कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करा ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

कोल्हापूर – कोल्हापूर हे पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. यामुळे येथील दळणवळण वाढले पाहिजे. मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण चालू आहे. त्यामुळे कोल्हापूर मिरज मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे, तसेच कोल्हापूर-पुणे मार्गावर चालू असलेल्या विविध कामांचा प्रतिमास प्रगती अहवाल सादर करा, अशी सूचना शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी २७ जानेवारी या दिवशी केली. येथील रेल्वे स्थानकावर थी सेन क्रूप आस्थापनाच्या वतीने सी.एस्.आर्. (आस्थापन सामाजिक दायित्व) निधीतून उभारलेल्या अत्याधुनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी या सूचना केल्या. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, महापालिकेचे साहाय्यक आयुक्त संदीप घाडगे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.