काश्मीरमध्ये एका पसार पोलीस अधिकार्‍यासह ८ आतंकवाद्यांना अटक

मंदिरावर ग्रेनेडद्वारे आक्रमण करण्याचा कट सुरक्षादलांनी उधळला

  • काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, उलट तेथील काही जिहादी वृत्तीचे पोलीस आतंकवाद्यांना जाऊन मिळाले आहेत. आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केल्याविना हा आतंकवाद थांबणार नाही !
  • ‘सुरक्षादलांमध्ये अधिकाधिक अल्पसंख्यांकांची भरती करा’, अशी मागणी करणारे अशा जिहादी पोलिसांविषयी बोलत नाहीत !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी विविध ठिकाणांवरून ८ आतंकवाद्यांना अटक केली. यात जैश-ए-महंमदचे ४ आणि ‘जम्मू-काश्मीर गजनवी फोर्स’च्या २ आतंकवाद्यांचा समावेश आहे. या आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या एका विशेष पोलीस अधिकार्‍याचाही समावेश आहे. या आतंकवाद्यांना अटक करून पोलिसांनी मंदिरावर होणार्‍या ग्रेनेड आक्रमणाचा कट उधळून लावला.

१. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षादलांनी बडगाम जिल्ह्यातील हयातपोरामध्ये नाकाबंदी करून एका वाहनातून पळून जात असलेल्या जैशच्या ४ आतंकवाद्यांना पकडले. त्यांच्यासमवेत अल्ताफ हुसेन हा विशेष पोलीस अधिकारी होता. तो २ एके-४७ रायफली घेऊन जहांगीर या दुसर्‍या पोलीस अधिकार्‍यासमवेत पसार झाला होता. जहांगीरला आधीच अटक करण्यात आली आहे.

२. दुसरीकडे पूंछ जिल्ह्याच्या मेंढरमध्ये २ आतंकवादी भावांना एका वाहनातून पकडण्यात आले. त्यांच्याकडून ६ हातबॉम्ब आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दोघेही ‘जम्मू-काश्मीर गजनवी फोर्स’चे आतंकवादी आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बालाकोट सेक्टरजवळून आणखी २ आतंकवाद्यांना पकडण्यात आले.