कसाल मंडल अधिकार्‍याला ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

भ्रष्टाचारग्रस्त भारत ! असे निर्ढावलेले अधिकारी असतील, तर भ्रष्टाचारमुक्त भारत कधीतरी होईल का ? अशांना तात्काळ कायद्यानुसार कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी अशी कृत्ये करणार नाहीत !

कुडाळ – कायदेशीर खरेदी केलेल्या भूमीच्या खरेदीखताची सातबारावर नोंद करण्यासाठी ४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना कसालचे मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ओरोस येथील एका भूधारकाने कायदेशीर खरेदी केलेल्या भूमीच्या खरेदीखताची सातबारावर नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी कसालचे मंडळ अधिकारी हांगे यांनी ४ सहस्र रुपये मागितले होते. त्यामुळे भूधारकाने हांगे यांच्या विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार १६ फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कसाल मंडळ कार्यालयाकडे सापळा रचला. त्या वेळी हांगे यांना तक्रारदार भूधारकाकडून ४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पकडण्यात आले.

कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागत असल्यास  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.