खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ! – मेहबूब शेख, संभाजीनगर प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत मेहबूब शेख (डावीकडे)

मुंबई – मी दोषी असलो, तर कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास सिद्ध आहे. खोट्या केस करून फक्त राजकीय द्वेषापोटी कोणी केले आहे का, याचाही पोलिसांनी तपास करावा. सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा राजकारणात मोठ्या पदावर गेल्यानंतर खोट्या तक्रारी करून त्याचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संभाजीनगर येथील प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले आहे. एक युवतीने केलेल्या तक्रारीवरून मेहबूब शेख यांच्या विरोधात संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याविषयी ३० डिसेंबर या दिवशी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन शेख यांनी त्यांची भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे हेही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

(सौजन्य : फक्त महाराष्ट्र)

या वेळी मेहबूब शेख म्हणाले, ‘‘माझी तक्रारदार तरुणीशी काहीच ओळख नसून कधीही भेटलो नाही. माझे दूरभाषचे ‘रेकॉर्ड’ पडताळा. हवे तर ‘नार्को टेस्ट’ करा.’’
तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार १४ नोव्हेंबरच्या रात्री शेख यांनी भेटण्यासाठी बोलावून गाडीतून निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केल्याचे म्हटले आहे. शेख यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप फेटाळून लावला आहे. हा विषय सांगतांना पत्रकार परिषदेत शेख यांना रडू कोसळले. दुसर्‍या बाजूला भाजपकडून शेख यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.