हिंदूंना सुरक्षितता आणि संरक्षककवच देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल ! – मंगलप्रभात लोढा, आमदार

मुसलमानांच्या सततच्या त्रासामुळे मालवणी (मुंबई) येथील हिंदूंची संख्या अल्प झाली !

श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, मुंबई.

आमदार मंगलप्रभात लोढा

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – मुंबईमधील मालवणी येथे मुसलमानांकडून हिंदूंना त्रास देऊन हिंदूंना तेथून हुसकावून लावण्यात आल्याने तेथे हिंदूंची संख्या अल्प झाली आहे. मालवणी पोलीस ठाण्यात अनेक हिंदूंनी तक्रारी प्रविष्ट करूनही त्याची नोंद घेऊन कारवाई केली जात नाही. सरकारने मालवणीसारख्या घटना मुंबईतील मानखुर्द, चेंबूर, तसेच मुंब्रा येथे पसरू देऊ नये. पालघर येथे हिंदु साधूंची हत्या केली जाते आणि कुणी एक मंत्री म्हणतो, ‘साधू नालायक असतात, त्यांच्याकडे कुणी जाऊ नये.’ याविषयी मी मलबारी पोलीस ठाण्यात तक्रार करूनही त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. साधू असलेल्या संस्थेवर आघात केला जातो; मात्र महाराष्ट्रातील मौलवी, फादर यांच्याविरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत आहे का ? केवळ हिंदूंना लक्ष्य केले जाते. सध्याचे सरकार हिंदूंच्या समर्थनाने निवडून आले आहे. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य मानते, तर पुढे येणार्‍या परिस्थितीत हिंदूंना सुरक्षितता आणि त्यांना संरक्षककवच कसे दिले जाईल, याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असे रोखठोक प्रतिपादन भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी ४ मार्च या दिवशी विधानसभेत केले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी ते बोलत होते. हिंदूंवर धर्मांधांकडून होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात त्यांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवला.

या वेळी आमदार अस्लम शेख यांनी लोढा यांच्या भाषणाला २ वेळा आक्षेप घेतला. त्या वेळी लोढा यांनी ‘‘मी सांगितलेली माहिती सत्य असून त्याची मालवणी पोलीस ठाण्यात नोंद आहे’’, असे ठणकावून सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘ये आवाज यहा रुकेगी नही, यह बात यहा झुकेगी नही, ये बात आगे जायेगी ।’ ज्या पद्धतीने काश्मीरमधील हिंदूंचे पुनर्वसन केले गेले, तसे मालवणी आणि मालाड येथील ‘राजकीय पॅटर्न’ला पालटले जाईल. महाराष्ट्र हिंदूंचे असून हिंदुस्थान हिंदूंचा आहे.’’

मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की,

१. भारतातील हिंदूंचे आराध्य दैवत श्रीराम आहे. या श्रीराम मंदिरासाठी हिंदू संघटित होऊन पुढे येत होते, त्या वेळी भगवान श्रीराम मंदिर निर्माणाचे फलक फाडण्यात आले. तेथील पोलिसांनी ते फलक पाडले. त्यानंतर हिंदूंनी त्याविषयी तक्रार केल्यानंतर तेथे फिर्याद केली गेली.

२. एका मंत्र्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आग लागल्यानंतर त्यांच्या विरोधात फिर्याद नोंद केली जात नाही; मात्र भगवान श्रीराम मंदिर निर्माणाचे फलक फाडले म्हणून त्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या हिंदूंना ६ दिवस पोलीस ठाण्यात अडवून ठेवण्यात आले आणि त्या हिंदूंच्याविरुद्ध फिर्याद नोंद केली गेली.

३. मालाड मतदारसंघात गेल्या ५ वर्षांतील मतदारांची सूची पाहिल्यास तेथे प्रतीवर्षी ५ ते ७ टक्के हिंदूंची संख्या वाढायला हवी होती; मात्र प्रत्यक्षात मालाड येथे १५ सहस्र हिंदू अल्प झाले, तर १२ सहस्र मुसलमान वाढले. हे षड्यंत्र आहे.

४. तेथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना आणून बसवले जात आहे. त्या मुसलमानांना व्यवसाय चालू करून देण्यात येतो. सरकारी भूमीवर त्यांचा कब्जा चढवला जातो.

५. छिडानगर वसाहतीत ५ वर्षांपूर्वी १०८ कुटुंबे रहात होती. आजही १०८ कुटुंबे तेथे रहातात; मात्र फरक एवढाच आहे की, त्यातील केवळ ७ कुटुंब हिंदु आहेत. १०१ हिंदु कुटुंबाना मुसलमानांच्या त्रासामुळे तो भाग सोडून जावा लागला !

६. या कुटुंबांच्या भूमीवर मुसलमानांनी बळजोरीने अनधिकृतपणे एक मशीद बनवली आहे. मशिदीतून ध्वनीप्रदूषण केले जाते. कोणी तक्रार करण्यासाठी गेले असता हिंदूंची कोणीही नोंद घेत नाही.

७. छिडानगरला हिंदुविरहित केले गेले. या भागात एका चाळीत ५८ दलित कुटुंबे रहात होती. आता तेथे केवळ ६ दलित कुटुंबे राहिली आहेत. ५२ दलित कुटुंबांना हाकलून लावण्यात आलेे.

८. ‘आम्ही मेलो, तरी येथून जाणार नाही’, असे तेथील ६ दलित कुटुंबे सांगतात. त्या चाळीतील स्नानगृहात एखादी हिंदू महिला गेल्यास, तर नमाजाला व्यत्यय नको म्हणून स्नानगृह बाहेरून बंद केले जाते. हे मी सांगत नाही, तर या गोष्टी मालवणी आणि पाली पोलीस ठाण्यात नोंद आहेत.

९. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील हिंदु अल्पसंख्यांक होत असल्याचा प्रारंभ मालवणी येथून होत आहे. ‘मालवणी पॅटर्न’ला रोखले पाहिजे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन करतो की, त्यांनी मालवणीचा संपूर्ण अहवाल मागवून घ्यावा. मी तुम्हाला सर्व माहिती सादर करतो.

१०. हिंदूंच्या अशा प्रश्‍नासाठी आमदारांची समिती नियुक्त करण्यात यावी.