२० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना साहाय्यक फौजदारास रंगेहात पकडले

फौजदारच लाच घेत असतील, तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कधीतरी अल्प होईल का ? अशा फौजदारांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

सातारा, ८ मार्च (वार्ता.) – कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी कारवाई करत ९४ सहस्र रुपयांचा गुटखा शासनाधीन केला होता. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयिताला जामीन मिळवून देण्यात सहकार्य करण्यासाठी कोरेगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक फौजदार प्रल्हाद श्रीरंग पाटोळे यांनी २० सहस्र रुपयांची लाच मागितली. संशयिताच्या सख्ख्या भावाकडून ही लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटोळे यांना रंगेहात पकडले. यामुळे कोरेगाव पोलिसांच्या गुटखा वाहतुकीवरील कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे.

गुटखा वाहतूक प्रकरणातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी साहाय्यक फौजदार यांनी २० सहस्र रुपयांची लाच मागितली. तेव्हा विनाविलंब संशयिताचे भाऊ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. एका उपाहारगृहाच्या परिसरात २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पाटोळे यांना रंगेहात पकडण्यात आले.