून सुटका करावी असे ठरवून खोटे बोलायला भाग पडले. अशा वेळी एक जंगम (मंदिरातील पुजारी व ज्योतिषकाम करणारा) त्या गावात आला  त्याने नाडीग्रंथाच्या पट्ट्यात कवड्या टाकून एका ताडपत्रावरील मजकूर वाचून सांगितले की ‘हा तुमचा हरवलेला मुलगा सुब्बय्या नाही. प्रश्न करणारा शंकर भट्ट नावाचा ब्राह्मण आहे. तो दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिहिणार आहे’. इथे त्यांना नाडीग्रंथातील कथनातून आदेश असल्याचे समजते. कणिपाक्कम गावामधे ७० वर्षांच्या वृद्ध तिरुमलदासांच्या सानिध्यात पुन्हा चरित्र ग्रंथ लेखनाची ग्वाही दिली जाते. अ ५.३६ ‘बेटा शंकर, तू आज पासूनच श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लिहायला सुरवात कर. कुरवपुरामधे तुला श्रीपादांचे आशीर्वाद तुला मिळतीलच’. अ ९.७७ तिरुमलदास म्हणतात, बेटा शंकरभट्टा श्रींचे दिव्य चरित्र लिहिण्यासाठी तुझे नियोजन झाले आहे. तेंव्हा तुला श्रीपादांचे जे अनुभव आले, तसेच त्यांच्या परम भक्तांनी श्रीपादांचे त्यांना आलेले अनुभव सांगितले, तेच तू लिही. त्यावर भाष्य करायची तुला गरज नाही. श्रींचे चरित्र त्यांच्या लेखणीनेच लिहिले जाणार आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस’. नंतर शंकरभट्ट मनात विचार करतात की मी आत्ता जरी लेखन भूर्ज पत्रावर करत आहे तरी भविष्यात ते कशावर लिहितील? या आणि इतर प्रश्नांची उत्तरे एकाएकी झालेल्या गडगडाटी दृष्टांताच्या अनुभवातून मिळाली. सध्याच्या काळात जो कागद वापरला जातो त्याचे एक गुळगुळीत पांढरे पानावर तेलुगूत ‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’ उत्पन्न झाले. व काही काळाने ते गुप्त झाले. पुढे श्रींच्या सानिध्यात गेल्यावर अ ४४.२४९ पंडित भास्कर म्हणाले, ‘तू श्रीपादवल्लभ चरित्र लिहिणार आहेस, पण लक्षांत ठेव की तू हा ग्रंथ लिहिणे निमित्तमात्र आहे. तुझ्याकडून हा ग्रंथ श्रीपाद लिहून घेत आहेत.

हा अक्षरसत्य ग्रंथ असणार. या पवित्र ग्रंथाचे पारायण जो करेल त्याच्या इहपर साधनांची सोय होईल. तुझ्या संस्कृत ग्रंथचे तेलुगूत अनुवाद पण होणार नंतर अनेक भाषेत अनुवाद होतील. तो बापन्नार्यांच्या (आईचे वडील) ३३ व्या पिढीत प्रकाशित होईल. यावरून असे म्हणता येईल का की वेळोवेळी शंकर घडणाऱ्या घटनांचे टाचण करुन ठेवत असावेत. श्रींच्या निजगमनानंतरच्या तीन वर्षाच्या काळात ते त्यांनी संकलित करून पुन्हा लिहून काढले असावे.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी

शंकर भट्टांना श्रीपादांच्या व्यक्तिमत्वाची अनुभूती कशी येते ?

सगुणरुपातील दर्शन – शंकर पळणी स्वामींना म्हणतात, ‘मी त्यांचे रुपही पाहिलेले नाही मी त्यांचे ध्यान कसे करू’? नंतर ध्यान लावल्यावर प्रथम यवन दर्शन झाले.  श्रीपादांचे झालेच नाही! शंकर म्हणतात, तिरुपतीच्या मंदिरात ध्यान करत असताना, वेंकटेश्वराच्या बालत्रिपुरसुंदरी रूपाचे एका 16 वर्षाच्या यतीरूपात दर्शन झाले. काळ्यावेषातील शनिदेव आणि श्रींच्या मधील शंकरांवर येऊ घातलेल्या साडेसातीबद्दल संभाषण त्यांनी ध्यानात ऐकले.

श्रींनी शंकर भट्टांना समोर बसवून सगुण साकार रूपात दर्शन दिले. त्यावेळी एक काळी प्रतिमा शंकर भट्टांचे शरीर सोडून गेली. श्रींनी आपल्या सामर्थ्याने  दिव्याग्नी उत्पन्न करून ती काळी प्रतिमा जाळून श्रींनी शंकर भट्टांना समोर बसवून सगुण साकार रूपात दर्शन दिले. त्यानंतर शंकर भट्टांची कुंडलिनी जागृत झाल्याचा अनुभव समाधिस्त होऊन घेतला. तुला तेजोमय रुपात रोज दर्शन मिळत राहील. या काळात तुला अनेक योग रहस्ये सांगत राहीन. त्यावेळी गुरुचरण नामक एक शिष्य भेटायला आला.

शंकर भट्टांचा मी उच्च कुलातला अहं भाव कमी कमी होत जातो –  वाटेत कावळ्यांनी टोचू टोचून हैराण झालेल्या घायाळ शंकरांनी आपसूक श्रींचा धावा करायला सुरवात केली. ते म्हणतात, ‘एका धोब्याने त्याच्या गाढवावर बसवून चांभाराकडे नेले. पीडादायक उपाय, मलम पट्टी करून झाल्यावर, मी उच्च कुलातील ब्राह्मण, हा कर्माने चांभार असा विचार किंवा भाव सताऊ लागला’. “वेदांती पोपटपंची करणारे, पौरोहित्य करून सोवळे ओवळे याचा धाक दाखवून जन्माने ब्राह्मण हे उच्च व परमेश्वरी कृपेला खरे पात्र“ असा तो भाव. भगवंताच्या अनुग्रहासाठी श्रीपाद जात, कुळ, मत, धन असे भेद नसतात. या चांभाराच्या वक्तव्यामुळे शंकरांच्या मनातून उपचार करणारा चांभार वल्लभदास हीन कुलातील आणि मी उच्च कुलीन असा भाव मनातून निघायला सुरवात होते.

कुरवपुरातील शंकर भट्टांची नेमणूक अतिथी व भोजनकक्ष सांभाळणारे – कुरवपुरात श्रींच्या समावेत निवास करताना अतिथी निवास, भोजन व्यवस्था त्यासाठी लागणारे धान्य, भाजी, मीठमसाला, किराणामाल यामधून रुचकर स्वयंपाक बनवणे हे शंकरांकडे शेवटपर्यंत राहिले. अ २९.२६४ मधे श्रीपाद म्हणतात, ‘ मी एक अनुष्ठान अग्निविद्या म्हणून करत आहे. तू चूल पेटवून अन्न तयार करण्याची उपासना करतोस. ही उपासना आणखी ९ वर्षे चालू राहील.’ या कथनावरून आणखी एक गोष्ट लक्षांत येते की हे कथन साधारण सन १३४१ च्या सुमारास श्रींनी केले गेले असावे.

व्यक्तिमत्वात बदल 

पीठापुरमला रानातून जाताना योगक्रियेतील मर्मे आत्मसात करायला छिन्नमस्ता देवीच्या रात्रीच्या भीषण नाचातून त्यांचे स्त्रीत रुपांतर झाले. परत सकाळी पुरुषत्व प्राप्त झाले. यातून पुरुष – स्त्री हा भेद नष्ट झाला. हे सांगताना ते ही तितकेच चक्रावून गेले होते. ‘आत्म्याला स्त्री-पुरुष असा भेद नाही  असे त्यातून कळले’ असे म्हणतात.

ज्योतिष शास्त्रातील पारंगतता 

उत्स्फूर्त कथन –  एका अबलेला वाचवायला सरसावलेले शंकर दोन बलदंड व्यक्तींना त्यांचे पुर्व चरित्र सांगून चकीत करतात. एका ब्राह्मणाचे घरातील सामान बाहेर फेकू  न देताना जे तोंडाला येईल तसे शंकरभट्ट बोलताना त्यांची तोल सुटतो. पण श्रींच्यामुळे ती ती कथने अचानक खरी ठरतात.

ज्योतिष शास्त्राप्रमाणे वर्तविलेले भविष्य नेहमीच खरे निघते का? मानव जीवन प्रारब्ध नियोजित आहे का की मानवी प्रयत्न वर अवलंबून आहे? तसेच वर्तविलेले भविष्य बदलू शकते का?’ अ २२.१६

कालसर्पयोगाचे महत्व – आजकाल कालसर्पयोग नावाचे काही योग नसतात असे सांगितले जाते. ७ शे वर्षांपुर्वी श्रीपादांनी या योगावर केलेल भाष्य नमूद करणे  प्रासंगिक ठरेल. शंकरभट्ट यांच्या पत्रिकेतील ग्रहयोग’ अ ९.६९ वर शंकरभट्ट तुझ्या पत्रिकेत गुरू शत्रू स्थानी आहे’.मात्र यातून जन्म दिनांकाचा संदर्भ मिळत नाही.

भविष्यकालातील घटनांचे कथन – अ ५.३५ काही शतकांनी त्रिपुर देशातील अक्षयकुमारनावाचा जैन (त्यांच्या) महंताकडून पीठापुरमला पोहोचेल.

अनुत्तरित प्रश्न –  शंकर आपल्या घरातून का व कधी निघाले? त्यांचे आईवडील, भाऊ बहिणी कोण, किती? ते आपल्या उडुपीच्या घरी परत कधी केले का? किंवा त्यांचे नातलग त्यांच्या शोधात कुरवपुरला आले होते का? त्यांना जन्म कुठे, कधी झाला? मृत्यू कसा व कधी आला? यावर त्यांच्या पोथीतून माहिती उपलब्ध नाही. परंतु दुसऱ्या पोथीतून मिळणाऱ्या कथनातून जे चित्र उभे राहाते त्यातून काही खुलासे होतात. तसेच काही संभ्रम निर्माण होतो. यावर चर्चा पुढील प्रकरणात केली जाईल.

प्रकरण २ : चरित्रनायक श्रीपाद श्रीवल्लभ यांचे व्यक्तिमत्व – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470448.html