रशियाने सैनिक आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे युक्रेनला चारही बाजूंनी घेरले असून ‘या दोन्ही देशांत युद्ध अटळ आहे’, असे बोलले जात आहे. हे युद्ध पेटले, तर अमेरिका आणि युरोपीय देश हेही त्यात उडी घेण्याची शक्यता आहे. या युद्धाचे रूपांतर तिसर्या महायुद्धात होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसे युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद नवा नाही. साधारण ३० वर्षांपूर्वी सोव्हिएत रशिया फुटून अनेक छोटे-मोठेे देश निर्माण झाले. युक्रेनही त्यांतीलच एक. रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना रशियाचे हरवलेले वैभवशाली दिवस परत आणायचे आहेत. त्यासाठी त्यांना युक्रेन रशियाच्या अधिपत्याखाली हवा आहे. ‘हे महाकठीण आहे’, हे त्यांनाही ठाऊक आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी युक्रेनमध्ये रशियाचा उदो उदो करणारा आक्रमक प्रचार करणे, तेथील राजकारणात हस्तक्षेप करणे, तेथील रशियाप्रेमी नागरिकांना पाठिंबा देणे आदी गोष्टी करत युक्रेनमध्ये रशियाच्या बाजूने सकारात्मक वातावरण राहील, हे पाहिले. वर्ष २०१४ मध्ये युक्रेन युरोपीय राष्ट्रांकडे झुकत असल्याचे पाहून रशियाने युक्रेनचा भाग असलेला क्रिमिया कह्यात घेतले. त्या वेळेपासून भविष्यात युक्रेन आणि रशिया एकमेकांसमोर उभे ठाकणार, हे स्पष्ट झाले होते. तो दिवस आता जवळ येऊ लागला आहे, एवढेच. युक्रेनच्या मागे युरोपीय देश आणि अमेरिका ठामपणे उभे आहेत. त्यांचा विरोध मोडीत काढून रशिया युक्रेनला स्वतःच्या अधिपत्याखाली घेऊ शकतो का ? हा प्रश्न आहे. क्रिमिया कह्यात घेतल्यापासून युक्रेनमधील रशियाप्रेमींची संख्या घटली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती आणि पूर्वाश्रमीचे विनोदी कलाकार वोलोडिमीर जेलेंस्की सत्तेत आल्यानंतर ‘ते रशियाच्या बाजूने निर्णय घेतील’, असे वाटले होते; मात्र तसे झाले नाही. एवढेच कशाला त्यांनी युक्रेनला युरोपीय संघात आणि नाटो यांत सदस्यत्व मिळावे, यासाठी प्रयत्न चालवले. काही दिवसांपूर्वी जेलेंस्की यांनी युक्रेनमधील रशियाप्रेमी प्रसारमाध्यमांवर बंदी घातली. त्यामुळे पुतिन यांचे पित्त खवळले. या पार्श्वभूमीवर ‘युक्रेनमध्ये वास्तव्य करणार्या रशियातील नागरिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत’, असे सांगत रशियाने दंड थोपटले आहेत. त्यामुळे युक्रेनचे पुढे काय होणार, हे येणारा काळच सांगेल.
वर्चस्वाची लढाई !
सोव्हिएत रशिया भंगल्यानंतर रशियाची शक्ती अल्प झाली. त्यामुळे अमेरिकेशी दोन हात करण्यासाठी रशिया प्रयत्नशील आहे. रशियाच्या आर्थिक स्थिरतेसाठी युक्रेन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. युक्रेनला मात्र ‘रशिया त्याच्यावर दादागिरी दाखवतो’, असे वाटते. त्यामुळे स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी युक्रेन युरोपी देशांच्या बाजूने झुकत असून तेथील देशांसमवेत त्याला व्यापार करून अर्थकारण वाढवायचे आहे. यामुळे रशियाची धुसफूस होत आहे. साधारण २ वर्षांपूर्वी युक्रेनने रशियाच्या पुराणमतवादी चर्चचे वर्चस्व झुगारून स्वतंत्र चर्चची स्थापना केली. वर्ष २०१९ पर्यंत युक्रेन हे धार्मिकदृष्ट्या रशियातील चर्चच्या अधिपत्याखाली होते. युक्रेनमधील धार्मिक निर्णयांसाठी त्याला रशियावर अवलंबून रहावे लागत होते; मात्र आता स्वतःचे चर्च स्थापन करून युक्रेन त्या संदर्भातही स्वतंत्र झाला आहे. युक्रेन आपल्या हातून निसटत चालला आहे, याची भीती रशियाला आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यात संस्कृती, परंपरा, भाषा आदी गोष्टी समान आहेत; मात्र युक्रेनला आता रशियापासून मुक्ती हवी आहे. त्यासाठी त्याला युरोपीय देश आणि अमेरिका यांची फूस आहे. युक्रेनला ‘मुक्त’ करण्यामागे अमेरिकेचा हेतू शुद्ध नाही. युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याला रशियावर निशाणा साधायचा आहे. त्यामुळे तो युक्रेनला साहाय्य करत आहे. युक्रेन हा नैसर्गिक साधन-सामग्रीने युक्त आहे. त्यामुळे युरोपीय देशांचा त्याच्यावर डोळा आहे. एकंदरीत ‘युक्रेनचे भले व्हावे’, असे कुणालाही प्रामाणिकपणे वाटत नाही. येथे सर्वांचा स्वार्थ दडला आहे. अमेरिकेने जे इतर देशांच्या संदर्भात केले आहे, तेच राजकारण ती युक्रेनच्या संदर्भात खेळत आहे. त्यामुळे रशियाला नमवण्याचा अमेरिकेचा हेतू सफल झाल्यास युक्रेनला अमेरिका वार्यावर सोडणार, हे अटळ आहे.
विरोधाला पुरून उरणारा रशिया !
वर्ष २०१४ मध्ये युरोपीय युनियनने रशियावर आर्थिक निर्बंध लादले. यामुळे रशियातील ५ नामांकित बँकांना युरोपमधून मध्यम स्वरूपाचे आणि दीर्घकालीन आर्थिक साहाय्य मिळणे बंद झाले. त्यानंतर अमेरिकेने रशियाला तेलनिर्मितीसाठी तंत्रज्ञान देण्यास नकार दिला. रशियाला ‘जी ८’ मधून काढून टाकण्यात आले. यामुळे रशियानेही युरोपीय देश आणि अमेरिका यांच्याकडून खाद्य सामग्री आयात करणे बंद केले. या आर्थिक निर्बंधांचा फार मोठा फटका रशियाला बसला. असे असले, तरी रशियामधील पुतिन यांच्या प्रसिद्धीवर जराही परिणाम झाला नाही. आजही तेथील लोकांना पुतिन हे राष्ट्रहितासाठी युक्रेनशी दोन हात करत आहेत, असे वाटते. युक्रेनच्या विरोधात त्यांनी उचललेली पावले, ही त्यांचा प्रखर राष्ट्रवाद दर्शवतात, असेही तेथील जनतेचे मत आहे. त्यामुळे पुतिन यांच्या युक्रेनच्या विरोधातील आक्रमक धोरणांवर जराही परिणाम झालेला नाही. आताही अमेरिका रशियाला दरडावत आहे; मात्र पुतिन यांनी त्याला भीक घातलेली नाही.
पुतिन अखंड रशियाचे स्वप्न पहात आहेत. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अमेरिका आणि त्याच्या ताटाखालची मांजरे असणार्या युरोपियन देशांशीही दोन हात करण्याची सिद्धता दर्शवली आहे. रशियाकडून भारताने हे शिकण्यासारखे आहे. धर्माच्या नावाखाली भारताचे लचके तोडण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर पाकने गिळंकृत केले. तरीही ते परत मिळवण्यासाठी भारताने कधीही धोरणात्मक पावले उचलली नाहीत. युक्रेन परत मिळवण्यासाठी रशिया कोणतीही किंमत मोजायला सिद्ध आहे. पाकव्याप्त काश्मीर, जो भारताचाच अविभाज्य भाग आहे तो परत मिळवण्यासाठी भारत रशियाप्रमाणे कधी आक्रमक होईल का ?
युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध चालू झाल्यास आणि त्यात भारत भरडला गेल्यास भारत तिसर्या महायुद्धासाठी सज्ज आहे का ? युक्रेन आणि रशिया यांच्या संघर्षाकडे पहातांना ही सूत्रेही लक्षात घेणे अपेक्षित आहेत.