मुंबई – ज्या वेळी राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, त्या वेळी त्यांना पोलीस, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांसारखी शस्त्रे वापरावी लागतात. अंमलबजावणी संचालनालयाची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही अशा नोटिसीला घाबरत नाही. राजकीय भडास काढण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २८ डिसेंबर या दिवशी शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत केला. संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना ‘ईडी’ने पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेतील एका आर्थिक अपहाराच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. याविषयी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी हा आरोप केला.
राऊत पुढे म्हणाले, ‘‘कुटुंबियांना लक्ष्य करणे, ही नामर्दानगी आहे. या नामर्दानगीला शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआडची खेळी तुमच्यावर उलटल्याविना रहाणार नाही. आमच्यापैकी कुणी काहीही चुकीचे केलेले नाही. सौ. वर्षा राऊत उद्या अन्वेषणासाठी जाणार कि नाही ?, याविषयी अद्याप ठरलेले नाही. ही कारवाई राजकीय आहे. त्यामुळे याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहोत. मागील दीड मासांपासून अंमलबजावणी संचालनालय आमच्याशी पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती हवी होती. त्याविषयी सर्व कागदपत्रे आम्ही दिली आहेत; परंतु या पत्रव्यवहारात कोणत्याही अन्वेषणाचा उल्लेख नाही. भाजपचे लोक कालपासून अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस पाठवल्याचे सांगत उड्या मारत आहेत. याची माहिती भाजपला कशी काय मिळाली ? अंमलबजावणी संचालनालयाने भाजपशी हातमिळवणी केली आहे का ?’’
शासन पाडण्यासाठी भाजपकडून धमकावले जात आहे !
राज्यातील महाविकास आघाडीचे शासन टिकू नये, यासाठी भाजपचे काही महत्त्वाच्या लोकांनी सातत्याने वेगवेगळ्या मार्गांनी मला धमकावण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा कह्यात घेऊन भाजप हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला अटक करा; पण या शासनाला धक्काही लागू देणार नाही, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले.