हरिद्वार, २५ मार्च (वार्ता.) – कुंभमेळा हा हिंदूंचे विश्वातील सर्वांत मोठे धार्मिक पर्व असून तो भारताची सांस्कृतिक महानता दर्शवणारा आणि सत्संग (संतांचा सत्संग) देणारे हे आध्यामिक संमेलन आहे. हा कुंभमेळा सत्युगापासून प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे प्रती १२ वर्षांनी भरतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. यू ट्यूब चॅनलवरील ‘जम्बो टॉक विथ निधीश गोयल’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधीश गोयल यांनी केले.
कुंभपर्वात गंगास्नान केल्याने ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा प्रभाव अनुभवता येणे
श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की, विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर आलेल्या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन अन् नाशिक येथील गंगा नदीसह अन्य नद्यांमध्ये दिसून आला आहे. इतकेच नव्हे, तर या परिसरातील ४५ किलोमीटर क्षेत्रातील सर्वच जलस्रोत आकाशीय विद्युत्-चुंबकीय प्रभावामुळे चिकित्सकीय गुणयुक्त असतो. त्याचसमवेत त्यातील पाणीही विद्युत्र्ोधी पात्रात (लाकूड, प्लास्टिक, काच) ठेवल्यास अनेक दिवस तसेच रहाते, असे आधुनिक आंतरीक्ष वैज्ञानिक तथा भौतिक शास्त्रज्ञ यांनी संशोधनाअंती मान्य केले आहे. यावरूनच कुंभपर्वाच्या निमित्ताने एक मास चालणार्या कुंभमेळ्याला वैज्ञानिक आधार आहे. ‘रुडकी आयआयटी’नेही याविषयी ग्रह गणितानुसार संशोधन केले आहे. या कारणामुळे कुंभपर्वात गंगास्नान केल्याने ही ऊर्जा सर्वांना मिळते. रोगप्रतिकार;क शक्ती वाढून व्याधी दूर होेऊन लोकांचे आयुर्मान वाढत आहे.
कुंभमेळ्यामध्ये विविध नावांचे आखाडे सहभागी होणे
कुंभमेळ्यामध्ये जे विविध प्रकारचे साधू सहभागी होतात. त्यांना नागा, बैरागी, संन्यासी, महात्यागी, उदासीन, दिगंबर, अटल, अवधूत अशी नावे आहेत. तसेच त्यांचे या नावाने आखाडेही असतात. यांमधील अनेक साधू हे शास्त्र आणि शस्त्र पारंगत असतात. त्यांची अशी अनेक नावे वेगवेगळ्या संप्रदायानुसार असली, तरी आध्यात्मिक अर्थ एकच असतो. शैव (दशनामी) आखाड्यांमध्ये ७ आखाडे असतात. यामध्ये महानिर्वाणी, अटल, निरंजनी, आनंद, जुना (भैरव), आव्हान आणि अग्नी आखाडे यांचा समावेश आहे. वैष्णव आखाड्यामध्ये ३ वैष्णव आखाडे आहेत. दिगंबर, निर्मोही, निर्वाणी हे आणि उदासीन आखाड्यात उदासीन पंचायती मोठा आखाडा अन् उदासीन पंचायती नवीन आखाडा, तसेच शीख समाजाचा निर्मल आखाडा हाही उदासीन आखाडा आहे, अशीही माहिती श्री. राजहंस यांनी दिली.
आखाड्यांद्वारे करण्यात आलेले धर्मरक्षणाचे कार्य
आखाड्यांनी केलेल्या धर्मरक्षणाच्या कार्याविषयी सांगतांना श्री. चेतन राजहंस म्हणाले की, हिंदूंवर इस्लामी आक्रमकांद्वारे अनन्वित अत्याचार करण्यात येत होते. त्या आक्रमकांचा प्रतिकार करण्यासाठी तत्कालीन हिंदु राजसत्ता असमर्थ सिद्ध झाली. त्या वेळी साधू-संन्यासी यांनी धर्मरक्षणार्थ दंड उचलला होता.