किल्ले सज्जनगड परिसरात मद्यपींचा धिंगाणा !

मद्यपींवर कारवाईची शिवप्रेमींची मागणी

सातारा – जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा म्हणून सज्जनगड किल्ला ओळखला जातो. आजही इतिहासाच्या पाऊल खुणा या ठिकाणी पहायला मिळतात. शहरातील प्रतिदिनच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात मेजवानी करण्याच्या मानसिकतेमुळे किल्ले सज्जनगड परिसरात (पायरीमार्ग) मद्यपी राजरोसपणे धिंगाणा घालतांना दिसत आहेत. पोलिसांनी सज्जनगडसारख्या पवित्र ठिकाणी मद्य प्राशन केले जाणार नाही, याची दक्षता घेण्याची, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परळी खोर्‍यातील दुर्गप्रेमींनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येते नाही का ? – संपादक)

परळी खोर्‍यातील निसर्ग संपदेमुळे शहरातील नागरिक हे या भागात फिरण्यास, तसेच मेजवानीच्या नियोजनानेच दाखल होत असतात; मात्र निसर्गाचा आनंद घेत असतांना ऐतिहासिक जागेचे भानही विसरत असल्याने मद्यपींचा धिंगाणा स्थानिकांना डोकेदुखी ठरत आहे. तसेच पोलिसांनी उरमोडी धरण परिसर, सज्जनगड पायरी मार्ग अशा ठिकाणी गस्त घालून ऐतिहासिक वास्तूची अवहेलना होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती येथील दुर्गप्रेमी, तसेच स्थानिक नागरिक करत आहेत.

मद्यपींमुळे परिसरात मद्यांंच्या बाटल्यांचा खच

सज्जनगड पायरी मार्ग हा अल्प वर्दळीचा आणि निवांत, त्यामुळे मित्रमंडळी गोळा करून शहरातून येऊन या परिसरात मद्यपींच्या बैठकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मद्य प्राशन करून बाटल्या इतरत्र टाकणे, खाद्य पदार्थांचे कागदही तसेच टाकले जात असल्याने परिसरात बाटल्या आणि कचरा दिसून येत आहे. यावर त्वरित निर्बंध घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे.